कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भीषण : एअर इंडिया विमान कोसळून 240 बळी

10:40 AM Jun 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लंडनला जाणाऱ्या विमानाला दुर्घटना : इंजिन अचानक बिघडल्याने दुर्घटना,दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश, कारणांचा शोध घेणार,1996 नंतरची अशा प्रकारची पहिली दुर्घटना

Advertisement

वृत्तसंस्था , अहमदाबाद (गुजरात)

Advertisement

अहमदाबाद येथून लंडनला जात असलेले एअर इंडियाचे बोईंग 787 ‘ड्रीमलायनर’ प्रवासी विमान कोसळले असून त्यातील सर्व 243 प्रवासी मृत्यूमुखी पडल्याची भीषण घटना घडली आहे. ही शोकांतिका गुरुवारी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या आसपास घडली. विमानाने अहमदाबादच्या सरदार वल्लबभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी लंडनच्या दिशेने उड्डाण केल्यानंतर दोन-चार मिनिटात ते कोसळले. त्यावेळी त्याने 650 फुटांची उंची गाठली होती. विमानात 230 प्रवासी आणि 12 कर्मचारी होते, अशी माहिती देण्यात आली.

हे विमान नागरी वस्तीत कोसळल्याने भूमीवरील अनेक नागरिकांनीही प्राण गमावले आहेत. जखमींची संख्या 100 हून अधिक असून त्यांच्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे विमान अहमदाबादच्या मेघानी या निवासी भागात कोसळले असून ते तेथील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीला आदळले. त्यामुळे या महाविद्यालयात शिकणाऱ्या अनेक भावी डॉक्टरांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीला आदळल्यानंतर विमानाचे दोन तुकडे झाले. विमानच्या शेपटीचा भाग इमारतीच्या भिंतीत अडकून तुटल्याचे दिसत होते. कोसळण्याच्या आधी संपूर्ण विमान आगीच्या ज्वाळांनी वेढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आहे.

चौकशीचा आदेश 

उड्डाण केल्यानंतर त्वरित हे विमान कोसळले. कोणत्या कारणांमुळे ही दुर्घटना घडली, हे शोधण्यासाठी चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. प्रथमदर्शनी हा अपघातच असल्याचे दिसून येत असले, तरी घातपाताच्या शक्यतेवरही विचार केला जात असून सर्व शक्यता गृहित धरुन चौकशी केली जाणार आहे. दुर्घटनेच्या कारणांसंबंधीची माहिती येत्या 48 तासांमध्ये स्पष्ट होण्याची शक्यता आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स हाती लागला असून त्याच्यातील माहितीच्या विश्लेषणानंतर या दुर्घटनेची नेमकी कारणे समजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चालकाने पाठविला होता संदेश 

हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल आणि प्रथम अधिकारी (फर्स्ट ऑफिसर) यांच्या अधिपत्यात प्रवास करीत होते. मुख्य चालक कॅप्टन सुमित सभरवाल हे होते. त्यांनी विमान कोसळण्यापूर्वी महत्वपूर्ण संदेश विमानतळावरील नियंत्रण कक्षाला पाठविला होता. त्यानंतर काही सेकंदांमध्येच ते कोसळल्याने कोणतीही तातडीची उपाययोजना करण्यास वेळच मिळाला नाही, असा घटनाक्रम पुढे येत आहे. या विमानात 230 प्रवासी, 2 चालक आणि 10 कर्मचारी होते.

विदेशी प्रवाशांचाही समावेश 

या विमानातून ब्रिटनचे 53, पोर्तुगालचे 7 तर कॅनडाचा 1 असे 61 विदेशी  नागरिक प्रवास करीत होते. त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. ब्रिटनच्या सरकारने भारत सरकारशी संपर्क केला असून स्थितीसंबंधी माहिती घेतली. विमानातील प्रवाशांमध्ये 169 भारतीय आणि अन्य विदेशी प्रवासी होते, असे समजते.

विजय रुपानी, पुत्र यांचाही अंत

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय रुपानी हे देखील या विमानाने आपल्या पुत्रासमवेत आपल्या कन्येला भेटण्यासाठी लंडनला निघाले होते. विजय रुपानी यांच्या पत्नी बुधवारीच लंडनला गेल्या आहेत. तथापि, विजय रुपानी आणि त्यांचे पुत्र यांचा अंत या दुर्घटनेत झाला आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.

