पनामाला हरवून होंडूरास उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ ग्लेनडेल (अमेरिका)
काँकेफ सुवर्णचषक फुटबॉल स्पर्धेतील येथे झालेल्या अटीतटीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात होंडूरासने पेनल्टी शूटआऊटमध्ये पनामाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
शनिवारी रात्री झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे गोल बरोबरीत होते. त्यानंतर पंचानी जादा वेळेचा अवलंब केला पण गोलकोंडी कायम राहिल्याने अखेर शूटआऊटच्या निर्णयावर सामना निकाली झाला. पेनल्टीमध्ये कार्लोस पिनेडाने निर्णायक गोल करत होंडूरासला उपांत्य फेरीत नेले. 2013 नंतर या स्पर्धेत होंडूरासने पहिल्यांदाच यावेळी उपांत्य फेरी गाठली आहे.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात गोल करण्याच्या अनेक संधी होंडूरासने गमाविल्या. सामन्याच्या पूर्वार्धात पनामाने आपले वर्चस्व राखले होते. 44 व्या मिनिटाला एडविन रॉड्रिग्जने पनामाचे खाते उघडले. या स्पर्धेतील रॉड्रिग्जचा हा 6 वा गोल आहे. मध्यंतरापर्यंत पनामाने होंडूरासवर 1-0 अशी आघाडी मिळवली होती. 82 व्या मिनिटाला लॉस कॅट्रेचोसने होंडूरासला बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरी होते. त्यानंतर अतिरिक्त कालावधीतही ही कोंडी कायम राहिल्याने पेनल्टीचा अवलंब करण्यात आला. पेनल्टीमध्ये होंडूरासने पनामाचा 5-4 अशा गोलफरकाने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. बाद फेरीतील या दोन संघात पहिल्यांदाच हा सामना खेळविण्यात आला होता. पनामाने आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात 3 वेळा उपविजेतेपद मिळविले आहे. 2005 आणि 2013 साली त्यांना या स्पर्धेत दोन वेळेला अमेरिकेकडून तर 2023 साली मेक्सिकोकडून पराभव पत्करावा लागला होता. 1991 साली ही स्पर्धा पहिल्यांदाच भरवली गेली. आणि होंडूरासने उपविजेतेपद मिळविले होते.