For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भीषण...हृदयद्रावक...

06:30 AM Jun 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
भीषण   हृदयद्रावक
Advertisement

अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या बोईंग 787 प्रवासी विमानाला भीषण अपघात होऊन ते कोसळल्याने त्यातील बहुतेक प्रवाशांचा दु:खद अंत झाल्याचे वृत्त मनाला यातना देणारे आहे. या दुर्घटनेसंबंधी आतापर्यंत जी माहिती देण्यात आली आहे, ती पाहता ही दुर्घटना अचानक घडल्याचे दिसून येते. या विमानात 230 प्रवासी, 2 चालक आणि 10 कर्मचारी होते. त्या सर्वांचा मृत्यू झाला आहे, असे अधिकृतरित्या अद्याप घोषित करण्यात आलेले नसले, तरी या दुर्घटनेतून कोणीही वाचले असण्याची शक्यता नाही, असा स्पष्ट संकेत देण्यात  आल्याने काय घडले आहे, याची कल्पना येते. 1996 नंतरची ही अशा प्रकारची पहिलीच मोठ्या हानीची दुर्घटना आहे. हे विमान विमातळाजवळच्या नागरी वस्तीत कोसळल्यामुळे या दुर्घटनेची तीव्रता अधिकच वाढली. विमान कोसळण्यापूर्वी नजीकच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या भिंतीला आदळले. त्यामुळे या वसतीगृहाच्या भोजन कक्षात असलेले अनेक वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टरांवरही काळाची कुऱ्हाड कोसळली. दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. प्रथमदर्शनी हा अपघातच आहे, असे दिसून येत असले तरी, घातपाताची शक्यता पूर्णत: नाकारता येईल काय, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. चौकशीत सारे काही स्पष्ट होणारच आहे. त्यामुळे चौकशीचा निष्कर्ष हाती येईपर्यंत यावर टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही. तथापि, नुकताच पहलगाम येथे क्रूर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर भारताने त्याचा पुरेपूर बदलाही ‘सिंदूर’ अभियानाच्या माध्यमातून घेतला होता. पाकिस्तानला या अभियानातून जबर दणका देण्यात आला आहे. त्या देशाचा कुरापतखोर स्वभाव पाहता तो देश मिळालेल्या दणक्यातून धडा घेऊन स्वस्थ बसणारा नाही, हे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर हा विमान अपघात घडल्याने, कदाचित हा घातपात असावा काय, अशी शंका काहींच्या मनात उपस्थित झाली असावी. अर्थात, कोणत्याही अशा गंभीर दुर्घटनेचा तपास सर्व शक्यता गृहित धरुनच केला जातो. त्यामुळे तो पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. तथापि, या दुर्घटनेमुळे काही महत्त्वाचे प्रश्न निश्चितच निर्माण होतात. ते विमान प्रवासाच्या सुरक्षेसंबंधी आहेत. प्रवासी विमानांचे तातडीने लँडिंग होण्याच्या घटनांची वृत्ते अनेकदा दिली जातात. अशा घटना या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दर्शविणाऱ्या असतात, असे मानले जाते. असे अपघात बहुतेक सर्व देशांमध्ये कधीना कधी झालेले आहेत. त्यामुळे अशा त्रुटी भारतातच असतात असे म्हणता येणार नाही. तथापि, अलीकडच्या काळात विमान प्रवासाचे प्रमाण वाढले आहे. एकेकाळी केवळ मोजके धनाढ्या लोकच विमानाने प्रवास करु शकत. उच्च मध्यमवर्गीयांच्याही आर्थिक मर्यादेबाहेरही ही बाब होती. तथापि, गेल्या तीन दशकांमध्ये भारतात नागरी विमानवाहतूक व्यवसायाची अनेक पटींनी वाढ झाली आहे. त्यामुळे आज