दोन उद्योगपतींचा मृत्यू 

राजस्थानातील दोन उद्योगपतीही या विमानातून लंडनला जात होते. शुभ मोदी आणि शगुन मोदी अशी त्यांची नावे असून ते एकाच कुटुंबातील आहेत. त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यांचा भारत आणि ब्रिटन अशा दोन्ही देशांमध्ये व्यवसाय होता, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

भूपेंद्र पटेल, अमित शहा घटनास्थळी 

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना घटनेचे वृत्त समजताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी केल्या जात असलेल्या साहाय्यता कार्याकडे ते लक्ष देत होते. गुजरात सरकारचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री यांनीही ताबडतोब घटनास्थळी जाऊन परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील दिल्लीहून त्वरित अहमदाबाद येथे पोहचले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा करून साहाय्यता कार्यासंबंधी महत्वाच्या सूचना केल्या.

टाटांकडून 1 कोटीची भरपाई

एअर इंडियाचे स्वामित्व असणाऱ्या टाटा उद्योसमूहाकडून या विमान दुर्घटनेत मृत झालेल्या प्रत्येक व्यक्तीमागे 1 कोटी रुपयांची भरपाई घोषित करण्यात आली आहे. दुर्घटनेनंतर काही तासांमध्येही ही घोषणा करण्यात आली. तसेच या दुर्घटनेत जे जखमी झाले आहेत, त्यांच्या वैद्यकीय उपचारांचा सर्व खर्च हा उद्योगसमूह उचलणार आहे, असेही या समूहाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लष्कराचे पथक मदतकार्यात आघाडीवर

अहमदाबादजवळ एअर इंडिया विमान कोसळल्यानंतर सुरू असलेल्या मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण प्रयत्नांमध्ये नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी सुमारे 130 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या भारतीय लष्कराच्या पथकांना तैनात करण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्या दिमतीसाठी जेसीबीसह अभियांत्रिकी पथके, डॉक्टर आणि पॅरामेडिक्ससह वैद्यकीय पथके, जलद कृती पथके (क्यूएटी), अग्निशामक आणि पाण्याच्या सहाय्याने अग्निशमन उपकरणे आणि घटनास्थळ व्यवस्थापनासाठी प्रोव्होस्ट कर्मचारी यांचा समावेश आहे. लष्करी रुग्णालयालाही सतर्क ठेवण्यात आले आहे.

देव तारी त्याला....

या भीषण विमान दुर्घटनेतून दोन प्रवाशांचा जीव आश्चर्यकारकरित्या वाचला आहे, असे वृत्त रात्री उशिरा देण्यात आले आहे. विश्वास कुमार रमेश असे एका बचावलेल्या प्रवाशाचे नाव आहे. मात्र, त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे, यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. वाचलेल्या प्रवाशांमध्ये एका ब्रिटीश नागरिकाचा समावेश आहे. त्यामुळे अद्यापही मृतांची संख्या निश्चितपणे घोषित करण्यात आलेली नाही. एक वाचलेला प्रवासी आसन क्रमांक 11 अ वर आढळून आला. त्याला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले असून तातडीचे उपचार करण्यात येत आहेत.

पंतप्रधान मोदी यांचा शोकसंदेश

दुर्घटना घडल्यावर त्वरित त्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली. ही घटना अत्यंत भीषण असून दु:ख व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे आहेत. या दुर्घटनेमुळे हानी झालेल्या सर्वांप्रती मी माझ्या भावना व्यक्त करतो. जितके शक्य आहे, तितक्या प्रमाणात प्रवाशांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी सूचना मी केली आहे. मन विषण्ण करणारी ही घटना आहे. हा धक्का अंत:करण विदीर्ण करणारा आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी भावना व्यक्त केल्या.

विमानाचा बहुतेक भाग जळून खाक...

संपर्क तुटला...

विमानाने उड्डाण केल्यानंतर त्याचा विमानतळावरील नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला, असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. तथापि, या वृत्ताला अधिकृत दुजोरा अद्याप देण्यात आलेला नाही, असेही समजते.

दोन मिनिटात खेळ खलास...

उड्डाण केल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांमध्ये होत्याचे नव्हते झाले, असे दिसून येत आहे. विमानावरचे चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर ते झपाट्याने खाली येऊ लागले. त्यानंतर खालच्या इमारतीवर ते कोसळले, असा घटनाक्रम आहे.

