For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशी भविष्य २०२६-वृषभ

10:39 AM Jan 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
राशी भविष्य २०२६ वृषभ
Advertisement
प्रशांत अर्जुनवाडकर
मो: 9611663465

वृषभ राशीचे लोक शांत स्वभावाचे असतात. खूप हुशारीने काम करण्याची कला अवगत असते. पुस्तक वाचन, खेळ, नृत्य आणि गायन कलेची आवड असते. कठोर परिश्रमावर विश्वास ठेवतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी पूर्ण समर्पणाने काम करणे, ही त्यांची खासियत आहे. कधीही दिखावा न करता सकारात्मक विचारसरणीने जीवन जगतात. या लोकांसाठी आराम आणि विलासिता महत्वाच्या आहेत, खवय्ये असून सुंदर कपडे परिधान करणे व आरामदायी जीवनशैलीवर विश्वास ठेवतात. सौंदर्य आणि कला यांचे आकर्षण असते.

Advertisement

वृषभ राशीचे लोक पृथ्वी तत्वाचे असून दृढनिश्चयी असतात. जीवनातून काय हवे आहे हे माहीत असते आणि ते दृढनिश्चयाने साध्य करतात. कोणत्याही क्षेत्रातील सर्वात यशस्वी लोकांपैकी एक बनतात. वृषभ राशीची आणखी एक ताकद म्हणजे निष्ठा. एकदा त्यांचा विश्वास संपादन केला की, ते शेवटपर्यंत इतरांशी एकनिष्ठ राहतील. खूप भावनिक असतात आणि समस्या सोडवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घेतात. कोणी मदत केली नाही तर हे लोक निराशेत अडकू शकतात. शीघ्रकोपी असल्यामुळे समस्या आल्यास त्यांना पटकन राग येतो. या राशीचे लोक दु:खाच्या दिवसात कोलमडून जातात. त्यामुळे समस्येला सामोरे जाण्याची त्यांची क्षमता कमी होते. तणाव कमी करण्यासाठी त्यांना त्यांचे नातेवाईक आणि मित्रांची आवश्यकता असते. या राशीच्या लोकांना त्यांची क्षमता चांगलीच माहीत असते. त्यांना पैसा, मालमत्ता आणि आदर आवडतो. या राशीचे लोक योग्य ठिकाणी पैसे गुंतवण्यावर विश्वास ठेवतात आणि आर्थिक समजुती राखण्यासाठी नेहमीच अनेक पोर्टफोलिओमध्ये काम करतात. दृढनिश्चयी आणि कठोर निर्णय घेण्यासही ते मागेपुढे पाहत नाहीत. शिस्तीचे प्रचंड भोक्ते असल्यामुळे कधीच गाफील राहणे त्यांना आवडत नाही. हे लोक मनापासून खरे असतात आणि कोणालाही मदत करण्यास नेहमी तत्पर असतात. आपल्या तत्त्वांवर खूप ठाम राहतात. खूप मेहनती असल्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायात आणि कार्यक्षेत्रात भरपूर यश मिळते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही कामुकतेची भावना असल्याने नेहमी सर्व क्षेत्रात भौतिक सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात. आपले काम ठराविक वेळेत पूर्ण करतात आणि इतरांच्या प्रयत्नांचेही कौतुक करतात. कोणत्याही भूलथापांना बळी पडत नसल्याने त्यांना आकर्षित करणे सोपे नाही. खूप भौतिकवादी असल्याने अमूर्त गोष्टींपेक्षा पैसे आणि मालमत्तेला महत्त्व देतात. यांची प्रतिमा समाजात एक लोभी व्यक्ती अशी होऊ शकते.

वडिलांकडे भूमीसंबंधी काम किंवा त्यातून एखाद्या उपजीविकेचे साधन असते. या राशीच्या मुलांना बहुतांश तामसी भोजनात स्वारस्य असते. आई आणि पतीची मदत किंवा आई आणि पत्नीच्या मदतीने घरातील ताळमेळ साधू शकतात. हे लोक जोडीदाराच्या आधीन राहणे पसंत करतात. डोक्यामध्ये नेहमी काहीतरी नवीन करण्याचा विचार असतो.

