राशिभविष्य
दि. 13 ते 19 मार्च 2024
विद्यार्थ्यांचा डीएनए- परीक्षा विशेष
मित्रांनो, सगळीकडे परीक्षेचे वातावरण चालू आहे. कोणी दहावीची तर कोणी बारावीची परीक्षा देत आहे किंवा देणार आहे. ज्योतिष शास्त्र, उपाय, तोडगे याविषयी लिहिणारा लेखक परीक्षेबद्दल जेव्हा लिहायला लागतो, तेव्हा परीक्षेमध्ये पास होण्याचे, चांगले मार्क मिळवण्याचे उपाय आणि तोडगे देणार हे सहज लक्षात येते. हा लेख वाचल्यानंतर मी तुम्हाला वचन देतो की तुम्हाला हे जे उपाय सांगितलेले आहेत ते केले तर कोणत्याही परीक्षेला सहजपणे सामोरे जाल. इतकेच नव्हे तर त्यामध्ये चांगल्या पद्धतीने मार्क्ससुद्धा मिळवाल, अट फक्त एकच आहे की हा लेख शेवटपर्यंत वाचावा. आता याबद्दलचा एकमात्र चमत्कारिक उपाय सांगतो. नीट वाचा बरे का. ‘कठीण परिश्र्रमाला, नियोजित अभ्यासाला आणि तीव्र इच्छाशक्तीला पर्याय नाही’!
वरचे वाक्य पुन्हा वाचा! पुन: पुन्हा वाचा. शंकराच्या पिंडीवर अमुक एक वस्तू चढवा, कालसर्पाची शांती करा, पितृदोष आहे त्याची शांती करा, अमुक मंत्र म्हणा, अमुक तंत्र करा या सगळ्या बेमतलबी गोष्टींवरती जराही विश्वास न ठेवता संपूर्ण समर्पित भावनेने, आपल्याला हे करायचेच आहे असे निश्चित करून, योग्य ते नियोजन करून केलेला अभ्यास हा परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास होण्याचा एकमात्र राजमार्ग आहे. या लेखाचा उपयोग विद्यार्थ्यांना तरी होईलच पण शिक्षकांना आणि पालकांनासुद्धा होईल, अशी आशा आहे. पहिली गोष्ट, परीक्षा, मग ती बोर्डाची असू दे किंवा शाळेची असू दे किंवा इतर कोणतीही असू दे, या परीक्षेवरून तुम्हाला विषयातील किती कळले आहे किंवा त्या विषयाचे ज्ञान किती आहे हे पूर्णपणे समजू शकत नाही. म्हणून जे केवळ परीक्षेकरता अभ्यास करतात त्यांना केवळ विषयाच्या वरवरचे ज्ञान मिळते.
साधारण वीस वर्षे बेळगाव येथील प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना हजारो विद्यार्थ्यांना जवळून बघण्याची संधी मिळाली, यशस्वी आणि अयशस्वी विद्यार्थ्यांमध्ये नक्की काय फरक आहे याचा अभ्यास करता आला आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे हा लेख आहे. माझ्या अभ्यासानुसार विद्यार्थ्यांच्या खालील श्रेणी आहेत 1. ज्यांना अभ्यास करायचाच नाही. (‘अमुक तमुक माणूस डिग्रीसुद्धा न घेता किती पैसे कमावतो. मग कशाला अभ्यास करा’ . . मी तरी यू-ट्यूबर होणार, व्ह्लोगर होणार मग डिग्री कशाला? अशा दिवास्वप्नात असतात ते!!!) 2. ज्यांना अभ्यास करायचा आहे पण कसा करायचा हे माहीत नाही 3. जे खरोखर अभ्यास करतात. वरील वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला एक लक्षात येईल की इथे हुशारीचा कुठलाही संबंध नाही, किंवा हुशार हा शब्द वापरलेला नाही. घ्Q किंवा इंटेलिजन्स कोशंट हा कित्येक ठिकाणी वादाचा विषय आहे. एखाद्या विषयामध्ये अत्यंत प्रवीण असलेली व्यक्ती दुसऱ्या विषयांमध्ये पूर्णपणे ढ, मूर्ख असू शकते. बरोबर ना? त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा हुशारच असतो, फक्त त्याला मिळालेल्या आजूबाजूच्या वातावरणामुळे आणि संधीमुळे त्याची हुशारी व्यक्त किंवा अव्यक्त होत असते. लेखाचा उद्देश विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा असल्यामुळे या विषयाच्या जास्त खोलवर न जाता आजपर्यंतच्या अनुभवाला ज्योतिषाची जोड देऊन विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे सांगतो.
