मधमाशांच्या हल्ल्यात होसूरच्या शेतकऱ्याचा मृत्यू
बेळगाव : शेतात गवत कापताना मधमाशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या होसूर बसवाण गल्ली येथील एका वृद्ध शेतकऱ्याचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या घटनेत आणखी एक वृद्ध शेतकरी जखमी झाला आहे. शहापूर पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. मोनाप्पा शंकर भातकांडे (वय 74) रा. होसूर बसवाण गल्ली असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. मारुती जोतिबा हलगेकर (वय 75) हा वृद्ध जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. मंगळवार दि. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता खासबाग परिसरातील शेतवडीत ही घटना घडली आहे. मोनाप्पा यांच्या पश्चात पत्नी, वहिणी, दोन पुतणे, तीन पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे. गुरुवार दि. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता जुने बेळगाव स्मशानभूमी येथे रक्षाविसर्जन होणार आहे. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. मंगळवारी सकाळी मारुती हलगेकर यांच्या शेतात गवत कापणी सुरू होती. आठ वाजण्याच्या सुमारास अचानक मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात मोनाप्पा व मारुती हे दोघे जखमी झाले. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.50 वाजता उपचाराचा उपयोग न होता मोनाप्पा यांचा मृत्यू झाला.