राशिभविष्य खजाना
19 ते 25 ऑगस्ट 2026
मेष
या आठवड्यात आपण वाहन अथवा घर, जागा खरेदीच्या विचारात असाल तर ते तुमचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. पण कागदपत्रे व्यवस्थित तपासून व्यवहार करा. आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपल्याला जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तिथे थोडे जास्त कष्ट घ्या. कष्टाचे फळ आपल्याला चांगलेच मिळेल. आपल्या कामाचे कौतुक होईल.
उपाय : सद्गुरुंची उपासना करा.
वृषभ
आपल्या वाणीवर थोडा संयम ठेवा. आपल्या बोलण्याने समोरच्याचे मन दुखवू नका. आपल्या हातून काही धर्म कार्य म्हणजे दान धर्म परोपकार घडण्याची शक्यता आहे आणि हे कार्य करताना कदाचित लांब पल्ल्याची तीर्थयात्रा पण घडण्याचा संभव आहे. सत्संग घडेल आणि त्यातून आपल्याला मानसिक समाधान तर मिळेलच शिवाय इतरही लाभ होतील.
उपाय: मंगळवारी श्री गणेशाची आराधना करा.
मिथुन
एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून चिडचिड करू नका. मनावर व वाणीवर संयम ठेवा. आईच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. काही वाहन किंवा घर, जागा खरेदीच्या विचारात असाल तर सध्या तरी तो अमलात आणू नका. पण आपल्या पूर्वार्जित प्रॉपर्टीमधून कदाचित लाभ मिळेल किंवा लॉटरीसारख्या माध्यमातून अचानक धनलाभाची शक्यता आहे. पण योग्य मार्ग अवलंबवा.
उपाय : मंगळवारी हनुमान चालिसा म्हणा.
कर्क
या आठवड्यात आपले मन प्रसन्न व शांत राहील. आपले विचार आध्यात्मिक मार्गाकडे वळण्याची शक्यता आहे. परदेशी जाण्याची संधी अथवा परदेशातून लाभ संभवतो. आपला जर दैनंदिन व्यवसाय असेल तर त्या व्यवसायातून आपल्याला फायदा होईल. तो व्यवसाय वाढीस लागेल. शिवाय त्यातही जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आठवडा छान जाईल.
उपाय: घरातून बाहेर पडताना कपाळावर चंदनाचा टिळा लावा.
सिंह
आपल्या विचारात व स्वभावात आत्मविश्वास येईल. पण त्या आत्मविश्वासाचे परिवर्तन अहंकारात होऊ देऊ नका. आध्यात्मिक मार्गाकडे वळाल आणि तसे झाले तरच आपल्याला त्याचा फायदा होईल. आपल्या हातून काहीतरी लिखाण होईल आणि त्याचे समाजात कौतुक होईल. छोट्या भावंडांशी, शेजाऱ्यांशी सलोख्याचे संबंध राहतील.
उपाय : रोज गणपती अथर्वशीर्ष म्हणा.
कन्या
कष्टाला पर्याय नाही पण कष्टाचे फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी किंवा आपला व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी कुणाशी पंगा घ्यायला जाऊ नका. आणि चुकून काही वादावादी झालीच तर ती वाढवायला जाऊ नका. असे केल्याने उलट तुमचेच नुकसान होण्याची शक्यता आहे.
उपाय: शुक्रवारी तिन्हीसांजेला महालक्ष्मीची पूजा करा.
तुळ
या आठवड्यात आपले मन थोडे चंचल व अस्वस्थ असण्याची शक्यता आहे. पण फारसा विचार करू नका. अति विचारांनेच हे सगळे होते. पैतृक संपत्तीच्या बाबतीत काही चर्चा होईल व त्यातून चांगलेच निष्पन्न होईल. वाहन, घर, जागा खरेदीचा विचार चालू असेल तर या आठवड्यात आपण पुढे पाऊल उचलण्याची जागा आहे.
उपाय: शुक्रवारी देवळात जाऊन दत्ताचे दर्शन घ्या.
वृश्चिक
हातून काहीतरी चांगले कार्य घडण्याची शक्यता आहे. तीर्थक्षेत्री प्रवास होईल. धार्मिक कार्यात रुची वाढू लागेल. आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या कामात व्यवस्थितपणा आणि आत्मविश्वास येईल. त्याचा परिणाम म्हणून तुमच्या कामावर तुमचे वरिष्ठ खूष होतील. आपली प्रतिमा आपल्या कार्याच्या ठिकाणी उंचावेल.
उपाय: विष्णुसहस्त्रनाम म्हणावे.
धनु
नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी कामात यशप्राप्ती होईल. मात्र घर, वाहन खरेदीच्या विचारात असाल तर सध्या तरी खरेदी नको. आपल्या रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. अचानक धनलाभाची शक्यता आहे किंवा पैतृक संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. छोट्या मोठ्या प्रवासाला जाल. त्यातून समाधान मिळेल आणि लाभही होईल.
उपाय : पक्ष्यांना खाऊ घाला.
मकर
कष्टाला पर्याय नाही. आपण काही दैनंदिन व्यवसाय असेल तर त्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना थोडे सांभाळून रहावे लागेल. आपल्या सहकाऱ्यांबरोबर पटवून घ्यावे. हाताखालील नोकरवर्गाबरोबर समजुतीने घ्यावे, अन्यथा उगाच वाद वाढण्याचा संभव आहे. आपल्या बोलण्यात रुक्षता येण्याची शक्यता आहे. सांभाळा.
उपाय: सोमवारी शंकराला कच्च्या दुधाचा अभिषेक करा.
कुंभ
बोलताना शब्द जपून वापरा, तोंडातून निघालेला शब्द हा बाणासारखा असतो. परत तोंडात येत नाही आणि समोरच्या माणसाला घायाळ करतो आणि मग विनाकारण शत्रुत्व निर्माण होते. माणूस अहंकारी बनतो. मुलांच्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज आहे. पैतृक संपत्तीची सध्या आशा करू नका. नोकरदारांनी सांभाळून रहायला हवे. मौल्यवान वस्तू सांभाळा.
उपाय: शनिला शनिवारी काळे तीळ व तेल वाहा.
मीन
विद्यार्थ्यांना हा आठवडा चांगला जाईल. अभ्यासात प्रगती होईल. जे विद्यार्थी काही विशेष परीक्षा देत असतील तर त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार असतील तर ते आपले काम मोठ्या श्रद्धेने व आत्मविश्वासाने करतील. या काळात आपला स्वभाव खूपच शांत व समंजस होईल. सर्वांशी प्रेमाने वागाल. मात्र अनावश्यक खर्च टाळा.
उपाय : शनिवारी दशरथकृत शनिस्तोत्र वाचा.