Ambenali Ghat Accident | कोकणची सफर ठरली अखेरची! आंबेनळी घाटात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; साताऱ्यातील ८ जणांचा मृत्यू
आंबेनळी घाटात भीषण अपघात;
महाबळेश्वर -महाबळेश्वरजवळील आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ गाडी सुमारे ८०० फूट खोल दरीत कोसळून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. मृतांमध्ये सातारा जिल्ह्यातील २१ ते २५ वयोगटातील तरुणांचा समावेश असून, कोरेगाव तालुक्यातील आसगाव गावातील पाच तरुणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण कोकणात फिरण्यासाठी गेले होते. मात्र रात्री उशिरापासून त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. काहींचे मोबाईल फोन लागत होते, मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने नातेवाईकांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात संपर्क साधला. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध सुरू केला असता आंबेनळी घाट परिसरात लोकेशन मिळाले. यानंतर पोलिसांनी महाबळेश्वर व प्रतापगड ट्रेकर्सच्या मदतीने शोधमोहीम राबवली. त्यावेळी स्कॉर्पिओ गाडी (एमएच ११ डीएन २३४०) खोल दरीत कोसळल्याचे निदर्शनास आले. अपघात इतका भीषण होता की गाडीतील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे :
महेश अनिल पवार (वय २५)
आदित्य अशोक साळुंखे (वय २१)
रितेश राजेंद्र लोखंडे (वय २५)
सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०)
अंश समीर चव्हाण (वय १८)
उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २१)
अभिमन्यू अनिल शिंगटे (वय २५)
नितीन किसन नायकोंडे (वय ३५)
यातील पाच जण सातारा तालुक्यातील आसगाव येथील, दोन जण वाई तालुक्यातील मर्ढे येथील तर एक जण खटाव तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, घटनास्थळी पोलादपूर आणि महाड पोलिसांसह स्थानिक प्रशासन आणि ट्रेकर्सचे पथक दाखल झाले असून बचाव व मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या भीषण अपघातामुळे सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.