भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम यांचे निधन
वांगी :
भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सांगली येथील मानद संचालक डॉ. हणमंतराव मोहनराव कदम (वय 60) यांचे शुक्रवार 14 रोजी पहाटे 3 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने भारती विद्यापीठ परिवारासह हळहळ व्यक्त होत आहे. दुपारी दोन वाजता त्यांच्यावर मूळगावी सोनसळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सांगली येथील भारती वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी गोरगरिबांना उत्तम आरोग्य सेवा दिल्या. त्यांनी पुणे येथील भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये प्राध्यापक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली आणि पुढे प्राचार्यपदाची धुरा सांभाळली. भारती फार्मसी शिक्षक संघटना, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, इंडियन फार्मास्युस्टिकल असोसिएशन आणि इंडियन सोसायटी फॉर क्लिनिक फार्माकोलॉजी यासारख्या संस्थांवर त्यांनी काम केले. ते माजी आमदार मोहनराव कदम यांचे पुत्र, माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांचे चुलत बंधू व युवानेते डॉ. जितेश कदम यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवार 16 फेब्रुवारी रोजी सोनसळ येथे होणार आहे.