धावांच्या पावसात यजमान दिल्ली कॅपिटल्स गारद
पंजाब किंग्जचा 6 गड्यांनी विजय, राहुलचे दीड शतक वाया, आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
अरुण जेटली स्टेडियमवर शनिवारी झालेल्या आयपीएल स्पर्धेतील सामन्यात दोन्ही संघांकडून धावांचा पाऊस पाडला गेला. तब्बल 529 विक्रमी धावा नोंदविल्या गेल्यानंतर पंजाब किंग्जने 7 चेंडू बाकी ठेवून यजमान दिल्ली कॅपिटल्सचा 6 गड्यांनी दणदणीत पराभव करत गुणतक्त्यात आपली विजयी घोडदौड कायम राखत 13 गुणांसह अग्रस्थान अधिक भक्कम केले. या सामन्यात दिल्ली संघाकडून सामनावीर केएल राहुलने नाबाद 152 धावांची विक्रमी खेळी केली. पण ती वाया गेली तर या सामन्यात 33 षटकार आणि 49 चौकाराचा नोंदविले गेले.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने 20 षटकांत 2 बाद 264 धावा झळकविल्या. त्यानंतर पंजाबने 18.5 षटकांत 4 बाद 265 धावा जमवित शानदार विजय नोंदविला. पंजाबतर्फे प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी दमदार अर्धशतके झळकविली.
दिल्ली कॅपिटल्सच्या डावामध्ये केएल राहुलने केवळ 67 चेंडूत 9 षटकार आणि 16 चौकारांच्या मदतीने जलद नाबाद 152 धावा जमवित अनेक विक्रम मोडीत काढले. सलामीचा निशांका तिसऱ्या षटकातच अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 11 धावा केल्या. त्यानंतर नितीश राणा व केएल राहुल यांनी दुसऱ्या गड्यासाठी 95 चेंडूत 220 धावांची द्विशतकी भागिदारी केली. नितीश राणाने 44 चेंडूत 4 षटकार आणि 11 चौकारांसह 91 धावा झोडपल्या. बार्टलेटने त्याला झेलबाद केले. डेव्हीड मिलर 3 धावांवर नाबाद राहिला. दिल्लीच्या डावामध्ये 13 षटकार आणि 29 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाबच्या डावामध्ये आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी सलामीच्या गड्यासाठी 41 चेंडूत 126 धावांची शतकी भागिदारी केली. आर्यने 17 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांसह 43 धावा झोडपल्या. प्रभसिमरन सिंगने 26 चेंडूत 5 षटकार आणि 9 चौकारांसह 76 धावा झळकविल्या. कॉनोलीने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 17 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 36 चेंडूत 7 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 71 धावा झळकविल्या. वधेराने 15 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 25 धावा केल्या. शशांक सिंगने अय्यरला चांगली साथ देताना पाचव्या गड्यासाठी अभेद्य 64 धावांची भागिदारी केली. त्यामध्ये शशांक सिंगचा केवळ 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 19 धावांचा वाटा होता. पंजाबच्या डावामध्ये 20 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. दिल्लीतर्फे कुलदीप यादवने 2 तर अक्षर पटेल आणि निगम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पंजाबने पहिल्या 6 षटकांत 116 धावा झोडपल्या.
राहुलचे अनेक विक्रम
केएल राहुलने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदविली. त्याला नितीश राणाकडून चांगली साथ मिळाली. राहुल आणि राणा यांनी 220 धावांची द्विशतकी भागिदारी केली असून आयपीएल स्पर्धेतील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागिदारी केली आहे. 2026 च्या आयपीएल स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्सची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. पॉवरप्ले दरम्यान 6 षटकातील दिल्लीची 116 धावांची सर्वोच्च नोंद आहे. आयपीएल स्पर्धेत यापूर्वी 150 धावांचा टप्पा विंडीजच्या ख्रिस गेलने (175) आणि न्यूझीलंडच्या ब्रेन्डॉन मेकॉलमने (158) ओलांडला होता. आता या यादीमध्ये राहुल तिसऱ्या स्थानावर आहे.
नितीश राणाने डावातील 12 व्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या बार्टलेटच्या गोलंदाजीवर 2 षटकार आणि 4 चौकारांसह एकूण 28 धावा झोडपल्या.

विविध विक्रम टी-20 प्रकारातील
केएल राहुल नाबाद 152 पंजाबविरुद्ध, 2026 साल
तिलक वर्मा नाबाद 151 मेघालय विरुद्ध, 2024 साल
अभिषेक शर्मा नाबाद 148, बंगालविरुद्ध 2025 साल
श्रेयस अय्यर नाबाद 147 सिक्कीमविरुद्ध 2019 साल
पुनीत बिस्त नाबाद 146 मिझोरामविरुद्ध 2021 साल
आयपीएलमधील सर्वाधिक चौकार व षटकार
30 ख्रिस गेल, आरसीबी, 2013 साल
25 केएल राहुल दिल्ली, 2026 साल
24 यशस्वी जैस्वाल, राजस्थान, 2023 साल
24 अभिषेक शर्मा, हैदराबाद, 2025 साल

अन् झेल टिपण्याच्या नादात एन्गिडी स्ट्रेचवर
दिल्ली कॅपिटल्स संघातील वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी झेल टिपण्याच्या नादात गंभीर जखमी झाल्याने त्याला मैदानातून स्ट्रेचरवरुन हलवावे लागले. आयपीएल स्पर्धेतील शनिवारी दिल्लीत झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्ज संघातील वेगवान गोलंदाज द. आफ्रिकेचा एन्गिडी झेल टिपण्याच्या नादात गंभीर जखमी झाला.
पंजाब किंग्जच्या डावामधील दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर पंजाबचा सलामीचा फलंदाज प्रियांश आर्य याने मिडॉनच्या दिशेने मारलेला उंच फटका मागे पळत जात टिपण्याच्या प्रयत्नात एन्गिडीचे डोके मैदानावर आदळले. काही क्षण तो मैदानावर निपचित पडल्याचे पाहून संघाचे फिजीओ आणि डॉक्टरांचे पथक मैदानात धावले. यानंतर काही क्षण खेळ थांबला होता. फटकेबाजीला प्रोत्साहन देणारे शौकिनही या घटनेने स्तब्ध झाले. दिल्ली संघाचा प्रमुख प्रशिक्षक रिकी पॉटिंगने मैदानात येवून डॉक्टरांशी चर्चा केली आणि स्ट्रेचरवरुन एन्गिडीला मैदानाबाहेर नेले. रुग्णवाहिकेतून त्याला पुढील वैद्यकीय उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.