For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशी भविष्य २०२६-कर्क

12:11 PM Jan 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
राशी भविष्य २०२६ कर्क
Advertisement
प्रशांत अर्जुनवाडकर
मो: 9611663465

कर्क राशीचे लोक खूप भावनिक असल्याने इतरांच्या जीवनाची काळजी घेतात. स्वत:च्या अटींचे पालन करून सभ्यता आणि नम्रता दाखवतात. आपल्या इच्छेनुसार काम करण्यासाठी जुने विचार सोडून देऊ शकतात. त्यांच्या स्वभावात विरोधाभास आहे. कोणताही जोडीदार किंवा मित्र त्यांचे पालन करत नसेल तर त्यांच्याकडे दुर्लक्षदेखील करू शकतात. या राशीचे लोक आदर आणि सन्मान घेऊ इच्छितात. इतर लोकांशी, गोष्टींशी आणि परिस्थितीशी या व्यक्ती जोडलेल्या असतात. ते कितीही लांब प्रवास करत असले तरी स्वगृही परतण्याची इच्छा करत राहतात.

Advertisement

कर्क राशीच्या लोकांना जुन्या चित्रांमध्ये, ग्रंथांमध्ये विशेष रस असतो. विश्वासार्हता, अनुकूलता, सहानुभूती इतरांना सांभाळण्याची क्षमता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक बारकाव्याकडे लक्ष देऊन तार्किक दृष्टिकोनाने त्यांच्या अंत:प्रेरणेचे संतुलन साधतात. त्यांना नवीन गोष्टींमध्ये घाई करायला आवडत नाही कारण त्यांना नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यास अस्वस्थ वाटते. वारंवार मूड स्विंग झाल्यामुळे, ते काय करतील आणि एखाद्या गोष्टीवर कसे प्रतिक्रिया देतील, हे सांगू शकत नाही. आपल्या मूडनुसार मते बदलतात. ज्यामुळे अनेकदा लोकांना आश्चर्य वाटते, या राशीचे लोक तर्कसंगत दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्यांना अनेकदा संधी गमवाव्या लागतात आणि अपयशाला सामोरे जावे लागते. कर्क राशीच्या लोकांना मूर्ख बनवणे सोपे नाही. या लोकांचा सर्वोत्तम गुण म्हणजे सकारात्मकता. कर्क राशीच्या लोकांमध्ये कठोर परिश्रमासोबतच संवेदनशीलता, कल्पनाशक्ती आणि निष्ठेची भावना असते. कर्क राशीत जन्मलेले लोक फार महत्त्वाकांक्षी नसतात पण त्यांना प्रगती नक्कीच आवडते. त्यांचे सामाजिक वर्तुळ बरेच मोठे असते. त्यांच्याकडे मित्र बनवण्याची खूप चांगली क्षमता असते. या राशीचे लोक खंबीर आणि कमकुवत दोन्ही असतात. सभोवतालची परिस्थिती योग्य ठेवली तर ते स्वभावाने खूप उदार असतात.

चंद्रामुळे त्यांना त्यांचे स्थान सतत बदलावे लागते. स्वभावात दृढता असते, पण कमजोरीदेखील असते. त्यांची मानसिक स्थिती बदलणारी असते. भूतकाळ भविष्यात परत येईल याची भीती असल्याने तीच सर्वात मोठी कमकुवतपणा बनवते. राग आला तर लवकर जात नाही. दीर्घ काळ राहतो. भूतकाळातील घटना एखाद्या दुखापतीशी संबंधित असेल तर सहजासहजी विसरत नाही. त्यांच्या भावनिक असुरक्षिततेमुळे ते अनेकदा नैराश्याच्या संकटात सापडतात.

Advertisement

कर्क राशीच्या लोकांमध्ये दयाळूपणा, काळजी घेण्याची वृत्ती, प्रामाणिकपणा, चिवटपणा आणि भावनिक खोली हे प्रमुख सकारात्मक गुण असतात. ते शांत, सात्विक स्वभावाचे व शब्दाचे पक्के असतात.खेकड्याप्रमाणे हे लोकसुद्धा आपले विचार सहजपणे सोडत नाहीत. कर्क राशीचे लोक कल्पनाशक्तीचे धनी असतात.

