For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिग्गजांच्या पंक्तीत सन्मान हे विशेष भाग्य : राहुल द्रविड

06:55 AM Mar 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिग्गजांच्या पंक्तीत सन्मान हे विशेष भाग्य   राहुल द्रविड
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय क्रिकेट संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने ‘बीसीसीआय नमन’ पुरस्कार 2026 सोहळ्यामध्ये ‘जीवनगौरव सन्मान’ स्वीकारल्यानंतर कृतज्ञता व्यक्त केली. भारतीय क्रिकेटमधील काही महान दिग्गजांच्या पंक्तीत आपलाही गौरव होत असल्याचा अनुभव घेणे हे आपल्यासाठी एक विशेष सौभाग्य असल्याचे त्याने यावेळी नमूद केले.

नवी दिल्ली येथे आयोजित सदर सोहळ्यात, राहुल द्रविड आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना ‘कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले, तर मिताली राजला ’महिलांसाठीचा ‘बीसीसीआय जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आपल्यासाठी विशेष महत्त्वाचा असल्याचे द्रविडने सांगितले. ‘या पुरस्काराचे यापूर्वीचे मानकरी पाहिले, तर ते आपल्या देशातील या खेळातील काही महान दिग्गज आहेत हे लक्षात येईल. हे खरोखरच असे लोक आहेत ज्यांच्याकडे मी आदराने पाहिले, ज्यांचे मी कौतुक केले, खेळाडू म्हणून, प्रशिक्षक म्हणून आणि भारतीय क्रिकेटमधील इतर ज्या ज्या भूमिकांमध्ये मी सहभागी झालो त्या सर्व प्रसंगी हे दिग्गज माझ्यासाठी प्रेरणेचा मोठा स्रोत ठरले, असे द्रविड म्हणाला.

Advertisement

हा गौरव या खेळामधील आपल्या दीर्घ प्रवासाचे प्रतिबिंब आहे. या प्रवासाची सुऊवात वयोगटातील क्रिकेटमधून झाली होती, याकडे द्रविडने लक्ष वेधले. ‘हा एक मोठा बहुमान आहे. भारतीय क्रिकेटमध्ये इतका दीर्घकाळ सहभागी होण्याची संधी मला मिळाली या गोष्टीबद्दलही मी मनापासून कृतज्ञ आणि समाधानी आहे. मी पहिल्यांदाच 15 वर्षांखालील गटात क्रिकेट खेळलो तेव्हापासून अगदी आजपर्यंत मला मिळालेल्या संधींबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे’, असे तो म्हणाला.

त्याने भारतीय क्रिकेटपटूंच्या आणि प्रशासकांच्या सध्याच्या पिढीचेही कौतुक केले. ‘पुढची पिढी हा वारसा ज्या प्रकारे पुढे नेत आहे, ते पाहून मला खूप अभिमान आणि कृतज्ञता वाटते. आम्हाला जे यश मिळाले आहे त्याचे मोठे श्रेय सध्याचे व्यवस्थापन, सध्याचा संघ आणि भारतीय क्रिकेटशी संबंधित असलेल्या प्रत्येकाला जाते. या खेळामध्ये प्रत्येकाचा आपला असा एक काळ असतो, त्यावेळी आपल्याला आपला वाटा उचलावा लागतो. मी माझ्या परीने सर्वोत्तम योगदान टदेण्याचा प्रयत्न केला. माझ्या आधीच्या पिढ्यांकडून मला प्रेरणा मिळाली आणि आता आपल्या पुढील पिढ्या हा वारसा केवळ पुढेच नेत नाहीत, तर त्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जात आहेत. हे पाहणे खरोखरच अद्भूत आहे’, असे द्रविड म्हणाला.

भारतीय क्रिकेटची वाढ पाहणे हा अभिमानाचा क्षण : मिताली राज

भारताची माजी महिला कर्णधार मिताली राजने ही मान्यता केवळ एक वैयक्तिक मैलाचा दगड नाही, तर ती आपल्या क्रिकेटमधील प्रवासाला पाठिंबा दिलेल्या अनेक व्यक्तींची आठवण करून देते, अस सांगितले. गेल्या 2-3 वर्षांपासून भारतीय क्रिकेटमध्ये, पुऊष असो वा महिला असो, 19 वर्षांखालील मुली असो वा मुलगे, खूप चांगले काम करत आहेत. एक माजी क्रिकेटपटू म्हणून भारतीय क्रिकेटची वाढ पाहणे हा अभिमानाचा क्षण आहे. बऱ्याच काळापासून मला भारतीय क्रिकेटने वर्चस्व गाजवावे असे वाटत होते आणि आता ती वेळ आली आहे, असे ती म्हणाली. मितालीने गेल्या काही वर्षांत महिला क्रिकेट कसे सातत्याने वाढत गेले आहे यावर प्रकाश टाकला आणि महिला क्रिकेटमधील खेळाडूंना प्रेरणा देण्याच्या बाबतीत पुऊषांच्या क्रिकेटमधील आघाडीच्या खेळाडूंच्या प्रभावाला त्याचे श्रेय दिले.

कोणताही क्रिकेटपटू आयुष्यभर जपेल अशी गोष्ट : रॉजर बिन्नी

बीसीसीआयकडून जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित झाल्यानंतर मंडळाचे माजी अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी या सन्मानाचे वर्णन करताना ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक क्रिकेटपटू आयुष्यभर जपेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. बिन्नी पुढें म्हणाले की, एक खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रशासक म्हणून क्रिकेटमध्ये अनेक दशके घालवल्यानंतर बीसीसीआयकडून जीवनगौरव पुरस्कार मिळणे हा आपल्यासाठी एक अत्यंत विशेष क्षण आहे. ‘या खेळात अनेक गोष्टी साध्य करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेत असता. यात केवळ प्रत्यक्ष क्रिकेट खेळणेच नाही, तर प्रशासन, प्रशिक्षण अशा सर्वच गोष्टींचा समावेश असतो. थोडक्यात, सर्व काही क्रिकेटभोवतीच फिरत असते. माझ्यासाठी हा एक मोठा सन्मान आहे’, असे बिन्नी म्हणाले. या माजी क्रिकेटपटूने सांगितले की, भारताचे प्रतिनिधीत्व करणे ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वांत मोठी कामगिरी होती. विशेषत: राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी असलेल्या प्रचंड स्पर्धेचा विचार करता ही कामगिरी अधिकच मोलाची ठरते, असे ते म्हणाले

Advertisement
Tags :

.