भगवदभक्ति प्रबोधिनीचा श्री नारद जयंती उत्सव उत्साहात
ज्येष्ठ कीर्तनकार रमाकांत ठाकूर यांचा सन्मान
वेंगुर्ला (वार्ताहर)
भगवदभक्ति प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने श्री स्वामी समर्थ मठ कासमळा घावनळे येथे आयोजित करण्यात आलेला श्री.नारद जयंती उत्सव अत्यंत उत्साहात संपन्न झाला. सकाळी ८ वाजता श्री स्वामी समर्थ मठ कासमळा-घावनळे (ता.-कुडाळ) येथे स्थानिक वारकरी मंडळींच्या प्रासादिक हरिपाठाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. तदनंतर. जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. श्री.काजरेकर गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली श्री. दादा गवस माऊली व गुरुमाऊली यांच्या शुभहस्ते श्री.नारदमूर्तीचे शोडशोपचारे पूजन झाले.नंतर पूराणवाचन व आरती करण्यात आली. ह.भ.प.श्री .गुरुदास केळुसकर यांच्या मंगलाचरणाने पूर्वरंग आणि कीर्तनचक्रीस प्रारंभ झाला. जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकारांनी दिवसभर विविध विषयांवरील आख्याने सादर करून कार्यक्रमास रंगत आणली. महत्वाचे म्हणजे भगवदभक्ति प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने देण्यात येणारा प्रतीष्ठेचा जेष्ठ कीर्तनकार सन्मान ह.भ.प.श्री.रमाकांत बुवा ठाकुर यांना पुरस्कर्ते संजय पुनाळेकर व जड्ये कुटुंबीय यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.प्रबोधिनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या वर्षभरातील कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ मठ घावनळे चे दादा माऊली उभयतांचा प्रबोधिनीच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व कीर्तनकार व साथीदार यांना श्री.स्वामी समर्थ यांची तसबीर प्रसाद म्हणून देण्यात आली.सायंकाळी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमास सहकार्य करणाऱ्या सर्व भाविकांचे प्रबोधिनीचे अध्यक्ष संजय पुनाळेकर व कार्यवाह दिनकर प्रभु-केळुसकर यांनी आभार मानले.