हुडा उपांत्य फेरीत, लक्ष्य, आयुष पराभूत
► वृत्तसंस्था / सारब्रुकेन (जर्मनी)
येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या हायलो खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या उन्नती हुडाने चीन तैपेईच्या लिनचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. मात्र लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 34 व्या मानांकीत उन्नती हुडाने चीन तैपेईच्या चौथ्या मानांकीत लिनचा 22-20, 21-13 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. हा सामना हुडाने 47 मिनिटांत जिंकला. गेल्या मे महिन्यात झालेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत हुडाला लीनकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाची परतफेड उन्नतीने या स्पर्धेत केली.
पुरूष एकेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या चौथ्या मानांकीत अॅलेक्स लेनीरने भारताच्या लक्ष्य सेनचा 21-17, 14-21, 21-15 अशा गेम्समध्ये पराभव केला. हा सामना 75 मिनिटे चालला होता. चालु वर्षीच्या बॅडमिंटन हंगामात लक्ष्य सेनचा लेनिरकडून हा दुसरा पराभव आहे. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लेनिरने लक्ष्य सेनचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला होता. पुरूष एकेरीच्या दुसऱ्या एका सामन्यात फिनलँडच्या केली कोलजोनेन याने आयुष शेट्टीवर 19-21, 21-12, 22-20 अशा गेम्समध्ये मात करत पुढील फेरीत स्थान मिळविले. हा सामना 70 मिनिटे चालला होता. या स्पर्धेत भारताच्या किरण जॉर्जला उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या जोनाटेन ख्रिस्टीकडून 16-21, 10-21 अशा सरळ गेम्समध्ये हार पत्करावी लागली.