हाँगकाँगचा भारतावर विजय
वृत्तसंस्था / कोलून (हाँगकाँग)
2027 च्या एएफसी आशिया चषक पात्र फेरी स्पर्धेतील येथे मंगळवारी झालेल्या फुटबॉल सामन्यात यजमान हाँगकाँगने भारताचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. या सामन्यातील हा एकमेव निर्णायक गोल दुखापतीच्या कालावधीत स्टिफेन परेराने केला.
सामन्यातील 94 व्या मिनिटाला पंचांनी हाँगकाँगला पेनल्टी बहाल केली. हाँगकाँगच्या स्टिफन परेराने स्पॉट किकवरुन मारलेला फटका भारतीय गोलरक्षक थोपवू शकला नाही. या सामन्यात भारताचा हुकमी स्ट्रायकर सुनील छेत्रीला सुरुवातीला मैदानात उतरवले नव्हते. सामन्याच्या पूर्वार्धात भारताने गोल करण्याच्या अनेक संधी दवडल्या. कारण हाँगकाँगची बचावफळी भक्कम होती. 35 व्या मिनिटाला आशिकी कुर्नियनचा मारलेला फटका गोलपोस्टच्या बाहेरुन गेला. पहिल्या 45 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांचा खेळ दर्जेदार झाला. त्यामुळे गोलफलक कोराच होता. सामन्याच्या उत्तरार्धात सुनील छेत्रीला मैदानात उतरवले. 81 व्या मिनिटाला छांगटेने दिलेल्या पासवर छेत्रीने हाँगकाँगच्या गोलपोस्टपर्यंत मुचंडी मारली. पण त्याला चेंडूवर ताबा राखता न आल्याने भारताला आपले खाते उघडता आले नाही. या पात्र फेरीच्या स्पर्धेतील गेल्या मार्चमध्ये झालेला बांगलादेशविरुद्धचा पहिला सामना गोल शुन्य बरोबरीत राहिला होता.