होंडा आणि निस्सान मोटर्सचे विलीनीकरण होण्याची शक्यता
नवी दिल्ली :
होंडा मोटर कंपनी आणि निस्सान मोटर कंपनीचे विलीनीकरण होऊ शकते. दोन्ही कार निर्माते एकत्र येऊन जागतिक बाजारपेठेत टोयोटा मोटर कॉर्पोरेशनशी स्पर्धा करण्याचा विचार करत आहेत. होंडाचे कार्यकारी उपाध्यक्ष शिंजी ओयामा म्हणाले की, विलीनीकरणाव्यतिरिक्त, होंडा आणि निस्सान दोघेही भांडवल टायअप आणि होल्डिंग कंपन्यांसह इतर अनेक पर्यायांवर चर्चा करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मित्सुबिशी मोटर्स कॉर्प देखील या डीलमध्ये सामील असू शकते, कारण निस्सानशी त्याचे भांडवल संबंध आहेत. निस्सानचे समभाग हे जवळपास 24 टक्क्यांनी वाढले आहेत. होंडाचा समभाग 3 टक्क्यांनी घसरला. होंडा आणि निस्सान यांच्या विलीनीकरणाच्या बातमीनंतर, निस्सानचे समभाग जपानच्या टोकियो स्टॉक एक्सचेंजमध्ये 23.70 टक्क्यांनी वाढले. तर होंडा मोटर्सचे समभाग 3.04 टक्क्यांनी प्रभावीत झाले.
या करारामुळे, दोन मोठ्या कंपन्या जपानच्या वाहन उद्योगात काम करतील- पहिली: होंडा, निस्सान आणि मित्सुबिशी नियंत्रित करणारी एक होल्डिंग कंपनी आणि दुसरी: टोयोटा समूह कंपन्यांचा समावेश असलेला समूह. निस्सानने फ्रान्सच्या रेनॉल्ट एसएशी आपले संबंध आत्तापर्यंत कमी केले आहेत.
तर होंडाने जनरल मोटर्स कंपनीतून माघार घेतली. होंडा आणि निस्सान यांच्यात या करारावर चर्चा होण्यापूर्वी वर्षाच्या सुरुवातीला, दोन्ही कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी आणि सॉफ्टवेअरवर एकत्र काम करण्याचे मान्य केले होते. निक्केईच्या अहवालानुसार, दोन कार निर्माते नवीन होल्डिंग कंपनीमध्ये सामायिक इक्विटी स्टेकवर चर्चा करण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) वर स्वाक्षरी करण्याची योजना आखत आहेत.