राशिभविष्य खजाना
(11.2.2026 ते 17.2.2026)
मेष
या आठवड्यात आपल्या कामाच्या ठिकाणी आपला सन्मान होण्याची शक्यता आहे. आपले कौतुक होईल. घर अथवा वाहन खरेदीच्या विचारात असाल, तर थोडे थांबून पूर्ण विचारांती घ्या. आईचा सहवास, आशीर्वाद मिळेल. पण थोडी आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागण्याची शक्यता आहे. लक्ष द्या.
उपाय : मंगळवारी मारुतीच्या देवळात बुंदीचे लाडू द्या.
वृषभ
मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. परीक्षेचे दिवस जवळ आले आहेत. आपल्या मदतीची, मार्गदर्शनाची त्यांना गरज लागण्याचा संभव आहे. आपल्या इतर कामातून त्यांनाही थोडा वेळ द्या. आपल्याला अचानक लॉटरीसारख्या प्रकारातून धनलाभ होण्याची शक्यता आहे. गूढ विद्येचे ज्ञान मिळण्याची शक्यता आहे.
उपाय : कुमारिकेला पांढरे वस्त्र दान करा.
मिथुन
परदेशातून धनलाभ संभवतो. कदाचित परदेशातून नोकरीची ऑफर मिळण्याचीदेखील शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. पण तरीदेखील नोकर-चाकरावर फार विश्वास ठेवू नका. विश्वासघात होण्याची शक्यता आहे. तेव्हा सांभाळून रहा.
उपाय : सोमवारी महादेवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करा.
कर्क
सरकारी योजनेतून काही लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, तर मिळण्याचीही शक्यता आहे. पण आपल्या वाणीवर संयम ठेवण्याची गरज आहे. कदाचित होऊ घातलेले काम आपल्या कठोर वाणीने आपल्या हातून जाण्याचा संभव आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
उपाय : ॐ नम: शिवायचा जप करावा.
सिंह
या आठवड्यात आपल्याला धनलाभाची शक्यता आहे. अथवा पैतृक संपत्तीतून लाभ मिळण्याचा संभव आहे. पण सहजासहजी येईल ते स्वीकारा. आपली वाणी प्रखर होण्याची शक्यता आहे. तेवढे मात्र सांभाळा. आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून युक्तीने काम करून घ्या. प्रलोभनांना बळी पडू नका.
उपाय : मंगळवारी बजरंगबाण वाचा.
कन्या
आपल्या हातून काही धार्मिक कार्य होण्याचा संभव आहे. काही पुण्याचे कार्य होईल. कदाचित तीर्थयात्रादेखील घडेल. तेही जवळपास नदी असलेल्या ठिकाणी प्रवासाला जाल. संतांचा सहवास घडण्याची शक्यता आहे. थोरामोठ्यांचे, वडीलधाऱ्या मंडळींचे, वडिलांचे आशीर्वाद मिळतील. पण वडिलांच्या तब्येतीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल.
उपाय : सद्गुरुंची उपासना करा.
तुळ
नोकरीत असाल, तर पदोन्नतीचा संभव आहे. उच्चपद प्राप्ती, पगारवाढ होण्याची शक्यता आहे. जर स्वतंत्र व्यवसायात असाल, तर वडिलांच्या सल्ल्यानुसार उद्योगात वाढ करा. त्यात तुम्हाला फायदा होईल. मान सन्मान मिळेल. वडिलांचे चांगले सहकार्य मिळेल.
उपाय : पक्ष्यांना खाऊ घाला.
वृश्चिक
आपला हा आठवडा अतिशय उत्तम जाईल असे वाटते. सभा समारंभात सहभागी होण्याचा संभव आहे आणि याचा लाभ आपल्याला नक्कीच होणार आहे. त्यानिमित्ताने मोठ्या भावंडांच्या, नातेवाईकांच्या मित्र परिवाराच्या गाठीभेटी होण्याची शक्यता आहे. उंची भेटवस्तू मिळतील. छान आनंद लुटा.
उपाय : मंगळवारी शेंदरी मारुतीचे दर्शन घ्या.
धनु
परदेशी वस्तूंच्या देवाणघेवाणीतून लाभ संभवतो. पण खर्चावर नियंत्रण ठेवा. परदेशी जाण्याची संधी चालून येण्याची शक्यता आहे. या आठवड्यात थोडे अध्यात्माकडे वळावे, असे वाटू लागेल. तशी शक्यता आहे. गुरुंचा आशीर्वादही मिळेल. एकंदरीत हा आठवडा चांगला जाईल.
उपाय : दत्तगुरुंचे नामस्मरण करा.
मकर
या आठवड्यात आपले मन काहीसे विषण्ण राहील किंवा ताब्यात राहणार नाही आणि एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून चिडचिड होण्याची शक्यता आहे. तेव्हा स्वत:ला सांभाळण्याची गरज आहे. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. जोडीदाराला सांभाळा. निष्कारण वाद नको.
उपाय : सोमवारी शंकराला अभिषेक करा.
कुंभ
या आठवड्यात आपल्याला कौटुंबिक सुख मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच आपण आपल्या कुटुंबासाठी वेळ काढू शकाल. पण त्यांच्यासाठी वेगवेगळी स्वप्ने, जी तुम्ही पूर्ण कराल, अशीच दाखवा. त्यांचा विरस होऊ देऊ नका. कुटुंबाला सांभाळा. काही देण्याघेण्याचे व्यवहार सुरू असतील, तर विचारपूर्वक करा.
उपाय : रोज रात्री हनुमान चालिसा म्हणा.
मीन
कष्टाला पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामातून, तुमच्या वागणुकीतून, तुम्हाला स्वत:ला सिद्ध करून दाखवावे लागणार आहे, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला शांतपणाने तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. सारासार विचार करून पावले टाकावी लागणार आहेत तेव्हा सांभाळा.
उपाय : रोज दशरथकृत शनिस्तोत्र पठण करा.