For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशी भविष्य २०२६-मेष

10:20 AM Jan 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
राशी भविष्य २०२६ मेष
Advertisement
प्रशांत अर्जुनवाडकर
मो : 9611663465

मेष राशीच्या व्यक्ती त्यांच्या उत्साही, धाडसी आणि स्वतंत्र स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्या पुढारी वृत्तीच्या, ऊर्जेने भारलेल्या असतात. आव्हानांचा आनंद लुटतात. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी उत्साही असल्याने जोखीम घेण्यास आणि आव्हानांना तोंड देण्यास घाबरत नाही. इप्सित ध्येय साध्य करण्यासाठी आणि स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रेरित असतात. एकाच वेळी अनेक कामांचा डोलारा सांभाळू शकतात. कामाचा वेग व व्यवस्थितपणा यात या राशीच्या व्यक्ती वाकबगार असतात. परिस्थितीनुसार गिअर्स बदलण्याची कला यांना अवगत असते.

Advertisement

मेष राशीचे लोक त्यांच्या मित्रांशी अत्यंत विश्वासू असतात. या राशीच्या लोकांमधील सर्वोत्तम गुण म्हणजे ते सर्व परिस्थितीत खूप सकारात्मक असतात आणि कठोर परिश्रम घेत नेहमीच जिंकण्याचा विचार करतात. खूप ताण आला तर आवेगाने प्रतिक्रिया देऊ शकतात किंबहुना अगदी लहानसहान गोष्टींवरही सहजपणे नाराज होतात. मेष राशीच्या लोकांना जलद कृती हवी असते. स्वत:मध्ये रमून जातात. स्वत:च्या ध्येयांवर आपले लक्ष केंद्रित केल्याने कधीकधी इतरांबद्दल विचार करण्याची उणीव भासते. जास्त प्रतिक्रिया देतात आणि नंतर आपल्या अशा वागण्याबद्दल पश्चात्ताप करतात. नेहमीच कोणत्याही कामात आघाडीवर राहू इच्छितात. हार मानणे हा शब्द यांच्या शब्दकोषात नसतो. कोणी यांना शिकवण्याचा किंवा वाद घालण्याचा प्रयत्न केला तर पटकन निराश होतात. आपल्या समस्या इतरांसोबत सहजपणे शेअर करायला आवडत नाहीत. संकटातही सकारात्मक राहून नवीन संधी शोधत असतात. जेव्हा परिस्थिती बिघडते तेव्हा ते त्यांच्या जवळच्यांना सर्वकाही सांगतात. समस्यांच्या काळात हिंमत गमावत नाहीत. प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने तोंड देतात. परिस्थिती सुधारेपर्यंत आराम बसत नाहीत. कधीकधी समस्यांमुळे कुटुंबापासून दूरही जातात. यश प्राप्त होईपर्यंत त्या घटनेशी झगडत राहतात. त्यांची दानी वृत्ती वाखाणण्याजोगी असते. देणग्या देण्यासाठी प्रचंड खर्च करतात. ते सहसा सरळमार्गी व उघड मनाचे असतात. व्यावहारिकदृष्ट्या जगण्याची कला शिकतात. पैशापेक्षा प्रसिद्धी जास्त आवडते. सहसा त्यांचा स्वर आक्रमक असतो. कोणतेही काम सहजपणे सोडत नाहीत. जे काम हाती घेतात ते आत्मविश्वासपूर्वक तडीस नेतात. दृष्टी खूप तीक्ष्ण असते. मानवी हक्कांसाठी लढतात आणि नैतिक मूल्यांसह जगतात. जलद विचार करणारा स्वभाव कधीकधी घाईघाईने निर्णय आणि कृती करण्यास कारणीभूत ठरू शकतो. मेष राशीचे लोक राग आणि निराशेला बळी पडू शकतात. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे सहसा जमत नाही.