प्रचंड मोठा आवाज 

विमान कोसळताना प्रचंड मोठा स्फोटासारखा आवाज झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी स्पष्ट केले. या आवाजामुळै परिसरात प्रचंड घबराट उडाली होती. या आवाजाने काही इमारतींच्या काचा फुटल्याचे आढळले. आवाजाने घाबरलेल्या नागरीकांनी भूकंप झाल्याचे वाटून आपल्या घरांच्या बाहेर धाव घेतल्याचेही दिसून आले आहे.

अहमदाबाद विमान दुर्घटना

अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेने देशाला हादरवून सोडले आहे. या दुर्घटनेत प्रवासी किंवा चालक दलाच्या अनेक सदस्यांना जीव गमवावा लागला आहे. विमान टेकऑफ करते, तेव्हा त्यात इंधन पूर्ण भरलेले असते, यामुळे दुर्घटनेचे स्वरुप भीषण असते. विमानाने उड्डाण केल्यानंतर ते नजीकच्या इमारतीवर कोसळल्याने काही लोकांनाही प्राण गमवावे लागले. अशाप्रकारची भीषण घटना देशात प्रथमच घडली आहे. या दुर्घटनेचे कारण लवकरच समोर येईल.

दुर्घटनाग्रस्त विमानाविषयी...

गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरुवारी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यावर एअर इंडियाचे बी787 विमान व्हीटी-एएनबी दुर्घटनाग्रस्त झाले आहे. दुर्घटनाग्रस्त विमान बोइंग 787-8 ड्रीमलायनर असून याची नोंदणी व्हीटी-एएनबी अशी करण्यात आली होती. या विमानाचे पहिले उड्डाण 2013-14 मध्ये झाले होते आणि जानेवारी 2014 मध्ये हे विमान एअर इंडियाला सोपविण्यात आले होते.

18 बिझनेस क्लास सीट्स

बोइंग 787-8 विमान दोन क्लासमध्ये 248 प्रवाशांना सामावून घेऊ शकते. याचा वापर आंतरराष्ट्रीय दीर्घ पल्ल्यासाठी केला जातो. बिझनेस क्लासमध्ये 18 सीट्स असतात.

देशातील मोठे विमान आपघात

1996 : 349 मृत्यू,हरियाणामध्ये दोन विमानांची टक्कर

भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विमान अपघात 12 नोव्हेंबर 1996 रोजी हरियाणातील चरखी दादरीजवळ दोन विमानांची एकमेकांशी टक्कर झाल्याने  घडला. या दुर्घटनेत दोन्ही विमानांमधील सर्व 349 जणांचा मृत्यू झाला. वैमानिक आणि नियंत्रण कक्षातील असमन्वयामुळे हा अपघात झाला.

1978 : 213 मृत्यू,महाराष्ट्र : विमान अरबी समुद्रात कोसळले

1 जानेवारी 1978 रोजी मुंबईहून उड्डाण केल्यानंतर लगेचच बोईंग 747 अरबी समुद्रात कोसळले. दिशाहीनता आणि तांत्रिक बिघाडामुळे या अपघातात 213 जणांना आपला जीव गमवावा लागला. सदर विमान मुंबईहून दुबईला जात होते.

2010 : 158 मृत्यू,कर्नाटक : धावपट्टीवरून घसरल्यानंतर आग

22 मे 2010 रोजी एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइट 812 दुबईहून कर्नाटकमधील मंगळूर येथे येत असताना विमान धावपट्टीवरून पुढे जात दरीत कोसळल्यानंतर दोन भाग झाले. या अपघातात 158 जणांचा मृत्यू झाला.

1993 : 55 मृत्यू,औरंगाबाद विमानतळावर विमानाची ट्रकला धडक

26 एप्रिल 1993 रोजी इंडियन एअरलाइन्सचे विमान 491 औरंगाबादहून मुंबईला जात होते. विमानाचे उड्डाण होत असताना धावपट्टीवर ट्रक आल्यामुळे विमान त्याला आदळले. टक्कर झाल्यानंतर विमानाला आग लागली. या अपघातात 55 जणांचा मृत्यू झाला.

2020 : 21 मृत्यू,केरळ : एअर इंडियाचे विमान कोसळले

7 ऑगस्ट 2020 रोजी केरळमधील कोझिकोड येथे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान धावपट्टीवरून घसरून कोसळले. यामध्ये 21 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 110 जण जखमी झाले. यामध्ये कोरोना काळात वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईहून भारतीयांना आणले जात होते.

