नौदल प्रमुखांकडून तहसीलदार, पोलीस अधिक्षक,बांधकाम अभियंता यांचा सन्मान
मालवण/प्रतिनिधी
मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांच्या सह काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नौदल प्रमुख एडमिरल. आर. हरी .कुमार यांच्या हस्ते कौतुकाचा बिल्ला आणि प्रशंसा पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
भारतीय नौदलाने तारकर्ली येथे संपन्न झालेल्या नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतला होता. याकामी पुतळ्याच्या स्थापनेसाठी जागा शोधणे आणि त्या नंतर पर्यायी जागा शोधण्यात प्रशासनाचे प्रमुख म्हणून मालवण तहसीलदारांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे नौदलाच्या ऑपरेशन डेमोच्या सर्व पैलूंचा नागरी प्रशासनाशी समन्वय साधण्यात तहसीलदार झालटे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती.
त्याचप्रमाणे जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे सहाय्यक अभियंता अजित पाटील यांचाही नौदलाच्या वतीने कौतुकाचा बिल्ला आणि प्रशंसा पत्रक देवून सन्मान करण्यात आला. यावेळी नौदलाचे प्रमुख एडमिरल हरी कुमार, व्हाईस ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांसह अन्य उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी सुरक्षा आणि सागरी सुरक्षेच्या सर्व पैलूंचा समन्वय साधण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पाटील यांनी राजकोट किल्ला वेळेत पूर्ण करण्यात विशेष लक्ष घातले होते. तारकर्ली येथील नौदलाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणाऱ्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती आणि डागडुजी करण्यातही पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
अग्निशमन दलाच्या पथकांचा सत्कार....
मालवण शहरात गेले अनेक दिवस राज्यभरातील अनेक अग्नीशमन दलाची पथके नौदल दिनाच्या कार्यक्रमासाठी दाखल झाली होती. सोमवारी सकाळपासून रात्रीपर्यंत या पथकांनी आपापल्या परीने योगदान दिले होते. आज मंगळवारी या सर्व पथकांना मालवण नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी अभिनव पद्धतीने निरोप दिला. सर्व पथकांना मानपत्र आणि सर्व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
नगरपालिकेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात सर्व पथकांनी आनंद व्यक्त करत आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल नगरपालिकेचे आभार मानले. सर्व अग्नीशमन बंब मार्गस्थ होत असताना पालिकेने भोंगा वाजवत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्याधिकारी संतोष जिरगे व सर्व कर्मचारी यांनी हात वर करून अभिवादन करत निरोप घेतला. हा कार्यक्रमामध्ये अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. मालवण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व कर्मचारी यांचे सर्वांनी आभार मानले.