घोड्यांना समजते माणसांची भीती...
मनातून भय वाटत असले, तरी ते बाहेर न दाखविण्याची कला माणसाला साध्य आहे. त्यामुळे एखादा माणूस घाबरलेला आहे की नाही, हे अन्य माणसांना कित्येकदा समजून येत नाही. तथापि, घोड्यांना ते नेमकेपणाने कळते, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. माणसाचा वास घेऊन घोडे तो घाबरलेला आहे की नाही, हे समजून घेऊ शकतात. हे संशोधन अमेरिकेकडून करण्यात आले आहे.
या संशोधनात प्रथम काही माणसांना एक भयपट दाखविण्यात आला. त्यामुळे त्यांच्या मनात भीतीची तीव्र भावना निर्माण झाली. काही जणांना तर भीतीने घाम फुटला होता. या व्यक्तींचा घाम एकत्र करण्यात आला आणि तो घोड्यांना हुंगण्यास देण्यात आला. त्यामुळे घोडे चेकाळले आणि ते खिंकाळू लागले. घाबरलेल्या माणसांच्या घामाच्या वासामुळे घोड्यांच्या हृदयांची धडधडही वाढल्याचे संशोधकांना आढळून आले. त्यानंतर याच घोड्यांना न घाबरलेल्या आणि सर्वसामान्य परिस्थितीतील माणसांच्या घामाचा वास हुंगविण्यात आला. पण या वासाचा कोणताही परिणाम या घोड्यांवर झाला नाही. ते नेहमी असतात, तसेच सर्वसामान्य रहिल्याचे दिसून आले. हे प्रयोग अनेकदा करण्यात आले. प्रत्येकवेळी हेच निरीक्षण समोर आले आहे. त्यामुळे घोड्यांना माणसाची मन:स्थिती कळते असा निष्कर्ष संशोधकांकडून काढण्यात आला आहे. या संशोधनाचा उपयोग काय आणि तो कोणाला होणार आहे, असा प्रश्न अनेकांना पडण्याची शक्यता आहे. संशोधकांनी त्याचेही उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. घोड्यांना किंवा अन्य प्राण्यांना पाळणाऱ्या लोकांना या संशोधनाचा लाभ होऊ शकतो. घोड्यांना किंवा प्राण्यांना आपल्या नियंत्रणात ठेवायचे असेल, तर आपण स्वत: आधी शांतचित्त राहण्याची आवश्यकता असते. घोड्यांना पाळणारी व्यक्ती किंवा त्यांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक यांच्या भावना घोड्यांना कळतात आणि ते स्वत:ही त्याप्रमाणे प्रतिक्रिया देतात. त्यामुळे घोडे किंवा अन्य वन्य प्राणी यांना योग्य प्रकारे माणसाळावयाचे असेल, तर त्यांच्या प्रशिक्षकाने स्वत:ची मानसिक शांतता राखली पाहिजे, हे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहेत, त्यांनाही याच कारणासाठी या संशोधनाचा उपयोग होईल, ही शक्यता आहे.