होंडुरासमध्ये भीषण हल्ले, 25 ठार
मृतांमध्ये 6 पोलिसांचा समावेश : पर्यावरणवाद्यांना लक्ष्य करणारा हल्ला
वृत्तसंस्था/ ट्रुजिलो
होंडुरास या देशात सशस्त्र गुंडांनी केलेल्या बेछूट गोळीबारात कमीतकमी 25 जणांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये 6 पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. होंडुरासच्या ट्रूजिलो शहरातील एका ठिकाणी झालेल्या गोळीबारात कमीतकमी 19 कामगारांचा मृत्यू झाला, नैसर्गिक साधनसंपदेने समृद्ध हे क्षेत्र दशकांपासून कृषीभूमी वादांचे केंद्र राहिले आहे.
पर्यावरण अन् भूमी अधिकारांच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना यापूर्वी धमक्या मिळाल्या होत्या. 2024 मध्ये पर्यावरणवादी नेते जुआन लोपेझ यांच्या हत्येने होंडुरासच्या या क्षेत्रातील नैसर्गिक संपदेच्या रक्षण करण्यामागील धोके उघड केले होते.
होंडुरासला पर्यावरणवाद्यांसाठी सर्वात धोकादायक देशांपैकी एक मानले जाते. 2024 साली 5 तर 2023 साली 18 पर्यावरणवाद्यांची हत्या करण्यात आली होती. अलिकडेच लोपेझ यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती.
होंडुरासच्या ग्वाटेमाला सीमेनजीकच्या कोर्टेस क्षेत्रातील ओमोआ शहरात गुंडांनी पोलिसांवर गोळीबार केला. या हल्ल्यात एका वरिष्ठ अधिकाऱ्यासमवेत 6 पोलिसांना जीव गमवावा लागला. संबंधित पोलीस एका टोळीच्या विरोधातील अभियानात सामील होते आणि राजधानी तेगुसिगाल्पा येथून ओमोआसाठी प्रवास करताना त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला.
मानवाधिकारांवरून चिंता
ट्रुजिलोमधील मृतांच्या संख्येचा योग्य अनुमान लावणे अवघड ठरत आहे कारण काही जणांचे मृतदेह त्यांच्या स्वकीयांनी उचलून नेले आहेत. तपास अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविण्यात आले आहे असे राष्ट्रीय पोलीस प्रवक्ते एडगार्डो बारहोना यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय पोलीस आणि सशस्त्र दल दोन्ही ठिकाणी सुरक्षा सांभाळणार आहेत. याचबरोबर याप्रकरणी तपासासाठी फॉरेन्सिक तज्ञ आणि अधिकाऱ्यांची टीम स्थापन केली जाणार असल्याचे सुरक्षा मंत्रालयाने सांगितले आहे. होंडुरास दीर्घकाळापासून टोळ्या आणि आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या व्यापाराच्या मोठ्या गुन्हेदराला तोंड देत आहे.