देशी मातीतला अभिनेता
अजरामर भूमिकांसाठी ओळखला गेलेला महान नायक
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सोमवारी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे पत्नी हेमा मालिनी, मुलगी इशा आणि अहना यांच्यासह देओल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यावेळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देत घरी आणले गेले होते. सोमवारी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि त्यानंतर त्यांनी राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला आहे.
‘यादों की बारात’मधील शंकर आणि ‘शोले’मधील विरु या भूमिकांना धर्मेंद्र यांनी स्वत:च्या अभिनाच्या वेगळ्या शैलीद्वारे अजरामर केले. देशी मातीतला ‘ही मॅन’ अशी ओळख असलेला हिंदी चित्रपटसृष्टीतील तारा ही त्यांची ओळख कायमच राहिल यात शंका नाही.
धर्मेंद्र हे 1960 च्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीत दाखल झाले. ‘दिल भी तेरा हम भी तेरे’, ‘शोला और शबनम’, ‘अनपढ’, ‘शादी’, बंदिनी’, ‘बेगाना’, आयी मिलन की बेला’, ‘पुर्णिमा’, ‘फुल और पत्थर’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘आये दिन बहार के’ यासारख्या चित्रपटांमधून धर्मेंद्र यांनी प्रेक्षकांना स्वत:च्या अभिनयाने वेड लावले. ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटात त्यांनी साकारलेला सर्कसचा मालक प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला.
‘यादों की बारात’ चित्रपटात धर्मेंद्र यांनी साकारलेली शंकर ही भूमिका अत्यंत चपखल साकारली होती. ‘ड्रीम गर्ल’ आणि ‘सीता और गीता’, ‘चुपके चुपके’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जया भादुरी, शर्मिला टागोर, ओमप्रकाश असे दिग्गज कलाकार असलेल्या ‘चुपके चुपके’ चित्रपटात धर्मेंद्र यांनी विनोदी अभिनयक्षमता दाखवून दिली. ऋषिकेश मुखर्जींचे दिग्दर्शन आणि दिग्गज कलाकारांची फौज असताना धर्मेंद्र यांनी ‘प्यारे मोहन’ बनून केलेली धमाल ही केवळ अविस्मरणीय होती.
‘शोले’ चित्रपटातील अजरामर भूमिका
बॉलिवूडमधील सर्वात गाजलेला चित्रपट ‘शोले’मध्ये धर्मेंद्र यांनी साकारलेली विरु ही भूमिका अजरामर ठरली आहे. शोले चित्रपटातील जय या भूमिकेसाठी प्रथम शत्रुघ्न सिन्हा यांच्या नावाचा विचार सुरू होता, तर अमिताभ यांचे नाव धर्मेंद्र यांनी सुचविले होते. यामुळे शोले चित्रपटाला ‘जय’ मिळाला आणि चित्रपटसृष्टीला महानायक मिळाल्याचे मानले गेले. धर्मेंद्र यांनी कारकीर्दीत अनेक प्रकारच्या छटा असलेल्या भूमिका साकारल्या. 2012 साली चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीबद्दल धर्मेंद्र यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
हेमामालिनींसह जमली जोडी
धर्मेंद्र यांचा उल्लेख झाल्यावर ओघाने हेमामालिनी यांचे नाव समोर येते. दोघांचे प्रेम, ऑन स्क्रीन-ऑफ स्क्रीन केमिस्ट्री, पडद्यावर हिट झालेली जोडी सगळंच काही एखाद्या परीकथेसारखे आहे. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न झाले होते, परंतु हेमामालिनी त्यांच्या आयुष्यात आल्या आणि लोकांना ही जोडी आवडू लागली. या दोघांच्या जोडीने एकाहून एक सरस चित्रपटही दिले. ‘आयी मिलन की बेला’, ‘आया सावन झुमके’, ‘प्यार ही प्यार’, जीवन मृत्यू’ यासारखे रोमँटिक चित्रपट तर ‘शिकार’, ‘ब्लॅकमेल’, ‘किमत’, ‘कब क्यूँ और कहां’ यासारखे गूढ पट, ‘सीता और गीता’, ‘चाचा-भतीजा’, ‘चुपके चुपके’ यासारखे कॉमेडी चित्रपटही धर्मेंद्र यांनी केले आहेत. परंतु धर्मेंद्र हे खऱ्या अर्थाने रमले स्वत:च्या अॅक्शन हीरोच्या प्रतिमेत.