जगतिल मोठे विमान आपघात

1977 : 586 मृत्यू,स्पेनमध्ये मिसकम्युनिकेशनमुळे मोठी दुर्घटना

27 मार्च 1977 रोजी केएलएम फ्लाइट 4805 आणि पॅन एम फ्लाइट 1736 स्पेनमधील लॉस पाल्मास विमानतळावर उतरणार होते, परंतु  बॉम्ब स्फोटामुळे दोन्ही फ्लाइट लॉस रोडिओस विमानतळावर वळवण्यात आली. दोन्ही विमाने एकाच धावपट्टीवर आल्याने टक्कर होऊन 586 लोकांचा मृत्यू झाला.

1985 : 520 मृत्यू,जपानमध्ये टेकऑफनंतर डोंगर भागात कोसळले

12 ऑगस्ट 1985 रोजी जपान एअरलाईन्सचे बोईंग 123 विमान टेकऑफनंतर लगेचच डोंगराळ भागात कोसळले. या अपघातात 520 लोकांचा मृत्यू झाला. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सिंगल-विमान अपघात आहे.

1974 : 346 मृत्यू,तुर्कीमध्ये विमानाचा दरवाजा तुटल्याने दुर्घटना

3 मार्च 1974 रोजी तुर्की एअरलाईन्सचे विमान पॅरिसजवळील जंगलात पडले. उड्डाणादरम्यान केबिनचा दरवाजा अचानक तुटल्यामुळे हवेचा दाब बिघडून नियंत्रण सुटले. या अपघातात 346 जणांचा मृत्यू झाला.

1980 : 301 मृत्यू,सौदीमध्ये विमानाला लागली आग

19 ऑगस्ट 1980 रोजी रियाधहून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच सौदी एअरलाईन्सच्या लॉकहीड ट्रिस्टार विमानाला आग लागली. पायलटने विमान सुरक्षितपणे उतरवले, परंतु प्रवाशांना तातडीने बाहेर काढता आले नाही. परिणामी 301 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

2018 : 189 मृत्यू,इंडोनेशियात टेकऑफनंतर समुद्रात कोसळले

29 ऑक्टोबर 2018 रोजी जकार्ताहून इंडोनेशियातील पंगकल पिनांग शहरात जाणारे एक प्रवासी विमान टेकऑफनंतर 13 मिनिटांनी समुद्रात कोसळले. यामध्ये विमानातील सर्व 189 जणांचा मृत्यू झाला.

8 मिनिटात : विमानाचे उड्डाण अन् दुर्घटनाही : वैमानिकाला मिळाला केवळ 1 मिनिटाचा वेळ

8 मिनिटात काय-काय घडले?

एअर इंडियाचे बोइंग 787 ड्रीमलायनर हे मोठे विमान आहे. गुरुवारी दुपारी 1 वाजून 30 मिनिटाला विमान टेकऑफपूर्वी धावपट्टीवर होते. उपग्रहीय छायाचित्राच्या आधारावर 1.38 वाजता विमान धावपट्टीच्या अखेरच्या हिस्स्यात होते, विमानाने टेकऑफ केले आणि समुद्रसपाटीपासून 625 फूट उंचीवर विमानाने स्वत:चा सिग्नल गमाविला. विमानतळ समुद्रसपाटीपासून सुमारे 200 फूट उंचीवर आहे, म्हणजेच विमानाने विमानतळावरून सुमारे 400 फूटापर्यंत उंची गाठली होती. सुमारे 8 मिनिटांपर्यंत विमानाचा सिग्नल अॅक्टिव्ह राहिला आणि 1 वाजून 40 मिनिटांनी विमान कोसळले आहे. या विमानाचा वर्टिकल स्पीड पाहिल्यास ते 400 फूट प्रतिमिनिटाच्या वेगाने खाली येत होते. यादरम्यान वैमानिकाकडे काही करण्यासाठी एक मिनिटाचाही वेळ नव्हता.

उंचीवर असल्यास मिळाला असता वेळ

हे विमान समुद्रसपाटीपासून सुमारे 625 फूट उंचीवर होते, जर हे विमान 35 हजार फुटांच्या उंचीवर असते, तर चालक दलाला स्थिती सांभाळण्यासाठी अधिक वेळ मिळाला असता आणि अनेक लोकांना वाचविले जाऊ शकले असते. सुमारे 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगाल आणि कॅनडाचा एक नागरिक या विमानातून प्रवास करत होता.

