सामाजिक योगदानात अग्रेसर तिघांना मानद डॉक्टरेट
आरसीयूकडून मानद डॉक्टरेट जाहीर : जिल्ह्यातील दोघा सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश
बेळगाव : सामाजिक योगदान लक्षात घेऊन राणी चन्नम्मा विद्यापीठाने विनोद दोड्डण्णावर, डॉ. शिवाजी कागणीकर आणि विजापूरचे पोलीस उपअधीक्षक बसवराज यलिगार यांना मानद डॉक्टरेट जाहीर केली आहे. विद्यापीठाच्या मंगळवारी होणाऱ्या पदवीदान समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते ही पदवी त्यांना देण्यात येईल. विनोद दोड्डण्णावर हे शिक्षणतज्ञ असून राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेएनएमसीमधून बी. फार्मा ही पदवी घेतली. सरकारी फार्मसी कॉलेजमधून एम. फार्मा पदवी घेतली. नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सुने बर्गस्ट्रॉम यांच्या मार्गदर्शनाखाली अॅस्ट्राझेनेका येथे संशोधन शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम केले.
बेळगावला परतल्यानंतर 2008 मध्ये भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे व्यवस्थापकीय समिती सदस्य म्हणून ते सक्रिय झाले. भरतेश ग्लोबल बिझनेस स्कूल, भरतेश सेंट्रल स्कूल हलगा व भरतेश सेंट्रल स्कूल कुडची या संस्था स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भाऊ राजीव दोड्डण्णावर यांच्या निधनानंतर ट्रस्टचे सचिव म्हणून ते कार्यरत राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली ट्रस्टचा विस्तार एकवीस संस्थांमध्ये झाला. इन्टेक बेळगावचे ते संयोजक असून शंभरहून अधिक वारसास्थळांचे दस्तऐवजीकरण व हलशी, बेनवाड, इदरगुच्ची, हन्नीकेरी येथील मंदिरांच्या जीर्णोद्धाराला प्रारंभ केला.
आचार्य शांतीसागर फाऊंडेशनच्या माध्यमातून बाहुबली येथे हस्तलिखित केंद्राची स्थापना केली. पर्यावरणावर त्यांचा विशेष भर असून सौरऊर्जेचा प्रसार करणे, प्लास्टिकमुक्त परिसर करणे, सांडपाणी प्रक्रिया सयंत्र स्थापन करणे आदी कामे त्यांनी केली आहेत. पोलीस अधिकारी असणारे बसवराज यलिगार यांनी पोलीस उपअधीक्षक ही भूमिका चोख बजावतानाच महात्मा बसवेश्वर यांची 959 वचने इंग्रजीत भाषांतरित करून ‘माय मी इज दि’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. मूळचे गदग जिल्ह्यातील बसवराज यांचे इंग्रजीवर चांगलेच प्रभुत्व आहे.
पोलीस दलात त्यांनी बेळगावसह जेथे जेथे सेवा केली, तेथे आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. हिरेकुडी, ता. चिकोडी तालुक्यात जैन मुनींची भीषण हत्या करून त्यांचा मृतदेह कूपनलिकेत टाकण्यात आला होता. राज्य सरकारलाच आव्हान ठरलेल्या या प्रकरणाचा बसवराज यांनी काही तासातच छडा लावला होता. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणी म्हणून डॉ. शिवाजी कागणीकर यांची ओळख आहे. त्यांनी कट्टणभावी, निंगेनहट्टी, गुरामहट्टी, कडोली या भागात दोन लाख वृक्षांची लागवड, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन केले आहे. त्याशिवाय तलाव, विहिरी व बंधारे निर्माण करून जमीन ओलिताखाली आणली आहे. नरेगा योजनेतून अनेकांना रोजगार मिळवून दिला आहे. अरण्य भागात त्यांनी मुला-मुलींसाठी शिक्षण सुरू केले आहे.