राशिभविष्य खजाना
नमस्कार . . .स्पेशल नमस्कार. बाहेर गावाहून कोकणात आलेल्या लोकांना ज्यांनी कोकणामध्ये होळीचे/शिमग्याचे पारंपरिक स्वरूप टिकवून ठेवले आहे. कोकणात वर्षभर आपण देवाच्या मंदिरात जातो, शिमग्यात देव आपल्या घरी येतो! असे कित्येक लोक आहेत ज्यांना शिमग्यामध्ये किंवा गणेश चतुर्थीमध्ये रजा मिळाली नाही तर ते सरळ नोकरीला रामराम ठोकून आपल्या गावी येतात. अशा लोकांमुळेच संस्कृती टिकून राहिली आहे. कोकणातला होळी उत्सव म्हणजे शिमगा. पण या शिमगा शब्दाचा अर्थ काय? ‘शिमगा जाई आणि कवित्व राही’ अशी एक म्हण आहे. या शिमग्याचा अर्थ जोर जोराने आवाज काढणे, आणि अगदीच शब्दश: अर्थ बघितला तर बोंबा मारणे. म्हणूनच ‘××× नावाने शिमगा केला’ असा वाक्मप्रचार मराठीमध्ये रूढ झाला. मागच्या वेळी सांगितले ते पॅथार्सिस -मानसशास्त्रानुसार एखादी गोष्ट मनामध्ये ठेवून घेतली किंवा दाबून ठेवली तर त्याचा परिणाम मनावर आणि शरीरावर दोन्ही प्रकारे होतो. आयुर्वेदामध्ये विरेचन म्हणतात किंवा वमन म्हणतात, त्यालाच मानसशास्त्रामध्ये पॅथार्सिस म्हणतात. याचा अर्थ काय? तर कोणत्याही प्रकारे मनातील सगळ्या नकारात्मक भावनांना वाट करून देणे. आपल्या पूर्वजांनी अत्यंत कल्पकतेने वर्षाच्या शेवटी, चैत्र प्रतिपदेच्या आधी-नवीन वर्ष सुरू होण्याआधी, ठेवलेल्या या सणामध्ये शिव्या-आरडा-ओरडा यांच्या माध्यमातून, या सगळ्या नकारात्मक भावना मनातून निघून जातात. एक प्रकारे मनाची अंघोळच म्हणा ना, आणि मन हलके होते-शुद्ध होते. होळी उत्सवाचा असाही अर्थ आहे हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. होलिका स्वत: जळून मेली, एका अर्थाने राक्षसी महत्त्वाकांक्षेवर भक्ति व श्र्रद्धेने विजय मिळवला आणि त्या सणाला किंवा त्या घटनेला साजरे करण्याकरता आपण होलिकोत्सव साजरा करतो. म्हणजे वाईटावर चांगल्या गोष्टींचा विजय. एक छोटीशी गोष्ट आणखीन आहे. ढुंढी नावाची एक राक्षसीण होती. ती लहान मुलांना ठार मारायची. कशी ? तर मायेने जवळ घेऊन मिठीत घेऊन गळा चिरून किंवा गळा दाबून. गावकऱ्यांना वाटले की या राक्षशिणीला आवरण्याकरता आपण काही केले पाहिजे. त्यांनी एक युक्ती केली. प्रत्येक घरातून पाच गोवऱ्या घरच्या मोठ्या माणसाने आणाव्यात आणि ठिकठिकाणी होळी पेटवावी, मोठ्याने आवाज करण्याकरता बैलाच्या चमडीपासून तयार केलेली टिमकी आणि तोंडाने आवाज करण्याकरता बोंब मारणे त्याचा आधार घेतला गेला. राक्षसीण घाबरली आणि तिने गावात यायचे बंद केले. याच प्रथेला कोकणामध्ये शिमगोत्सव म्हणून साजरे केले गेले. कोकणामध्ये गणपती आणि शिमगोत्सव हे प्रमुख सण मानले जातात. या सणांच्या दरम्यान पालख्या घरी येतात, नाचवल्या जातात. महाशिवरात्रीनंतर जेव्हा ऋतू बदल होतो आणि उष्णतेच्या झळा असह्य होऊ लागतात तेव्हा आणि वसंताला सुऊवात झाल्यानंतर येणाऱ्या फुलांच्या रंगाला आपल्या आयुष्यात स्थान देण्याकरता हा रंगोत्सव सुरू झाला. सुऊवातीच्या काळामध्ये एरंडाच्या खोडाला जमिनीत गाडून पाच गोवऱ्या ठेवून एका विशिष्ट मुहूर्तावरती त्या पेटवून आवाज करून होळी पेटवली जायची. हरभरा आणि इतर धान्याची जी पैदास होत होती त्यातल्या धान्यांपासून तयार केलेली मिठाई त्या होळीमध्ये अर्पण केली जाई. आपल्या मनातील विकार, द्वेष, मत्सर यांना दूर करण्याकरता प्रतिकात्मकरीत्या होळी पेटवली जाते. शिव्या देणे हे एक प्रकारे मानसिक स्वास्थ्याकरता गरजेच्या असलेल्या, ज्याला आपण मॉडर्न सायन्समध्ये ‘लेट गो’ म्हणतो तो प्रकार होता. यामध्ये जात, धर्म, पंथ असे काहीही नव्हते. होता तो फक्त उत्सवाच्या निमित्ताने करण्यात येणारा सोहळा. होलिका दहनाच्या वेळेला एरंड, नैसर्गिक रंग, पाणी धुळवडी करता वापरली जाणारी गोवऱ्यांची राख हे महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे होळीला प्रसाद म्हणून पुरणपोळी अर्पण केली जायची त्याप्रमाणे नरसिंह अवताराला नैवेद्य दाखवावा. शरभ अवताराचीपण पूजा केली जावी. हा अवतार हा नरसिंहाला कंट्रोल करण्याकरता घेतलेला शिवाचा अवतार आहे. या शिवाच्या अवताराला जेव्हा राग अनावर झाला तेव्हा गंडभैरूड हा अवतार विष्णू अवतार झाला. या सगळ्या लिंक आपण कुठेतरी विसरलो आहोत असे वाटत नाही? असो. होळी कशी साजरी करावी-दहनाचा मुहूर्त- 14/03/2025 रात्री 11.26 ते 12.35. देशी गाईच्या शेण्या गोळ्या करव्या. (झाडाची लाकडे जाळून पर्यावरणाला हानी करू नये). होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करावे. होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करावी. होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाग्याने बांधावे. शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करावे. पूजेनंतर एक कलश पाणी, अक्षता, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती द्यावी. नवीन धान्याचा अंश जसे, गहू, चणे इत्यादींच्या लोंबी यांचीही आहुती द्यावी. धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी होळीची राख कपाळावर लावताना ‘वंदितासी सुरेंद्रेंण ब्रह्मणा शंकरेणच। अतस्त्वां पाहीनो देवी भूते भूतिप्रदाभव।। म्हणजे ‘हे होलिका देवी तुला ब्रह्मा, विष्णू आणि शंकरानी वंदन केले आहे, म्हणून तू आमचे रक्षण कर.’ हा श्लोक म्हणून प्रार्थना करावी. एक सांगू का? पाण्याची नासाडी करू नये, चंद्र खराब होतो, वडीलधाऱ्यांचा अपमान-सूर्य खराब, मुलींचा अपमान-बुध खराब, भांडणे-मंगळ खराब, देऊळ-ब्राह्मण यांचा अपमान- गुऊ खराब, स्त्रियांचा अपमान-शुक्र खराब, नोकरांवर दादागिरी-शनी खराब, खोटे आरोप-राहू खराब, जनावरांना रंग लावणे-केतू खराब. आता तुम्हीच ठरवा, आपल्या हाताने आपली कुंडली खराब करावी की आनंदाने परंपरागत होळी साजरी करायची!!
मेष
प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. आपण घेत असलेल्या मेहनत व परिश्र्रमाचे चीज होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक केले जाईल. नवीन कार्याची सुऊवात करण्यास अनुकूल काळ असून, भविष्यात लाभ मिळतील. परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम काळ. वैवाहिक जीवनात काही मतभेदांना सामोरे जावे लागू शकेल. वडिलांशी वादाचे प्रसंग उद्भवू शकतात.
उपाय : होळीत कुंकू अर्पण करा
वृषभ
सकारात्मक बदल घडू शकतील. नोकरीत पदोन्नती, वेतनवृद्धी योग जुळून येऊ शकतील. आत्मविश्वासात वाढ होईल. कार्यालयातील वरिष्ठांचे सहकार्य लाभू शकेल. व्यापारी वर्गाने सारासार विचार करून घेतलेले योग्य निर्णय लाभदायक ठरतील. प्रलंबित येणी प्राप्त होऊ शकतील. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
उपाय : होळीत बत्तासे अर्पण करा
मिथुन
बोलताना तारतम्य बाळगणे हिताचे ठरेल. भावनेच्या भरात शब्द देणे टाळावे. करिअरसंदर्भातील अत्याधिक महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकणे हिताचे ठरेल. आगामी महिन्यातील काही प्रसंग मन बेचैन करतील. आवश्यक तेथे सल्ला घेणे योग्य ठरू शकेल. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल. विद्यार्थ्यांसाठी आगामी महिना अनुकूल आहे.
