फेब्रुवारीच्या प्रारंभीच उन्हाचे चटके
तापमानात वाढ : थंडीची तीव्रता कमी
बेळगाव : मागील दोन-चार दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. त्यामुळे फेब्रुवारी प्रारंभापासूनच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. दुपारच्या वाढत्या उन्हाने नागरिकांना छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे. सकाळी आणि सायंकाळी काही प्रमाणात थंडी जाणवत असली तरी दुपारी मात्र उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. यंदा सातत्याने हवामान बदलाचा परिणाम अनुभवावयास मिळाला आहे. थंडी, ऊन, पाऊस, ढगाळ वातावरण असा संमिश्र बदल पाहावयास मिळाला आहे. डिसेंबर, जानेवारीमध्ये थंडीची तीव्रता वाढली होती. मात्र आता थंडी हळूहळू कमी होत असून उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे दुपारी घामाच्या धारा निघत आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाची तीव्रता वाढत असल्याने येत्या काळात आणखी अधिक चटके सहन करावे लागणार आहेत.
दुपारी अधिक चटके
यंदा नोव्हेंबर अखेरपर्यंत कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाला होता. त्यानंतर थंडीला प्रारंभ झाला. मात्र अधुनमधून किरकोळ पाऊस आणि ढगाळ वातावरण कायम राहिले होते. मध्यंतरी बोचरी थंडीही अनुभवावयास मिळाली होती. मात्र आता थंडी गायब होत असून उन्हाचा पारा वाढू लागला आहे. दुपारच्या वेळेला अधिक चटके बसू लागले आहेत.