मध्यमवर्गियांसाठीही विमान प्रवास हे अप्रूप राहिलेले नाही. अशा स्थितीत विमान प्रवासाच्या सुरक्षेसंबंधी प्रशासनाने अधिक जागृत आणि सजग राहण्याची आवश्यकता अधोरेखित करणारी ही दुर्घटना आहे. या दुर्घटनेमुळे आणखी एक महत्त्वाची वस्तुस्थिती समोर आली आहे. ही वस्तुस्थिती मात्र, भारताच्या संदर्भात इतर देशांच्या मानाने अधिक दाहक आहे. आपल्याकडे विमानतळांजवळच नागरी वस्ती असते. त्यामुळे उ•ाण केल्यानंतर अल्पावधीत विमान कोसळल्यास ते नागरी वस्तीवर कोसळण्याची शक्यता दाट असते. अशा स्थितीत अशा नागरी वस्तीतील माणसेही दुर्घटनांमध्ये बळी पडू शकतात. मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या जवळ मानवी वस्ती असण्याचा प्रकार भारतातच अधिक प्रमाणात आढळतो. या दुर्घटनेतही विमान नागरी वस्तीवर कोसळल्याने अधिक मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे विमानतळांच्या जवळ नागरी वस्तीसाठी अनुमती देण्यासंबंधी प्रशासनाने पुनर्विचार करावयास हवा. विमान दुर्घटना नेहमी घडत नसल्या, तरी जेव्हा घडतात, तेव्हा त्यांच्यामुळे होणाऱ्या हानीचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे प्रत्येक शक्यता गृहित धरुनच सुरक्षेसंबंधी विचार करण्यात आला पाहिजे. विमानतळांच्या जवळ नागरी वस्ती असल्याचे दुष्परिणाम कसे होतात, हे या दुर्घटनेतून स्पष्ट झाल्याने यापुढे तरी शहर नियोजन करताना या बाबीचा विचार होण्याची आवश्यकता आहे. दुर्घटनाग्रस्त विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता असे प्रथमदर्शनी अनुमान या विमान दुर्घटनेसंबंधात काढण्यात आले आहे. संपर्क का तुटला, याची कारणे तपासाअंती स्पष्ट होतीलच. पण असे पुन्हा घडू नये, यासाठी तपास पारदर्शीपणे करुन नेमक्या चुका काय झाल्या आणि त्यांचे उत्तरदायित्व कोणाचे, हे स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. बऱ्याचदा मोठे अपघात झाल्यानंतर प्रारंभी मोठी हालचाल केली जाते. पण नंतर प्रकरण साऱ्यांच्या विस्मृतीत जाते आणि पुन्हा तशी गंभीर घटना घडेपर्यंत ते विस्मृतीतच राहते. दुर्घटना घडण्याची कारणे अनेक असतात. तांत्रिक बिघाड, मानवी चूक, नैसर्गिक परिस्थिती अनुकूल नसणे, हेतुपुरस्सर पेले गेलेले दुर्लक्ष किंवा कारस्थान अशा अनेक कारणांमुळे दुर्घटना घडू शकते. यांमधील काही कारणे माणसाच्या हातात असतात तर काही बाबी हातात नसतातही. पण जे घडले आहे, त्याचा योग्य तपास करुन पुढे ती चूक टाळण्याची कृती तर निश्चितच करता येते. तसे यावेळी करण्यात आले तरी तीही एक सकारात्मक बाबच ठरणार आहे. मात्र, यासाठी वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून घटनेकडे पहावयास हवे. तसेच तिचे राजकारण करण्याचा मोहही टाळावयास हवा. केवळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने किंवा जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केल्याने तात्पुरती सोय होऊ शकेल. पण त्यामुळे समस्येवर तोडगा निघू शकत नाही. आपल्याकडे राजकारण हे इतके संवेदनशील आणि स्पर्धात्मक झाले आहे, की कोणत्याही घटनेला राजकीय रंग देण्याची वृत्ती टाळणे कित्येकांना कठीण जाते. तसे न करता या घटनेचा तपास आणि नंतरची कृती झाल्यास ते व्यापक हितासाठी योग्य ठरेल.

Advertisement

Advertisement
Tags :

.