ग्रहमान

Advertisement

वर्ष आरंभ ते एक जूनपर्यंत गुरु मिथुन राशीत आहे. एक जून ते 31 ऑक्टोबर गुरु कर्क राशीला जाणार. पुढे 31 ऑक्टोबर ते 24 जानेवारी 2027 पर्यंत गुरु सिंह राशीला असून पुन्हा वक्रगत्य कर्क राशीला येत आहे. मिथुनेच्या गुरुत दूरचे प्रवास घडणार आहेत. कर्केचा गुरु अतिशय शुभ राहणार आहे. सर्व प्रकारचा आर्थिक लाभ घडणार आहे. पाचवा गुरु अनेक दृष्टीने शुभ फलदायक ठरणार आहे. सर्व बाबतीत हा गुरु शुभ राहणार आहे. वर्षभर लग्नासाठी गुरुबळ उत्तम राहणार. शनि वर्षभर मीन राशीला म्हणजे आपल्या 12 व्या स्थानी राहणार आहे. साडेसाती मधील पहिल्या अडीच वर्षाचा कालखंड सुरू आहे. गुरू महाराजांची कृपा असल्यामुळे शनीचा त्रास फारसा जाणवणार नाही तरीपण कामाच्या ठिकाणी स्थलांतर संभवते. आर्थिक नियोजन करावे लागेल. विद्याभ्यासात कष्ट घ्यावे लागतील.

25 नोव्हेंबरपर्यंत राहू कुंभ राशीला असून पुढे मकर राशीला जात आहे. म्हणजे राहू जवळजवळ वर्षभर कुंभ राशीला म्हणजे मेष राशीला लाभस्थानी राहणार आहे. हा राहू अनुकूल राहील. पैसे येतील तसे जातीलसुद्धा. 25 नोव्हेंबरपर्यंत केतू सिंह राशीला म्हणजे मेष राशीला पाचवा आहे. विद्यार्जन व  संततीबाबतीत सावध राहा. गर्भवतींनी जास्त काळजी घेतली पाहिजे. केतूचे भ्रमण अशुभ राहणार आहे. शनिची कृपा होण्यासाठी प्रत्येक शनिवारी शनि किंवा मारुतीला जावे व हनुमान चालीसा पठन करावे. साडेसातीमध्ये आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. विशेष करून शरीरच्या वरच्या भागाची. कुणाच्या कामांमध्ये ढवळाढवळ करू नका. कोणाचीही मदत घेऊ नका आणि कुणालाही मदत करू नका. गाडी सावकाश चालवा. साधे सुधे आरोग्याच्या तक्रारीसुद्धा रौद्र रूप  घेऊ शकतात. त्यासाठी शक्यतो आरोग्याची काळजी घ्या.

नोकरदार

नोकरीच्या दृष्टिकोनाने या वर्षीच्या सुरुवातीपासून शनीची स्थिती पाहता काही प्रमाणात समस्या उद्भवतील. तथापि, अपेक्षेपेक्षा अधिक मेहनत करण्याची गरज आहे. हा साडेसातीचा आरंभ काल आहे. खर्चावर ताबा न ठेवल्यास आर्थिक टंचाई उद्भवेल. या काळात लांबचे प्रवास करताना काळजी घ्यावी लागेल. शनीचा स्वभाव विलंब व वेदनादायी आहे. परंतु अखेरीस फळ मिळेल, त्यामुळे धिराने वाट पहावी. कौटुंबिक समस्या आणि त्यातून निर्माण होणारा तणाव यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल. मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी व्यवहारांबाबत सतर्कता पाळावी लागेल. घसा, तोंड आणि डोळ्यांचे विकार संभवतात. या काळात चैनीच्या वस्तु आणि ऐषआराम उपभोगाल, पण त्या व्यवस्थित आहेत अथवा नाहीत यांची शहानिशा करा. प्रेमप्रकरणात अपेक्षाभंग आणि कौटुंबिक आयुष्यात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. विरोधक या ना त्या प्रकारे नामोहरम करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे खासगी वा व्यावसायिक पातळीवर कोणाशीही व्यवहार करताना जपून वागा. कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणामुळे चिंता. आर्थिकदृष्ट्या हा वाईट काळ नसला तरी खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रकृती जपा. फिरण्याच्या आंतरिक इच्छेमुळे तुम्ही या काळात चंचल असाल. धार्मिक कार्यांकडे ओढा असेल आणि तीर्थ पर्यटन कराल. या काळात जागा आणि नोकरी दोन्ही बदलण्याची शक्यता आहे. मन:शांती ढळू देऊ नका अन्यथा मानसिक ताण येईल. कुटुंबातील सदस्यांची वागणूकही थोडीशी वेगळी असेल. मोठी गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. सहकाऱ्यांची साथ मिळविण्यासाठी गोडीगुलाबीने वागा. आपल्या प्रतिमेला धक्का बसू नये यासाठी धूर्त मित्रांपासून सावध राहा.