Advertisement

ग्रहमान

वर्ष आरंभ ते एक जूनपर्यंत गुरु मिथुन राशीत आहे. एक जून ते 31 ऑक्टोबर गुरु कर्क राशीला जाणार. पुढे ऑक्टोबर 31 ते 24 जानेवारी 2027 पर्यंत गुरु सिंह राशीला असून पुन्हा वक्रगत्य कर्क राशीला येत आहे. मिथुनेचा गुरु आर्थिक प्रगतीस चांगला. कुटुंबात शुभ घटना घडणार आहेत. सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारामध्ये हमखास यश मिळणार आहे, कोणतेही व्यवहार विशेष करून आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडणार आहेत. तिसरा म्हणजे कर्केचा गुरु अचानक शुभ घटना घडवणार. लेखन कार्यामध्ये प्रसिद्धी मिळणार आहे. आपल्याला छोटे मोठे प्रवाससुद्धा घडणार आहेत. चतुर्थातील सिंहेचा गुरु आपल्यासाठी थोडा संतुलित राहणार आहे पण एकंदरीत गुरुचे हे सर्व भ्रमण आपल्यासाठी अनेक मार्गाने शुभ ठरणार आहे. विशेष करून मिथुन आणि कर्पेचा गुरु विवाहासाठी उत्तम गुरुबळ देणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला दुसऱ्या भावात असल्याने आर्थिक स्थिती सुधारू शकते, तर मिथुन राशीत प्रवेश केल्यावर अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

वर्षभर शनि एकादश स्थानात राहणार असून लाभात राहणार आहे. या शनीची फळे एकंदरीत चांगली मिळतील. आर्थिक प्रगती चांगली होत राहणार. जुनी येणी वसूल होतील. उद्योग धंद्यामध्ये प्रगती मिळणार. कामांमध्ये आपला नावलौकिक असणार आहे. मानसन्मानसुद्धा व महत्वाकांक्षा वाढणार आहे. जवळजवळ आपली सर्व इच्छाआकांक्षा पूर्ण होणार आहे. तिसरी दृष्टी पहिल्या भावावर असल्याने आरोग्य आणि आळस जाणवू शकतो. 25 नोव्हेंबरपर्यंत राहू कुंभ राशीला असून पुढे मकर राशीला जात आहे. म्हणजे आपल्या कर्मस्थानात आहे. कमी जास्त प्रमाणात राहूचे फळ आपल्यासाठी शुभ घटना घडवणारे आहे. कामाच्या ठिकाणी आनंदाचे वातावरण असेल. 25 नोव्हेंबरपर्यंत केतू सिंह राशीला म्हणजे केतूचे भ्रमण आपल्यासाठी तितकेसे शुभ राहणार नाही. स्थावर अडचणी संभावणार. कुटुंबात कलह वाढू शकतो. विशेष करून स्थावर प्रॉपर्टीसाठी केतूच्या भ्रमणामध्ये अनिष्ट फळे मिळतील. त्यासाठी वादविवाद टाळणे बरे.