मेष
नोकरीत असाल तर आपल्या कामावर वरिष्ठ खुश होतील. आपले काम चोख करण्याचा तुम्ही आटोकाट प्रयत्न कराल. नोकरीतही तसेच आणि घरी सुद्धा सर्वांशी छान रहाल. तुमच्या वागण्याची आणि कामाची सर्वांवर छाप पडेल. छोटे प्रवास घडण्याची शक्मयता आहे. शेजारपाजारी लोकांशी संबंध चांगले राहतील. नोकराबरोबर सुद्धा माणुसकीने वागा.
उपाय: मुक्या प्राण्यांना खाऊ घाला.
वृषभ
आईचा सहवास लाभेल. घर अथवा वाहन खरेदी करण्याचा विचार चालला असेल तर तो विचार पूर्णत्वाला जाण्याची शक्मयता आहे. एखादा कोर्स करण्याची इच्छा असेल तर लगेच त्या दृष्टीने पावले उचलायला लागा. पूर्वार्जित संपत्तीच्या बाबतीत काही विचारविनिमय चालले असतील तर त्यातूनही काही लाभ होण्याचा संभव आहे.
उपाय: महालक्ष्मीची उपासना करा.
मिथुन
मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. सध्या परीक्षेचे दिवस आहेत. त्यांचे मन कुठेतरी अभ्यास सोडून इतरत्र भटकण्याचा संभव आहे. त्यांच्या सहवासात रहा. त्यांना गरज असेल तर मार्गदर्शन करा. तुमचे विचार त्यांच्यावर लादू नका आणि तुमच्या मनालाही सावरा. अचानक कुठून तरी पैसा मिळण्याची शक्मयता आहे. लॉटरीचे तिकीट काढून पहायला हरकत नाही.
उपाय: मुंग्यांना साखर घाला.
कर्क
नोकरापासून सावध रहा. नुकसान होण्याचा संभव आहे. स्वत:ला जपा. काहीतरी शरीर पीडा होण्याची शक्मयता आहे. घरातील मौल्यवान वस्तूंना सांभाळा. मन चिंतीत, साशंक राहील. कामानिमित्त जिथे जाल तिथे आपल्या कामापुरतेच रहा. अन्यथा अपमानास्पद वागणूक मिळण्याची शक्मयता आहे. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला सांभाळून राहण्यास सांगतो आहे.
उपाय: कपाळावर दोन्ही भुवयांमध्ये गंध लावण्याचा प्रघात ठेवा.
सिंह
जोडीदाराबरोबर हा आठवडा छान घालवाल. काही स्वतंत्र दैनंदिन उद्योग करत असाल तर त्यात प्राप्ती चांगली होईल. काही कोर्ट झमेले असतील तर हळूहळू त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडण्याची शक्मयता आहे. पण उगाचच नसत्या वादावादीत पडू नका. स्वत:वर कंट्रोल करायला शिका. एखादी हरवलेली वस्तू सापडण्याची शक्मयता आहे.
उपाय: रोज सकाळी सूर्याला अर्ध्य द्या.
कन्या
सासरकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे अथवा कुठूनतरी द्रव्य मिळण्याची शक्यता आहे. पण मिळतो म्हणून चुकीच्या मार्गाने पैसा मिळविण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका. मन चंचल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या मनाला वेसण घालायला शिका. काहीतरी मानसिक चिंता सतावेल. नोकरीत असाल तर सांभाळून रहा.
