विजेच्या धक्क्याने होनग्याच्या सेंट्रींग कामगाराचा मृत्यू
बेळगाव : इमारतीचे स्लॅब घालण्यासाठी सेंट्रींग काम करत असताना इमारतीजवळून गेलेल्या विद्युततारेला लोखंडी बारचा स्पर्श झाल्याने सेंट्रींग कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. जुमनाळ (ता. बेळगाव) येथे मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. परशराम कल्लाप्पा हुंदरे (वय 43 रा. तानाजी गल्ली, होनगा) असे त्या दुर्दैवी सेंट्रींग कामगाराचे नाव आहे. परशराम हे सेंट्रींग काम करत होते. जुमनाळ येथे एका इमारतीचे काम करण्यासाठी गेले होते. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमाराला बार बांधण्यासाठी घेत असताना त्या लोखंडी बारचा विद्युततारेला स्पर्श झाला. यामुळे विजेचा धक्का त्यांना बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर इतर कामगारांनी त्यांना तातडीने उपचारासाठी हलविले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. काकती पोलीस स्थानकात रात्री उशिराने फिर्याद दाखल झाली आहे. बुधवार दि. 25 रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्यावर होनगा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दोन महिन्यांपूर्वीच मुलीचा डेंग्यूने मृत्यू : होनगा परिसरात हळहळ
परशराम यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलीचा डेंग्यूने दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर परशराम यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे होनगा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.