उत्तरेत उन्हाचा कडाका, पूर्वेत पावसाचा तडाखा
दिल्लीत 48 तासांमध्ये उष्णतेच्या लाटेने 7 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात एकीकडे मान्सून दाखल झाला असतानाच सध्या दिल्लीत कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. दिल्लीत गेल्या 48 तासात उष्माघाताने 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीसोबतच नजिकच्या नोएडा आणि गाझियाबाद परिसरातही उष्माघातामुळे बळींची नोंद झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये उष्णतेने कहर केलेला असतानाच पूर्वेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. आसामसह नजिकच्या राज्यांमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून पडलेल्या पावसाने 25 हून अधिक जणांचा बळी घेतला असून दीड लाखांहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत.
सध्या देशातील 11 राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. हवामान खात्याने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, मध्यप्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि जम्मू विभागातील काही भागांसाठी उष्मालाटेपासून सावध राहण्याचा अलर्ट जारी केला आहे. दिल्लीत बळी पडलेल्या 7 जणांपैकी 5 ऊग्ण राम मनोहर लोहिया (आरएमएल) ऊग्णालयात उपचार घेत होते, तर 2 ऊग्ण सफदरजंग ऊग्णालयात दाखल होते. आरएमएल ऊग्णालयात सध्या 12 ऊग्ण व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. उष्णतेची लाट सुरू झाल्यापासून आतापर्यंत 45 जणांना उष्णतेच्या आजारामुळे येथे दाखल करण्यात आले आहे.
मान्सून 4 दिवसात छत्तीसगडसह 7 राज्ये व्यापणार
देशातील अर्ध्याहून अधिक राज्यांमध्ये मान्सून पोहोचला असून ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. इतर राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. येत्या 3-4 दिवसात मान्सून महाराष्ट्रासह छत्तीसगड, ओडिशा, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंड व्यापणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सध्या गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगालच्या काही भागांव्यतिरिक्त ईशान्येकडील सिक्कीम, अऊणाचल, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.
आसाममध्ये पूरस्थिती गंभीर
आसाममधील पूरस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. येथे पुरामुळे 15 जिल्ह्यांमध्ये 1.61 लाख लोक बाधित झाले आहेत. तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात प्राण्यांवर नजर ठेवण्यासाठी कमांडो तैनात करण्यात आले आहेत. करीमगंज जिह्यातील बदरपूर भागात भूस्खलनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला, तिच्या तीन मुली आणि तीन वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. करीमगंज जिह्यातील नीलमबाजार, आरके नगर, करीमगंज आणि बदरपूर महसूल मंडळांतर्गत 225 गावे पुरामुळे प्रभावित झाली आहेत. 22,464 पूरग्रस्त लोक जिल्हा प्रशासनाने उभारलेल्या मदत छावण्या आणि मदत वितरण केंद्रांमध्ये आश्र्रय घेत आहेत.
गाझियाबादमध्येही उष्णतेचा कहर
उष्णतेच्या कडाक्याने उत्तर भारतातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा तापमानात सतत वाढ होत आहे. मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही सातत्याने वाढत आहे. गाझियाबादमध्ये गेल्या तीन दिवसांत उष्णतेमुळे 42 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील काही ऊग्णांना ऊग्णालयात आणण्यापूर्वी मृत घोषित करण्यात आले, तर काहींना ऊग्णालयात आणल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. गाझियाबाद येथील स्मशानभूमीचे आचार्य मनीष कुमार यांनी वाढत्या बळींच्या वृत्ताला दुजोरा दिला. मंगळवारी सकाळी 10 ते दुपारी 3 या पाच तासांत 36 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मृत्यू झालेल्या लोकांपैकी 50 टक्के लोक हे 24 ते 40 वयोगटातील होते. उष्णतेमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी 40 टक्के लोक 55 ते 70 वयोगटातील आहेत, तर उर्वरित 10 टक्के लोक 42 ते 53 वयोगटातील असल्याचे दिसून आले आहे.