होंडाच्या ईव्ही स्कूटर अॅक्टिव्हा ई आणि क्यूसी1 रिव्हील लाँच
एका चार्जवर 102 किमी धावणार : 80 किमीपीएच टॉप स्पीडचा कंपनीचा दावा
नवी दिल्ली : होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर इंडिया यांनी बुधवारी भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर अॅक्टिव्हा ई आणि क्यूसी1 यांना सादर केले आहे. कंपनीने दोन्ही दुचाकींच्या किमतींची घोषणा केलेली नाही. दोन्ही मॉडेलचे बुकिंग 1 जानेवारी 2025 आणि डिलिव्हरी फेब्रुवारी 2025 पासून सुरु होणार आहे. आता या दोन्ही ईव्ही ओलाच्या मॉडेल्सना टक्कर देणार आहेत. अॅक्टिव्हा ई मध्ये स्वॅपेबल बॅटरी आणि क्यूसी1 मध्ये फिक्सड बॅटरीचा पर्याय देण्यात आला आहे. कंपनीने दावा केला आहे की, अॅक्टिवा ई 80 किमी टॉप स्पीड प्राप्त करणार असून एका चार्जवर गाडी 102 किमी धावणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच क्यूसी1 मध्ये पूर्ण चार्जवर 80 किमीचा टप्पा प्राप्त करणार असून 50 किमीपीएच टॉप स्पीड मिळणार आहे. होंडाने 3 वर्षांमध्ये 50,000 किमीची वॉरंटी दिली आहे. यामध्ये मोफत सर्व्हिस आणि कॉम्प्लिमेंट्री रोडसाइड सेवा देणार आहे. ही सुविधा पहिल्या वर्षी ईव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्यासाठी राहणार आहे.
पाच कलर पर्याय
होंडा अॅक्टिव्हा इलेक्ट्रिक आणि क्यूसी1 एक अॅडव्हान्स आणि अट्रेक्टिव्ह डिझाइन असणारी गाडी आहे. पर्ल सेनेनिटी ब्लू, पर्ल मिस्टी व्हाईट, मॅट फोगी सिल्व्हर मॅटेलिक, पर्ल इग्नियस ब्लॅक आणि पर्ल शॅलो ब्लू आदी कलरचा पर्याय दिला आहे.