आशियाई चषक पात्रता फेरी : भारतासमोर आज हाँगकाँगचे आव्हान
प्रतिनिधी/ कौलून (हाँगकाँग)
स्पर्धेत पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असलेला भारतीय फुटबॉल संघ आज मंगळवारी येथे होणाऱ्या एएफसी आशियाई चषक 2027 च्या तिसऱ्या फेरीच्या पात्रता फेरीच्या सामन्यात हाँगकाँगविऊद्ध आणखी एका कसोटीला सामोरे जाईल. स्थानिक माध्यमांमधील वृत्तानुसार, सामन्याची सर्व 50,000 तिकिटे विकली गेली आहेत, ज्यामुळे हाँगकाँग फुटबॉलसाठी उपस्थितीचा एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे.
मॅनेजर अॅश्ले वेस्टवूड यांच्या मार्गदर्शनाखाली पुनऊज्जीवित झालेल्या हाँगकाँग संघाचा सामना करताना मानोलो मार्केझच्या संघासमोर चांगलेच आव्हान असेल. वेस्टवूड यांना भारतीय फुटबॉलबद्दल बरेच काही माहित आहे आणि ते निश्चितच त्यांचे ज्ञान घरच्या संघाच्या फायद्यासाठी वापरण्याचा प्रयत्न करतील. पात्रता फेरीसाठी विभाग-1 मध्ये स्थान मिळवलेल्या 127 व्या क्रमांकावरील भारताने संथ सुरुवात करताना मार्चमध्ये बांगलादेशविऊद्धच्या सामन्यात बरोबरी साधली होती.
दरम्यान, विभाग-2 मधील 153 व्या क्रमांकावर असलेल्या हाँगकाँगला सिंगापूरमध्ये फक्त एक गुण मिळालेला आहे. म्हणजेच पहिल्या सामन्यानंतर गट ‘क’मधील चारही संघांची स्थिती सारखीच आहे. हाँगकाँगसाठी हा दिवस ऐतिहासिक आहे. 59 वर्षांत दुसऱ्यांदा एएफसी आशियाई चषकात स्थान मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या यजमान संघाच्या नजरेतून हा एक महत्त्वाचा पात्रता सामनाच नाही, तर हाँगकाँगमधील सर्वांत मोठे क्रीडा संकुल असलेल्या काई टाक स्पोर्ट्स पार्कचा भाग असलेल्या काई टाक स्टेडियमवरील हा पहिला फुटबॉल सामना देखील आहे.
1951 मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यानंतर भारत आणि हाँगकाँग आता 25 व्या खेपेला आमनेसामने येत आहेत. भारत नऊ विजयांसह आघाडीवर आहे, हाँगकाँगने आठ विजय मिळवले आहेत, तर सात अनिर्णित राहिले आहेत. तथापि, ब्लू टायगर्सना हाँगकाँगच्या भूमीवर फक्त एकदाच विजय मिळाला आहे. 1957 मध्ये मैत्रीपूर्ण सामन्यात त्यांनी 2-1 असा विजय मिळविला होता. 2022 साली कोलकाता येथे झालेल्या आशियाई चषक पात्रता सामन्यात हाँगकाँगला 4-0 असा पराभव पत्करावा लागला होता.
तथापि, बचावपटू संदेश झिंगनने सांगितले की, ते आताचा विचार करत आहेत. ‘मागील लढतीतील ती गोलसंख्या खूपच चांगली होती. पण तेव्हापासून, हाँगकाँगमध्ये बरेच बदल झाले आहेत. त्यांच्याकडे एक नवीन प्रशिक्षक आला आहे आणि बरेच नवीन खेळाडू आहेत. त्यामुळे ते तितके सोपे होणार नाही आणि आम्ही आत्मसंतुष्ट होऊ शकत नाही किंवा गोष्टी हलक्यात घेऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर, विशेषत: परदेशात, प्रत्येक सामना कठीण असतो. आम्ही सर्वोत्तम पद्धतीने तयारी केलेली आहे आणि मंगळवारी जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी प्रयत्न करू’, असे 31 वर्षीय झिंगन म्हणाला.