For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कडक उन्हाळा...जनावरांना सांभाळा!

09:54 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
कडक उन्हाळा   जनावरांना सांभाळा
Advertisement

पशुसंगोपनचे आवाहन : उन्हामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम

Advertisement

बेळगाव : वाढत्या उन्हाच्या झळांमुळे पशुधनाच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत जनावरांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. कडक उन्हाळा...जनावरांना सांभाळा! अशा सूचना पशुसंगोपन खात्याने दिल्या आहेत. उन्हाच्या तीव्र झळांमुळे जनावरांच्या शरीराची लाही लाही होऊ लागली आहे. अशा स्थितीत जनावरांना योग्यवेळी चारा-पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. दरम्यान, अतिदुष्काळी भागात संबंधित ग्राम पंचायतींनी जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशा सूचनाही केल्या आहेत. जिल्ह्यात 28 लाखहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, घोडा, गाढव, शेळ्या-मेंढ्या आदींचा समावेश आहे. विशेषत: दुभत्या जनावरांना दररोज 100 लिटर पाण्याची गरज भासते. मात्र, सर्वत्र पाणीटंचाई तीव्र होऊ लागल्याने जनावरांचा पाण्याचा प्रश्नही गंभीर बनू लागला आहे. मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. परिणामी जलाशये, नदी, विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे मानवाबरोबर जनावरांना पाण्याची टंचाई भासू लागली आहे. विशेषत: वाढत्या उन्हामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे पशुपालकांनाही फटका बसू लागला आहे.

वाढत्या उन्हामुळे पारा 35 अंशांच्या पुढे गेला आहे. शिवाय येत्या दिवसात कडक उन्हामुळे आणखी बिकट परिस्थिती बनणार आहे. त्यामुळे आतापासूनच पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात जनावरांना नदी, तलाव व इतर जलस्रोतांवर अवलंबून रहावे लागते. मात्र, नदी-नाले आणि विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे जनावरांना पिण्याचे पाणी मिळणे अशक्य होऊ लागले आहे. जनावरांच्या शरीरावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी संबंधित ग्राम पंचायतीने जनावरांसाठी पाण्याचे हौद उपलब्ध करावेत, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 28 लाखांपैकी 16 लाखांहून अधिक जनावरे मोठी आहेत. या जनावरांना दैनंदिन पाण्याची गरज भासते. अशा परिस्थितीत पशुपालकांनीही उन्हाळ्यात जनावरांना 3 ते 4 वेळा पाणी देणे गरजेचे आहे. काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाणी मिळणे अशक्य आहे. अशा ठिकाणी ग्राम पंचायतींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. यंदा मार्च महिन्यातच उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. यासाठी जनावरांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. जनावरांना जास्त काळ उन्हात बांधू नये. तसेच ग्रीन नेटचा वापर करावा. शिवाय अडचणी किंवा समस्यांबाबत जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही खात्याने केले आहे.

Advertisement

पाण्याची अधिक गरज

उष्णता वाढल्याने जनावरांच्या तापमानात वाढ होते. त्याचा शरीरावर परिणाम होऊन भूक मंदावणे व इतर आजार बळावतात. उन्हाळ्यामध्ये जनावरांना अधिक पाण्याची गरज असते. एका दुभत्या जनावराला 100 लिटरपेक्षा जादा पाणी लागते. पशुपालकांनी जनावरांची योग्य देखभाल करावी.

- डॉ. आनंद पाटील, (तालुका मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी)

Advertisement
Tags :

.