For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सन्मान हा स्वत:चा...

06:27 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
सन्मान हा स्वत चा
Advertisement

अधमा? धनमिच्छन्ति धनं मानं च मध्यमा?!

Advertisement

उत्तमा? मानमिच्छन्ति मानो हि महताम् धनम् ।।

कमीबुद्धीचे लोक फक्त धनाचीच इच्छा ठेवतात, अशा लोकांना सन्मानाबाबत अपेक्षा नसते. एक मध्यम वृत्तीचे, बुद्धिचे लोक धन आणि सन्मान दोन्हीची अपेक्षा करतात, तर उच्च कोटीच्या व्यक्ती फक्त सन्मानाचीच अपेक्षा ठेवतात. सन्मान हा धनापेक्षा अधिक मूल्यवान असतो.

Advertisement

एकदा एका लग्नामध्ये नवरदेवाला ओवाळतांना घरातल्या मोलकरणीने भाकर तुकडा ओवाळला आणि नवरदेवाकडच्या लोकांनी तिला साडी चोळी आणि खणा नारळाची ओटी असं दिल्यावर तिला कमालीचा आनंद झाला. पण त्याच लग्नात नवरदेवाच्या आई मात्र भयंकर संतापलेल्या होत्या. तिला कसला राग आला होता कुणास ठाऊक? काहीतरी मानपान देण्यावरून फिस्कटलं होतं हे मात्र खरं. त्या वेळी ह्या सुभाषितामधल्या ओळी सत्यात उतरल्या आहेत असे वाटले.

लहानपणी शुक्रवारची कहाणी वाचताना देखील ही गोष्ट सातत्याने जाणवायची. ज्या बहिणीच्या घरी दारिद्र्या असतं तिला सन्मानाने जेवायला बोलावत नाहीत. पण कालांतराने तिचे चांगले दिवस आल्यानंतर मात्र तिला आवर्जून थाटामाटात सन्मानाने जेवायला बोलावले जाते. अशावेळी ती स्वत: न जेवता आपल्या अंगावरच्या दागिन्यांना त्या जेवणातील प्रत्येक पदार्थ भरवते. या सगळ्यातूनच मानवी स्वभावाची गंमत लक्षात येते. माणूस जेव्हा गरीब असतो तेव्हा त्याला फक्त आपण केलेल्या कामाचा मोबदला म्हणजेच पैसा हवा असतो. त्या वेळेला त्याची तीच गरज असते परंतु पैसा मिळायला लागला, शिक्षण झालं, की माणसाला दुसऱ्याने आपल्याला विचारलं पाहिजे, सन्मानाने वागवलं पाहिजे अशी अपेक्षा निर्माण होते. अशावेळी दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील परंतु सन्मान मिळावा यासाठी मध्यम प्रतीचे लोक जागरूक असतात. पण फक्त सन्मान मिळवण्यासाठी जगणारे लोक मात्र खूप पैसेवाले असले तरी सन्मान, मोठेपणा मिळवण्यासाठी आटापिटा करतात. याला अपवादही असतात. शिवाजी राजांची गोष्ट वाचताना ही गोष्ट लक्षात येते. औरंगजेबाच्या दरबारात जेव्हा शिवबा भेटीसाठी गेले तेव्हा त्यांना सन्मानाच्या रांगेत उभं न करता, नोकरदारांच्या रांगेत उभं केलं गेलं. अशावेळी काहीही न बोलता ते शांतपणे उभे राहिले. कारण सन्मान हा कोणी दिल्याने मिळत नसतो तो आपल्याला कर्तृत्वाने प्राप्त होतो ही जाणीव शिवाजी राजांच्या मनात होतीच पण बरेचदा समाजामध्ये अनेक लोक काहीही मोठेपणा नसताना फक्त पैशाच्या जोरावर स्वत:ला जनतेचे सेवक, लोकप्रिय नेते म्हणवून घेतात. आपल्याला सन्मान मिळावा म्हणून राजरोस प्रयत्न करत असतात. मोठ-मोठ्या कार्यक्रमांमध्ये मिरवत असतात, आपणच कसे मोठे याच्या जाहिराती लावत असतात, कारण त्यांना फक्त सन्मान हवा असतो. मोठेपणा मिळवायचा असतो. सर्वत्र त्यांचा जयजयकार हवा असतो, परंतु या तीनही प्रकारची टोकाची वागणारी माणसं समाजाला उपयोगी नसतात. या सगळ्यांच्या वृत्तीचा मध्य साधला गेला पाहिजे.

Advertisement
Tags :

.