Hormuz Tanker Blast | होर्मुझमध्ये सुरुंगाला धडकून टँकरमध्ये स्फोट
► वृत्तसंस्था तेहरान
पश्चिम आशियात अमेरिका आणि इराणदरम्यान सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. तर दुसरीकडे होर्मुझ सामुद्रधुनीत रविवारी एक ऑइल टँकर सागरी सुरुंगाला धडकल्याने त्यात स्फोट झाल्याची माहिती इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिली आहे. ही घटना जगातील सर्वात महत्त्वपूर्ण सागरी ऊर्जा मार्गांपैकी एकावर घडली आहे.
ऑइल टँकर होर्मुझ सामुद्रधुनीत इराणच्या अधिकाऱ्यांकडून निश्चित सागरी मार्गातून हटल्यावर सुरुंगाला धडकला. या जहाजाचे नाव, त्यावरील सामग्री, ते कुठल्या बंदरावर पोहोचणार होते याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.
तर इराणने पश्चिम आशियातील अमेरिकेच्या सहकाऱ्यांवरील प्रत्युत्तरादाखलचे हल्ले अस्थायी स्वरुपात रोखल्याची घोषणा रविवारी केली आहे. हा निर्णय मागील दोन रात्री इराणच्या क्षेत्रावर अमेरिकेने सैन्य हल्ले न केल्याने घेण्यात आला आहे. या घोषणेनंतर अमेरिका आणि इराणदरम्यान अनेक महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष शमण्याची अपेक्षा बळावली आहे. परंतु दोन्ही देश याप्रकरणी उच्च सतर्कता बाळगत आहेत.
इराणची प्रतिक्रिया नेहमीच प्रत्युत्तराच्या कारवाईवर आधारित राहिली आहे. अमेरिकेचे हल्ले रोखण्यात आल्याने स्वत:चे अभियानही रोखण्याचा निर्णय इराणने घेतला असल्याचे वक्तव्य इराणच्या सैन्याचे प्रवक्ते मोहम्मद अकरमिया यांनी केले आहे. तर या घडामोडींमुळे अमेरिका आणि इराणदरम्यान पुन्हा शांतता चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
