यजमान विंडीजचे लंकेला चोख प्रत्युत्तर
हॉप-ग्रिव्स यांची दीडशतकी भागिदारी, कॅम्पबेलचे अर्धशतक
वृत्तसंस्था, नॉर्थ साऊंड
येथे सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या तिसऱ्या दिवशी यजमान विंडीजने लंकेला चोख प्रत्युत्तर देताना पहिल्या डावात 4 बाद 318 धावा जमविल्या. तत्पूर्वी लंकेने आपला पहिला डाव 9 बाद 549 धावांवर घोषित केला. विंडीजतर्फे हॉप आणि ग्रिव्स यांनी अभेद्य दीडशतकी भागिदारी पाचव्या गड्यासाठी केली आहे. तर कॅम्पबेलने अर्धशतक झळकविले.
या कसोटीतील खेळाच्या तिसऱ्या दिवशी केवळ तीन गडी बाद झाले. तर 260 धावा नोंदविल्या गेल्या. या सामन्यातील पहिल्या तीन दिवसांमध्ये एकूण 13 गडी बाद झाले. तिसऱ्या दिवसाअखेर विंडीजच्या पहिल्या डावात शाय हॉप 86 तर ग्रिव्स 85 धावांवर खेळत असून या जोडीने पाचव्या गड्यासाठी अभेद्य 174 धावांची भागिदारी केली आहे. हॉप पाचव्या तर ग्रिव्स तिसऱ्या शतकाकडे वाटचाल करीत आहे. तसेच विंडीजतर्फे यापूर्वी कसोटी पाचव्या गड्यासाठी विक्रमी 196 धावांची भागिदारी विंडीजतर्फे गेल्या डिसेंबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात नोंदविली गेली होती. आता लंका आणि विंडीज यांच्यात ही दोन सामन्यांची कसोटी मालिका आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळविली जात आहे. पहिली कसोटी विंडीजने 1 डाव आणि 217 धावांनी जिंकून लंकेवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे.
या सामन्यातील तिसऱ्या दिवशीच्या खेळला प्रारंभ झाल्यानंतर उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात केवळ 1 गडी बाद झाला. विंडीजच्या जॉन कॅम्पबेल आणि हॉज या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 89 धावांची भागिदारी केली. विंडीजने 1 बाद 58 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे सुरूवात केली. लंकेच्या प्रभात जयसूर्याने विंडीजच्या कॅम्पबेलला 72 धावांवर तर त्यानंतर अमिर जंगूला 9 धावांवर बाद केले. उपाहारावेळी विंडीजने 4 बाद 144 धावांपर्यंत मजल मारली होती. पण त्यानंतर हॉप आणि ग्रिव्हेस यांनी तिसऱ्या दिवशीच्या खेळातील उर्वरित दोन सत्रे खेळून काढल्याने लंकेच्या गोलंदाजांना यश मिळू शकले नाही. हॉपने 90 चेंडूत 5 चौकारांसह तर ग्रिव्हेसने 85 चेंडूत 6 चौकारांसह अर्धशतक झळकविले. लंकेच्या जयसूर्याने 77 धावांत 2 गडी बाद केले. तत्पूर्वी विंडीजच्या कॅम्पबेलने कसोटीतील आपले चौथे अर्धशतक झळकविले. असिता फर्नांडोच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्याने 154 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 72 धावा जमविल्या. हॉजने 31 धावांचे योगदान दिले.
विंडीजविरुद्ध पहिल्यांदाच लंकन संघाने कसोटीत 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे. लंकेने पहिला डाव 9 बाद 549 धावांवर घोषित केला. लंकन संघातील लाहीरु उदाराने 188 धावा झळकविल्या. तर कमिंदु मेंडीस, कुशल मेंडीस आणि सोनल दिनुशा यांनी अर्धशतके झळकविली. विंडीजचा संघ तिसऱ्या दिवसाअखेर 231 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 6 गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक: लंका प. डाव 9 बाद 549 डाव घोषित (लहीरु उदारा 188), विंडीज प. डाव 4 बाद 318 (हॉप खेळत आहे 86, ग्रिव्स खेळत आहे 85, कॅम्पबेल 72, हॉज 31, जंगू 9, जयसूर्या 2-77).