ग्रहमान

वर्ष आरंभ ते एक जूनपर्यंत गुरु मिथुन राशीत आहे. एक जून ते 31 ऑक्टोबर गुरु कर्क राशीला जाणार. पुढे ऑक्टोबर 31 ते 24 जानेवारी 2027 पर्यंत गुरु सिंह राशीला असून पुन्हा वक्रगत्य कर्क राशीला येत आहे. मिथुनेतला गुरु अध्यात्म प्रगतीस चांगला राहणार आहे. खर्चसुद्धा वाढवणार आहे. आर्थिक मानसिक, शारीरिक खर्चसुद्धा वाढणार आहेत. राशीवर येणारा कर्पेचा गुरु व पुढे धनस्थानातील सिंहेचा गुरु आर्थिक चिंता दूर करील. आत्मविश्वास वाढवेल. प्रवास घडेल. सर्व इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण होण्यासाठी आपल्याला राजमार्ग लाभणार आहे. एकंदरीत मिथुनेचा गुरु सोडल्यास कर्केचा व सिंहेचा गुरु आपल्यासाठी अतिशय शुभ राहणार आहे. लग्नासाठी एक जूननंतर उत्तम गुरुबळ मिळणार आहे.

वर्षभर शनी मीनेचा म्हणजे नवम म्हणजे भाग्य स्थानातून भ्रमण करत आहे. हे भ्रमण सामान्यत: शुभच राहणार आहे. कामधंद्यामध्ये कमी जास्त चढ उतार असले तरी आपलाच विजय होणार आहे. व्यसनी लोकांसाठी मात्र हा त्रासिक राहणार. चैनी वृत्ती वाढवू देऊ नका. तीर्थयात्रा घडणार आहे. नवमस्थानाला धर्मस्थान असंसुद्धा म्हटलं जातं, त्यामुळे आपण जर धर्माने वागला तर आपलं नशीब आपल्याला संपूर्णरित्या साथ देणार आहे. एकंदरीत हे शनीचे भ्रमण आपल्यासाठी कमी जास्त शुभ फलदायी आहे.

25 नोव्हेंबरपर्यंत राहू कुंभ राशीला असून पुढे मकर राशीला जात आहे. म्हणजे राहू जवळजवळ वर्षभर कुंभ राशीला म्हणजे अष्टमात आहे. अष्टमातील राहू शुभ मानला जात नाही. नको तिथं आपल्याला पैसे खर्च करावे लागणार आहेत. आजारपणा वाढून त्यामध्ये खर्च होऊ शकतो. विनाकारण चिडचिड नको. वाहन सावकाश चालवा. 25 नोव्हेंबरपर्यंत केतू सिंह राशीला म्हणजे कर्क राशीसाठी केतू दुसरा म्हणजे धनस्थानी राहणार आहे. थोडा अनारोग्यकारक व कौटुंबिक त्रासदायकसुद्धा होऊ शकतो, मानसिक यातना होऊ नयेत यासाठी कुणालाही शब्द देण्यापूर्वी अतिशय विचार करा. वादविवादापासून चार हात लांब राहा.

नोकरदार

अध्यात्मिक बाजूकडे लक्ष दिल्यास आपल्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण होतील आणि तात्विक बदल जो घडेल त्याचा थेट संबंध आपल्या वाढीशी असणार आहे. आपण शिकत असलेला अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण कराल. आपली तत्वे व्यक्तिगत  आणि सामाजिक पातळीवर राबविण्यात यशस्वी व्हाल. बाह्यरूप सकारात्मक राहील आणि शत्रू अडचणीत येतील. सरकार आणि प्रशासनासोबत काम करताना आपल्याला यशही मिळेल. व्यापारात वृद्धी, नोकरीत बढती मिळेल. नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन बाळगून असता आणि या वर्षातील घटना यात भरच घालतील. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. जवळच्या व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून मदत आणि आनंद मिळेल. विरोधकांवर मात करू शकाल. कामधंद्याच्या निमित्ताने केलेला प्रवास आपल्यासाठी फलदायी ठरेल. नोकरी करत असाल तर कामाच्या ठिकाणी परिस्थितीत सुधारणा होईल. ग्रहांची स्थिती खूप चांगली आहे. तुमचे काम पूर्ण मेहनतीने करा. जवळच्या नातेवाईकांकडून काही चांगली बातमी मिळाल्याने आनंद मिळेल. एखाद्या व्यक्तीमुळे किंवा परिस्थितीमुळे तुम्ही गोंधळून जाऊ शकता.