दुर्घटना का घडली?

लोड फॅक्टरमध्ये मिस कॅलक्युलेशन झाले असावे, याचबरोबर लँडिंग गियर योग्यप्रकारे बंद झाले नव्हते, कारण एक चाक एका इमारतीत अडकलेले दिसून येतेय. याचा अर्थ विमानात संतुलन समस्येमुळे ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता आहे. परंतु पूर्ण चौकशीनंतरच ठोस कारण समोर येणार असल्याचे विमानोड्डाण तज्ञ डॉ. वंदना सिंह यांनी सांगितले आहे.

इंजिन फेल झाल्याची शक्यता अधिक

दुर्घटनेचा व्हिडिओ पाहता विमानाला इंजिनकडून थर्स्ट मिळत नसल्याचे आणि ते उंची गाठू शकत नसल्याचे स्पष्ट होते. व्हिडिओत इंजिनमध्ये आग किंवा धूर दिसून येत नसल्याचे उद्गार एव्हिएशन एक्सपर्ट आणि माजी विंग कमांडर आलोक सहाय्य यांनी काढले आहेत. तर अहमदाबाद विमानतळ बंद करण्यात आल्याने दुर्घटनेत धावपट्टीची भूमिका होती का, हे तपासले गेल्याचे संकेत मिळत आहेत. व्हिडिओत विमानाचे पंख योग्यस्थितीत अन् संतुलन ठीक असूनही ते खाली येत असल्याचे दिसून येते. विमानाच्या टेकऑफमध्ये एक क्रिटिकल स्टेज येते, जी पार केल्यावर गडबड दिसून आल्यास वैमानिक टेकऑफ रोखू शकत नाही, कारण अशास्थितीत अधिक हानीची शक्यता असते. एक इंजिनही काम करत असेल तर वैमानिक विमानाला उंचीवर नेऊ शकला असता आणि आपत्कालीन स्थितीत विमान लँड करवू शकला असता. यातून विमानाची दोन्ही इंजिन्स फेल झाल्याचे आणि विमानाला थर्स्ट मिळाले नसल्याचे स्पष्ट आहे. इंधनाचा पुरवठा इंजिनपर्यंत न पोहोचणे देखील संभाव्य कारण असू शकते, हे एखाद्या तांत्रिक किंवा इलेक्ट्रिकल बिघाडामुळे घडले असावे, असे सहाय्य यांनी म्हटले आहे.

दुर्घटनेची चौकशी करणार एएआयबी

अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेची विमान दुर्घटना चौकशी ब्युरो (एएआयबी) चौकशी करणार आहे. एएआयबीचे महासंचालक आणि एजेन्सीच्या चौकशी संचालकासह अन्य अधिकारी अहमदाबादसाठी रवाना झाले आहेत. विमानोड्डाण मंत्रालयाच्या अंतर्गत एएआयबी भारतीय हवाई क्षेत्रात विमानांशी निगडित सुरक्षा घटनांना दुर्घटना आणि गंभीर घटनांमध्ये वर्गीकृत करण्यासाठी जबाबदार आहे. एएआयबी दुर्घटनांची विस्तृत चौकशी करते आणि सुरक्षेकरता सुधारांचे उपायही सुचविते. तर विमान कंपनी बोइंगने दुर्घटनेसंबंधी अधिक माहिती जमविण्याचे काम करत आहोत, असे वक्तव्य केले आहे.

रेल्वे अन् राज्य सरकारही अॅक्शनमध्ये

भारतीय रेल्वेने अहमदाबाद येथून गुजरातच्या विविध हिस्स्यांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्पेशल वंदे भारत ट्रेन संचालित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर रेल्वेचे आपत्ती व्यवस्थापन पथकही विमान दुर्घटनास्थळी पोहोचले आहे. तर राज्य सरकारने त्वरित राज्य आपत्कालीन प्रतिसाद केंद्रात नियंत्रण कक्ष सक्रीय केला आहे. तेथून प्रभावित लोकांचे नातेवाईक 079-23251900 वर संपर्क साधू शकतात.