उपाय: गो-मातेला खाऊ घाला.
तूळ
सध्या आपले भाग्य आपल्या पाठीशी आहे. आपल्या हातून सत्संग घडण्याची शक्मयता आहे. तेव्हा त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या आणि आपल्या जन्माचे सार्थक करून घ्या. तीर्थयात्रेच्या निमित्ताने दूरचा प्रवास घडेल. पित्याचे सहकार्य व त्यांचे आशीर्वाद लाभतील. काहीतरी सूचक स्वप्ने पडण्याचीदेखील शक्मयता आहे. एकंदरीत हा आठवडा चांगला जाईल.
उपाय:तुळशीला प्रदक्षिणा घाला.
वृश्चिक
आपल्या व्यवसायात आपली प्रगती होण्याची शक्मयता आहे. मनापासून कष्ट करा. कष्टाचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. नोकरीत असाल तर पदोन्नती अथवा पगारवाढ होण्याची शक्मयता आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कर्जासाठी धडपड करत असाल तर ते मिळण्याची शक्मयता आहे. मानसन्मान मिळेल. त्यामुळे समाजातील दर्जा उंचावेल.
उपाय: मारुतीची उपासना करा.
धनु
अनेक प्रकाराने लाभ मिळण्याची शक्मयता आहे. लक्षात घ्या लाभ म्हणजे केवळ पैशाच्या बाबतीतच नव्हे तर इतरही अनेक गोष्टी त्यात असतात. उदा. भेटीचा लाभ, सहवासाचा लाभ, एखाद्या वस्तूचा लाभ वगैरे. अर्थात द्रव्यलाभ ही त्यात आलाच. तर यापैकी कोणतेही लाभ आपल्याला मिळू शकतात. मोठ्या भावंडाची भेट होईल. मित्रांच्या भेटी होतील. एखाद्या उंची वस्तूची खरेदी होईल अथवा मिळेल.
उपाय:गुरुस्मरण कायम असू दे.
मकर
या आठवड्यात खर्चाचा ताळमेळ घालावा लागणार आहे असे दिसते. सांभाळून खर्च करा. परदेशगमनाचाही योग दिसतो आहे. तसे झाले तर उत्तमच आहे. योग्य तो खर्च करावाच लागणार. पण तो आणि कशासाठी खर्च होणार असेल तर विचार करून खर्च करा. अपव्यय होऊ देऊ नका. आध्यात्मिक अभ्यासाकडे वळणार असाल तर आवश्य वळा अथवा वळला असाल तर त्यात प्रगती संभवते.
उपाय: महादेवाची उपासना करा.
कुंभ
हा आठवडा आपल्याला उत्तम जाणार असे दिसते. जोडीदाराबरोबर छान दिवस जातील. पण मन फारही चंचल होऊ देऊ नका आणि मनमौजीपण होऊ नका. स्थळ काळाचे भान ठेवा. आपल्या मनासारखे सर्व काही होईल. पण थोडा धीरही धरावा लागेल. जोडीदाराची साथही चांगली मिळेल. छोट्या छोट्या गोष्टीसाठी राग राग करू नका. संयमी रहा.
उपाय:मुक्या जीवांना पाणी द्या.
मीन
या आठवड्यात आपल्या कुटुंबात छान रमाल. बऱ्याच दिवसांनी आपण कुटुंबासाठी वेळ काढल्याने, आपल्या असण्याने अथवा आपल्या सान्निध्यात आपले संपूर्ण कुटुंब आनंदात राहील. पूर्वार्जित धन संपत्तीही मिळण्याची शक्मयता आहे. आपल्या बोलण्याने, आपल्या वागण्याने दुसऱ्याच्या मनावर छाप पाडाल. आपल्या इतर आप्तांच्याही गाठी भेटी होतील.
उपाय: दत्ताची आराधना करा.