बेळगावातील वसतिगृहांची केली पाहणी
विद्यार्थिनींची काळजी घेण्याची सूचना
बेळगाव : राज्य मानव हक्क आयोगाचे अध्यक्ष टी. श्यामभट यांनी समाजकल्याण खात्याच्या सदाशिवनगर येथील सरकारी मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकनंतरच्या मुलींच्या वसतिगृहाला बुधवारी (दि. 7) भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. वसतिगृहातील समस्या विद्यार्थिनींकडून जाणून घेतल्या. त्यानंतर सुभाषनगर येथील देवराज अर्स मागासवर्गीय मॅट्रिकनंतरच्या मुलींच्या वसतिगृहाला भेट दिली. दोन्ही वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या राहण्याच्या खोल्या, स्वयंपाक घर, साहित्य ठेवण्याच्या खोल्यांची पाहणी केली. विद्यार्थिनींना दर्जेदार आहार देण्याबरोबरच स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, विद्यार्थिनींची वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात यावी, अशा सूचना संबंधितांना केल्या.
अध्यक्ष टी. श्यामभट यांच्यासमवेत असलेले आयोगाचे सदस्य एस. के. वंटगुडी यांनीही काही सूचना केल्या. वसतिगृहातील सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रीय उपकरणे व्यवस्थित सुरू असल्याची खातरजमा करून घेत विद्यार्थिनींची वेळोवेळी काळजी घ्यावी, त्यांची नियमितपणे हजेरी घेण्यात यावी, असे सांगितले. यावेळी समाजकल्याण खात्याचे सहसंचालक रामनगौडा कन्नोळी, जिल्हा अल्पसंख्याक कल्याण खात्याचे अधिकारी एफ. यु. पुजारी, तहसीलदार बसवराज नागराळ यासह वसतिगृहाचे कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर, आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांनी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन पाहणी केली.