उपाय: होळीत मूग अर्पण करा
कर्क
मनावर संयम ठेवा. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतील. व्यावसायिकांनी कर्जाचे व्यवहार लांबणीवर टाकावेत. विनाकारण तर्क-वितर्क करणे टाळावे. अधिनस्थ कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणे हिताचे ठरेल. घराच्या डागडुजीसाठी वा सजावटीसाठी खर्च होऊ शकेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल.
उपाय: होळीत लाह्या अर्पण करा
सिंह
बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. प्रत्येक काम धैर्याने, नीटनेटकेपणे करणे आवश्यक आहे. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहील. स्वत:ची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. प्रवास योग येतील. विरोधकांवर नजर ठेवा. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, घशासंबंधीच्या तक्रारी संभवतात. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
उपाय: होळीत नारळ अर्पण करा
कन्या
या सप्ताहात आपण प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगल्यास पुष्कळशा गोष्टी साध्य होतील. नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे. काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. प्रलोभने टाळा. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगा. चांगल्या वातावरणाचा लाभ घ्या. अचानक प्रवासाचे योग संभवतात. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा.
उपाय: होळीत नाणे अर्पण करा
तूळ
कामाचा उत्साह वाढीला लागेल. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. तणावपूर्ण जीवनशैलीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, मोसमी आजारांपासून सावध रहा. जोडीदाराशी जुळवून घ्या. नोकरदारांना दिलासा मिळेल. कुटुंबीयांसमवेत प्रवासाचे योग येतील, ते लाभदायक ठरतील. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल.
उपाय: होळीत खण अर्पण करा
वृश्चिक
हाती घेतलेली सर्व नियोजित कामे या आगामी काळात पूर्णत्वास जाऊ शकतील. शिवाय प्रलंबित कामे मार्गी लागतील. कार्यक्षेत्रातील आपले प्रदर्शन उत्तम राहील. व्यवसाय विस्तारासाठी आगामी कालावधी अनुकूल असून, उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतील. आर्थिक स्थिती उत्तम राहू शकेल. मात्र, अनियंत्रित खर्च चिंता वाढवणारा ठरू शकतो.
उपाय: होळीत चणे अर्पण करा
धनु
मित्रांच्या मदतीने अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. अपचन तसेच पोटाचे विकार त्रस्त करू शकतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा. सारासार विचार केल्यानंतरच गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. व्यापार, व्यवसाय, उद्योगात अहंकारी वृत्ती नुकसान करू शकते.
उपाय: होळीत हरभरा अर्पण करा
मकर
सेवा क्षेत्रातील नोकरदार वर्गाला दिलासादायक काळ आहे. व्यापारी वर्गासाठी लाभदायक काळ असून, विक्री गतिमान होऊ शकेल. पालकांचे आशीर्वाद यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त करतील. विवाहेच्छुकांसाठी आगामी काळ उत्तम ठरू शकेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. मित्रांवर जास्त भरवसा ठेवू नका.
उपाय: होळीत काळे तिळ अर्पण करा
कुंभ
नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील. व्यावसायिक मंडळींनी विस्तार आणि कच्च्या मालासाठी केलेले कर्जाऊ व्यवहार यशस्वी ठरतील. राजकारण, कायदा आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींसाठी हा काळ सकारात्मक ठरू शकेल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात. गैरसमज वैवाहिक जीवन तणावग्रस्त करू शकेल.
उपाय: होळीत मोहरी अर्पण करा
मीन
घराची डागडुजी, सजावटीसाठी खर्च होऊ शकतो. अती बोलणे टाळा. महत्त्वाचे निर्णय घेण्यास याचा लाभ मिळू शकेल. या आगामी काळात काही प्रसंग मन बेचैन करू शकतात. विनाकारणचे तर्क आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक ठरू शकतील. प्रकृती उत्तम राहील. मात्र, पाय आणि छातीशी निगडित आजारापासून बचाव करा.
उपाय: होळीत कोहाळा अर्पण करा