तुर्कियेत हॉटेलला आग, 10 ठार
32 होरपळले : अग्शिमन दलाने आगीवर मिळविले नियंत्रण
वृत्तसंस्था/ इस्तंबुल
तुर्कियेच्या एका हॉटेलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर पश्चिम तुर्कियेच्या एका स्की रिसॉर्ट हॉटेलला आग लागली. या आगीमुळे 10 जणांचा मृत्यू झाला. तर 32 जण होरपळले. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बोलू प्रांताच्या करतलकाया रिसॉर्टच्या रेस्टॉरंटमध्ये रात्री आग लागली होती. आग लागल्यावर हॉटेलमध्ये अफरा-तफरीची स्थिती निर्माण झाल्याचे तुर्कियेचे मंत्री अली येरलिकाया यांनी सांगितले आहे. दोन पीडितांचा मृत्यू घाबरून इमारतीवरून उडी घेतल्याने झाला आहे. या हॉटेलमध्ये 234 लोक वास्तव्यास होतो. आग का लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु याकरता तपास केला जात असल्याची माहिती गव्हर्नर अब्दुलअजीज आयदीन यांनी दिली आहे.
आग लागल्यावर काही लोकांनी कपड्यांच्या मदतीने स्वत:च्या खोल्यांच्या खिडक्यांमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला होता. हॉटेलच्या बाहेरील हिस्स्यावर लाकडाचा वापर करण्यात आला होता, या लाकडामुळे आग वेगात फैलावल्याचे सांगण्यात येत आहे.
कार्तलकाया हे स्थळ इस्तंबूलपासून सुमारे 300 किलोमीटर अंतरावर कोरोग्लू पर्वतीयक्षेत्रात एक लोकप्रिय स्की रिसॉर्ट आहे. तुर्कियेत सध्या शाळांना सुटी असल्याने या क्षेत्रात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. तर आगीच्या घटनेनंतर खबरदारीदाखल अन्य हॉटेल्स रिकामी करविण्यात आली आहेत. आगीच्या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाची 30 वाहने आणि 28 रुग्णवाहिका घटनास्थळी पाठविण्यात आल्या होत्या.