ऑफिसमधील लपलेले राजकारण किंवा अफवा तुम्हाला त्रास देऊ शकतात. निर्णय घेण्यास विलंब होऊ शकतो. नोकरी बदलण्यापूर्वी किंवा मुलाखत देण्यापूर्वी स्पष्टपणे विचार करणे महत्वाचे आहे. बॉस किंवा सहकाऱ्यांशी संभाषणात गोंधळ होऊ शकतो. निर्णय घेण्यापूर्वी योग्य सल्ला आवश्यक असेल. सरकारी काम पूर्ण करण्यासाठी हा चांगला काळ आहे. तुम्हाला कुठूनतरी मदतदेखील मिळेल. काही चांगली बातमी मिळाल्यानंतर, तुम्हाला आत्मविश्वास आणि तुमच्या आत एक नवीन ऊर्जा जाणवेल. तुम्ही कुटुंबासह प्रवास देखील करू शकता. शुभ कार्याशी संबंधित योजना देखील बनवाल. नियमितपणे व्यायाम आणि योगासने करा. स्नायूंच्या वेदना पुन्हा येऊ शकतात. आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे स्वप्ने प्रत्यक्षात उतरतील.

स्त्री वर्ग

व्यवसायात बदल आणि प्रगतीसाठी बनवलेल्या योजना अंमलात आणण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. नवीन व्यावसायिक संपर्क होतील, जे फायदेशीर ठरतील, परंतु एखाद्या कर्मचाऱ्यामुळे, हिशेबाच्या बाबतीत समस्या येऊ शकतात. त्यामुळे योग्य रणनीती बनवून काम करावे लागेल. नोकरदार लोक अतिरिक्त कामाच्या ताणामुळे तणावाखाली असतील. मीडिया आणि ऑनलाइन संबंधित घडामोडीत तुमचे विशेष लक्ष केंद्रित करा. चालू असलेल्या जुन्या समस्येवर तोडगा काढल्यानंतर तुम्हाला आराम वाटेल. ताणतणाव आणि चिंतेच्या कारणांपासून दूर रहा. आराम आणि शांती राखण्यासाठी, अध्यात्मिक गोष्टी आणि एकांतात थोडा वेळ घालवा. योग्य वेळी काम न केल्याने नुकसान होईल. क्षमतेपेक्षा जास्त कामाचा भार स्वत:वर घेऊ नका. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तुमच्या कोणत्याही योजनेवर काम करण्यापूर्वी, जोडीदाराचा आणि कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. वैवाहिक संबंध सौहार्दपूर्ण असतील, परंतु अनोळखी लोकांपासून अंतर ठेवा, अन्यथा तुमच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. प्रेमी एकमेकांना भेटवस्तू देऊ शकतात. तुम्हाला तुमच्या क्षमता व्यक्त करण्याची संधी मिळेल, म्हणून इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्याऐवजी, तुमच्या कामाच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. स्वत:साठी निर्णय अधिक प्रभावी होतील. एखाद्या नातेवाईकाशी वाद सुरू असेल तर ते सोडवण्याची ही योग्य वेळ आहे. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिक दृष्टिकोनातून, काही आव्हाने आणि चढ-उतार येतील. नोकरी करणारे लोक जास्त कामामुळे त्रास सहन करतील, परंतु त्यांना प्रगतीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. जास्त काम केल्याने गोंधळलेले वातावरण निर्माण होईल. मुलांच्या करिअरसाठी धावपळ करावी लागेल. कधीकधी अतिआत्मविश्वास आणि अहंकार यासारख्या परिस्थिती तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकतात. तुमचा आक्रमक स्वभाव आणि राग नियंत्रित करणे महत्वाचे आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून भावंडांसोबत मतभेद होऊ शकतात.

विद्यार्थी 

विद्यार्थ्यांना सध्या परीक्षेची भीती वाटणार नाही. या काळात विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात लक्ष केंद्रित करतील. तुम्हाला कठीण विषय सहजपणे समजतील. वाचन आणि लेखनात रस वाढेल आणि तुम्ही सरावासाठी अधिक वेळ काढू शकाल. उच्च शिक्षण आणि संशोधनात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीच्या प्रमाणात चांगले निकाल मिळतील. साहित्य आणि तांत्रिक क्षेत्रात शिकणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप अनुकूल राहील. उच्च शिक्षण, अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील.

  • राशीस्वामी - चंद्र 
  • शुभवार  - सोमवार 
  • अशुभ वार - बुधवार 
  • घात मास - पौष 
  • शुभ रंग - पांढरा  
  • भाग्यरत्न  - मोती 
  • आराध्य देवता - श्री शिव
Advertisement
Tags :

.