Sindhudurg news | आंबोली घाटात भीषण अपघात! ट्रकच्या धडकेत चिमुरडीचा जागीच मृत्यू, आई-भाऊ गंभीर जखमी
सिंधुदुर्ग- आंबोली घाटात गुजरात पासिंगच्या एका ट्रकने स्कूटरला दिलेल्या धडकेत एका चिमुरडीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघातात आई आणि भाऊ गंभीर जखमी झाले असून, वडिलांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत.

पळून जाणाऱ्या ट्रकचा स्थानिकांनी थरारक पाठलाग करून चालक आणि क्लिनरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. रुग्णवाहिका आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत मदतकार्य राबवले. अवजड वाहन चालकांच्या निवडीबाबत आणि रस्ते सुरक्षिततेबाबत या घटनेमुळे पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ही घटना आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटात यु आकाराच्या वळणावर घडली. अपघातानंतर पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेला ट्रक आंबोली घाटात पलटी झाल्याने तब्बल अडीच तासाहून अधिक वेळ वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून सदर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निकिता राऊत हिचा मृतदेह आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर आता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

तर गंभीर जखमी मातेला उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी आणण्यात येणार आहे . घटनास्थळी पोलीस हवालदार रामदास जाधव, संतोष गलोले यांसह पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण उपस्थित होते . पण सुरक्षिततेबाबत या घटनेमुळे पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
संपूर्ण व्हिडिओ पहा 👇