आपत्कालीन स्थितीत मेडे कॉल 

अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. हे विमान अहमदाबाद येथून लंडनसाठी रवाना झाले होते. परंतु विमान उड्डाणानंतर 5 मिनिटांच्या आतच दुर्घटनाग्रस्त झाले आहे. डीजीसीएनुसार विमानाने उड्डाण केल्यावर एअर  ट्रॅफिक कंट्रोलला मेडे कॉल केला, यानंतर एटीसीकडून विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तो अयशस्वी ठरला. अशाप्रसंगी मेडे कॉल काय असतो आणि कुठल्या स्थितीत तो वापरला जातो हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरले आहे.

मेडे कॉलचा अर्थ एक इमर्जन्सी 

कॉल असतो, ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असते. याचा वापर सर्वसाधारणपणे अत्यंत अधिक आपत्कालीन स्थितीत केला जातो. विमान मोठ्या संकटात सापडल्यावर हा कॉल केला जातो. विमानोड्डाणाच्या भाषेत हा एखाद्या मोठ्या धोक्याविषयी सांगणारा सर्वात आवश्यक संकेत असतो. संकट किंवा आपत्कालीन स्थितीची माहिती देण्यासाठी वैमानिक नियंत्रण कक्षाला ‘मेडे’ मेसेज देतो. या शब्दाचा वापर जीवाला धोका असल्यावर केला जातो.

कुठून आला हा शब्द

हा शब्द फ्रेंच ‘मैदे’ शब्दावरून घेण्यात आला आहे. या शदाचा अर्थ ‘माझी मदत करा’ असा आहे. मेडे कॉल सर्वसाधारणपणे रेडिओ कम्युनिकेशनद्वारे एटीसी किंवा आसपासच्या अन्य विमानांना ट्रान्समिट केला जातो. सिग्नलचा वापर इमर्जन्सीला कमी करणे आणि वेळेत आवश्यक कृती सुनिश्चित करण्यासाठी त्वरित मदतीची विनंती करण्यासाठी केला जातो.

केव्हा होतो वापर

या शब्दाचा वापर आपत्कालीन स्थितीत केला जातो. सर्वसाधारणपणे इंजिन फेल होणे, हवामानाची खराब स्थिती, कम्युनिकेशनमध्ये बिघाड किंवा वैद्यकीय आपत्कालीन स्थिती याचा वापर केला जातो. धोका जाणवताच वैमानिक रेडिओद्वारे तीनवेळा मेडे बोलतो व नियंत्रण कक्षाला संबंधित स्थितीची माहिती दिली जाते.

वैमानिकांची नावे आली समोर

अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले असून या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली आहे. अनेक प्रवाशांसोबत विमानातील कर्मचाऱ्यांनाही यात जीव गमवावा लागला आहे. तर या विमानात 2 वैमानिक आणि 10 केबिन क्रू होते. वैमानिकांची नावे कॅप्टन सुमीत सभरवाल आणि क्लाइव कुंदर अशी आहेत. विमानाची धुरा कॅप्टन सुमीत सभरवाल यांच्याकडे होती, तर त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंदर होते. कॅप्टन सुमीत सभरवाल यांच्याकडे 8,200 तासांचा अनुभव असलेली एलटीसी आहे. तर क्लाइव कुंदर यांच्याकडे 1,100 तासांचा फ्लाइट एक्सपीरियन्स होता.

कोण असतो फर्स्ट ऑफिसर

जेव्हा विमान उड्डाण करते, तेव्हा त्यात सर्वसाधारणपणे दोन वैमानिक असतात, ज्यात कॅप्टन विमानाचे उड्डाण करतो, तर सोबत एक फर्स्ट ऑफिसर असतो, जो सर्वसाधारणपणे ज्युनियर पायलट असतो. 5 वर्षांच्या अनुभवानंतर एखाद्या फर्स्ट ऑफिसरला कॅप्टनच्या पदावर पदोन्नती दिली जाते.

12 क्रू मेंबर

दुर्घटनास्थळी एटीएस पथक

विमान कोसळल्यानंतर दहशतवादविरोधी पथक  (एटीएस) दुर्घटनास्थळी पोहोचले. अखेर एटीएसला का पाचारण करण्यात आले? हा प्रोटोकॉलचा हिस्सा आहे का एखाद्या संभाव्य कटाचा तपास केला जात आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. खबरदारीदाखल एटीएसने अवशेषांची बारकाईने तपासणी सुरू केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article