विद्यार्थी 

हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी चांगले आहे. या वर्षी दिलेल्या परीक्षांचे निकाल तुमच्यासाठी आनंददायी ठरतील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ आव्हानात्मक असेल आणि तुमची कोणतीही घाई किंवा शॉर्टकट उपयुक्त ठरणार नाही. तथापि, वर्षाचा शेवटचा भाग स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सहभागी होणाऱ्यासाठी अनुकूल आहे. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर तेथील एखाद्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश घेऊ शकता.

स्त्री वर्ग

या वर्षी तुम्हाला अत्यंत सावधगिरीने आणि शहाणपणाने पुढे जावे लागेल. नियोजित काम वेळेवर पूर्ण न झाल्यास हताश न होता परिस्थिती पाहून धिटाईने सामोरे जा. या अडचणी जास्त काळ टिकणार नाहीत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकारी दोघांसोबत एकत्र काम करा. अधिक मेहनत घ्यावी लागेल. वर्षाच्या मध्यात बोलण्यावागण्यावर नियंत्रण ठेवा. अन्यथा, यापूर्वी केलेल्या कामावर व नातेसंबंधावर परिणाम संभवतो. हेच सूत्र प्रेम संबंधांनादेखील लागू पडते. वर्षाच्या सुरुवातीला थोडासा नफा मिळविण्याच्या मागे लागून मोठे नुकसान अंगलट ओढून घेऊ नका. फसवणूकीपासून सावध राहा, अन्यथा गुंतवलेले पैसे अडकू शकतात. निरुपयोगी गोष्टींमध्ये अडकण्याऐवजी, तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. दिशाभूल करणाऱ्या विरोधकांपासून सावध राहा. निरुपयोगी वादात अडकू नका, काळजीपूर्वक व शांत चित्ताने योग्य निर्णय घ्या. प्रसंगी दिनचर्या बदला. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बजेटपेक्षा जास्त खर्च करावा लागेल. कोणतीही विशेष योजना राबवण्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. कोणत्याही परिस्थितीत न गोंधळता योग्य निर्णय घ्या. वर्षाच्या मध्यात मुलांशी संबंधित चांगली वार्ता कानी पडेल. मालमत्ता खरेदीचे स्वप्न साकारेल. घरी कोणताही धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन कराल. मौसमी आजार डोके वर काढतील. स्नायूंचा ताण आणि वेदना यासारख्या समस्या असतील. कुठेही गुंतवणूक करताना किंवा खर्च करताना, बजेट लक्षात ठेवावे लागेल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा, यामुळे तुम्हाला चांगली माहिती मिळेल. तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी शिस्तबद्ध दिनचर्या ठेवा. योगासने, ध्यान इत्यादी करा. आयुष्यात येणाऱ्या विविध प्रसंगांना शांतपणे सामोरे जावे लागेल.

राशीस्वामी - मंगळ 

शुभवार - मंगळवार 

अशुभ वार - रविवार  

घात मास - कार्तिक 

शुभ रंग - लाल व नारिंगी 

भाग्यरत्न - पोवळा 

आराध्य दैवत - श्री गणेश

Advertisement
Tags :

.