Chandgad Road Accident | चंदगडमध्ये भीषण अपघात; दुचाकी घसरून एकाचा मृत्यू, एक जखमी
Chandgad Road Accident : माणगाव-तांबुळवाडीमार्गावर मलगड फाट्याजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक जण ठार तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. शिवाजी महादेव ससेमारी (वय ४०) असे मृताचे नाव आहे. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत चंदगड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, माणगावयेथील शिवाजी महादेव ससेमारी हे आपल्या दुचाकीवरून सहप्रवासी विलास घोळसे यांच्यासह हॉटेल सहवास, हलकर्णी फाटा येथे जेवण करून माणगावकडे परत येत होते. मलगड फाटा, मलगड गावच्या हद्दीत भरधाव वेग आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी घसरली.
या अपघातात दुचाकी चालक शिवाजी ससेमारी हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेले विलास घोळसे हे किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी जखमी फिर्यादी बिलास डोळसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल राजिगरे यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गैंगजे हे करीत आहेत.