सुवर्णलक्ष्मीतर्फे सभासदांच्या मुलांचा गौरव
प्रतिनिधी/ बेळगाव
‘सहकार क्षेत्राला अनेक अडचणी येत असल्या तरीही त्यांना समर्थपणे तोंड देत काही संस्था बेळगावात कार्यरत आहेत त्यामध्ये सुवर्णलक्ष्मी सोसायटीचा उल्लेख करावा लागतो. दैवज्ञ ब्राह्मण समाजातील तळागाळातील लोकांना आधार देत त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम या संस्थेने गेली 26 वर्षे सातत्याने केले आहे, असे मत पायोनियर बँकेचे संचालक अनंत लाड यांनी व्यक्त केले.
श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. व्रेडिट सोसायटीच्यावतीने सभासदांच्या गुणी मुलांना पुरस्कार देऊन गौरविण्याचा समारंभ नुकताच झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक मोहन कारेकर होते.
चेअरमन विठ्ठल शिरोडकर यांनी स्वागत करून सोसायटीच्या कार्याचा आढावा घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम आम्ही राबवित असून सभासदांच्या गुणवंत मुलांचा व ज्ञातीबांधवांचा आम्ही सन्मान करतो. नाना शंकरशेठ यांनी अनेक वर्षांपूर्वी मुंबईत जे कार्य सुरू केले त्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही अनेक उपक्रम बेळगावात राबवित आहोत, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी अनंत लाड, मोहन कारेकर, विठ्ठल शिरोडकर व व्हाईस चेअरमन विजय सांबरेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संचालक विनायक कारेकर, समर्थ कारेकर, राजू बांदिवडेकर यांच्यासह कर्मचारीवर्ग व सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन मधुरा शिरोडकर यांनी केले. अभय हळदणकर यांनी आभार मानले.