नोकरदार

या कालावधीत आपण आत्मविश्वासपूर्ण असाल. सरकार किंवा सार्वजनिक कामात आपल्या अधिकाराचे आणि सत्तेचे वजन वापरू शकाल. मुक्तहस्ते खर्च कराल. कामातून किंवा व्यवसायातून मिळणारे उत्पन्न आणि पत उंचावेल आणि त्यातून अधिक लाभ होईल. विरोधकांची हार, वाढलेली संपत्ती, ज्ञानार्जन आणि वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. जवळचे प्रवास लाभदायी ठरू शकतात. हा प्रवास तुम्हाला मानवता, तत्वज्ञान आणि सखोल दृष्टी शिकवेल. व्यावसायिक आणि घरच्या पातळीवरील जबाबदाऱ्या सफाईदारपणे पार पाडाल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या धाडसी वृत्ती दाखवाल. आपल्या नातेवाईकांसाठी विशेषत: जोडीदारांसाठी हा अनुकूल कालावधी आहे. करिअरमध्ये प्रयत्न केल्यास यश निश्चित आहे. भौतिक वस्तुंचा तुमच्या आयुष्यात समावेश होईल. विरोधक आपल्या कार्यात अडथळे निर्माण करू शकणार नाहीत. या काळात बऱ्याच इच्छा पूर्ण होतील. व्यावसायिक आयुष्यात आपण अशी उंची गाठाल, ज्यामुळे आपल्याला मोबदला आणि ओळख असे दोन्ही मिळेल. आपल्या प्रयत्नांमुळे उत्पन्नामध्ये वाढ होईल. कौटुंबिक आयुष्य सुखी असेल. एखादी चांगल्या नोकरीची संधी, मोबदला, हुद्दा किंवा बढती मिळणे शक्य आहे. आपल्यातील संगीतकलेचा आनंद घेऊ शकाल. कामाशी आणि समाजाशी संबंधित तुमची तत्वे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाल, तेव्हा त्यातून आर्थिक लाभ होईल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढ होईल. तुमचे सहकारी/भागिदारांकडून लाभ होईल. अनैतिक मार्गाने पैसा कमावण्याकडे कल असेल. तुमची स्वयंशिस्त, स्वयंनिरीक्षण आणि स्वनियंत्रण हे  फायदेशीर ठरणार आहे. वरिष्ठ आणि अधिकारी व्यक्तींशी मैत्रीपूर्ण संबंध राहतील आणि त्याचप्रमाणे औद्योगिक वर्तुळ वाढेल. मालमत्तेशी संबंधित काही प्रकरण असेल तर ते न्यायालयाबाहेर सोडवणे चांगले.

स्त्री वर्ग

वर्षाची सुरुवात कुटुंबातील एखाद्या सदस्याशी संबंधित चांगल्या बातमीने होईल. या काळात, मित्रांच्या मदतीने दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकता राहील. करिअर किंवा व्यवसायासाठी केलेला प्रवास खूप फायदेशीर ठरेल. जोडीदाराशी तुमचा समन्वय आणि विश्वास वाढेल. या काळात, तुम्हाला मित्र आणि कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. विवाहित जोडप्यांनी आनंदी नातेसंबंधासाठी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून त्यांच्या जोडीदारासाठी वेळ काढावा. त्यांच्या भावना आणि गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. जे लोक करिअर किंवा व्यवसायात बराच काळ कठोर परिश्रम करत होते त्यांना या काळात चांगले यश मिळू शकते. काम करणाऱ्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळण्याची चिन्हे देखील आहेत. जे नवीन नोकरी शोधत होते किंवा बदलाचा विचार करत होते, त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. या काळात तुम्हाला प्रत्येक पावलावर चांगले निकाल मिळतील आणि मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. कुटुंबातील सदस्यही तुमच्या निर्णयांचे कौतुक करतील. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित नवीन संधी मिळू शकतात. राजकारणात असलेल्यांना एखादे महत्त्वाचे पद किंवा जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे समाजात तुमची ओळख वाढेल. बराच काळ जमीन, घर किंवा वाहन खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करत असाल तर या वर्षी तुमची योजना पूर्ण होऊ शकते. प्रेमाचे लग्नात रूपांतर करण्यासाठी कुटुंबाकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तुमचे मित्रदेखील यामध्ये तुम्हाला मदत करतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. वर्षाच्या शेवटी, तुम्हाला काही शुभ कार्यात किंवा समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. आरोग्य चांगले राहील. तुमची पत वाढेल आणि शत्रूंचा बिमोड होईल. या काळात  तुमचा चांगला विकास होईल.

विद्यार्थी 

विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळण्याची शक्यता आहे. तुमची एकाग्रता वाढेल. पूर्वीपेक्षा खूप चांगला सराव होईल आणि निकालांमध्ये सकारात्मक परिणाम दिसतील. परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळण्याची अपेक्षा आहे. स्पर्धात्मक परीक्षार्थींसाठी हा काळ अनुकूल आहे. एकंदरीत, या काळात तुम्ही शिक्षणाशी संबंधित सर्व कामांमध्ये यश मिळवू शकता. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास शिक्षणात मोठी प्रगती करू शकाल.

  • राशीस्वामी - शुक्र 
  • शुभवार  - शुक्रवार 
  • अशुभ वार - शनिवार 
  • घात मास  - मार्गशीर्ष 
  • शुभ रंग - पांढरा व गुलाबी 
  • भाग्यरत्न  - हिरा 
  • आराध्य देवता - श्री कुलदेवता
Advertisement
Tags :

.