गाझामधील रुग्णालये इस्रायलकडून लक्ष्य
‘मानवतावादी युद्धविराम’ दरम्यान हमासवर हल्ले सुरूच
वृत्तसंस्था/तेल अवीव
इस्रायलने शुक्रवारी गाझामधील अनेक ऊग्णालयांना लक्ष्य केले. तसेच, इस्रायली सैन्याने गाझामधील शहरी भागात प्रवेश केल्यामुळे हमासचे अधिकाधिक नुकसान होत आहे. इस्रायलच्या हल्ल्यादरम्यान मोठ्या संख्येने लोक दक्षिणेकडे वळले आहेत. मानवतावादी युद्धविरामादरम्यान लोक स्थलांतरित होत आहेत. मात्र, अशा स्थितीतही इस्रायलकडून हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. हमासचे दहशतवादी ऊग्णालयांमध्ये लपल्यामुळे इस्रायलकडून ऊग्णालयांवर हल्ले केले जात आहेत. दहशतवाद्यांनी शिफा हॉस्पिटल कॉम्प्लेक्सला आपले मुख्य कमांड सेंटर बनवल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
शिफा हॉस्पिटल हे गाझामधील सर्वात मोठे हॉस्पिटल आहे. त्याच्या आसपास मोठ्या संख्येने लोक राहतात. त्यामुळे हमासने या भागात आपला तळ प्रस्थापित केल्याचे मानले जात आहे. हॉस्पिटलपासून तीन किलोमीटर अंतरावर इस्रायली सैन्य पोहोचले आहे. इस्रायलने शुक्रवारी पहाटे शिफा प्रांगण आणि प्रसूती विभागाला लक्ष्य केले. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचा दावा दहशतवादी संघटना हमासद्वारे चालवल्या जाणाऱ्या मीडिया कार्यालयाचे प्रमुख सलमा मारोफ यांनी केला आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे.
इस्रायल पंतप्रधानांचा पुन्हा इशारा
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कोणत्याही कराराची चर्चा नाकारत हमासविऊद्ध लढा सुरूच राहील असे जाहीर केले आहे. सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर पडता यावे यासाठी हल्ले ठराविक कालावधीसाठी थांबवले आहेत. आम्हाला गाझामधील लोकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यायचा आहे. तेथील नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये अशी आमची इच्छा आहे. मात्र, हमासचा नायनाट केल्याशिवाय आता आम्ही थांबणार नाही, असे नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे.
इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 10,800 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत, असे गाझा आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी हा आकडा खोटा असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर हमासच्या हल्ल्यात 1400 हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला असून युद्धक्षेत्रात 30 हून अधिक सैनिक मारले गेल्याचेही सांगितले जाते.