महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जगदीश शेट्टर यांची घरवापसी

07:10 AM Jan 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पुन्हा भाजपप्रवेश : विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा : काँग्रेसला धक्का

Advertisement

नाट्यामय...

Advertisement

प्रतिनिधी /बेंगळूर

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांवर परखड टीका करत काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर गुरुवारी भाजपमध्ये परतले आहेत. त्यांनी दिल्लीतील भाजप कार्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश केला. लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडून भाजपमध्ये परतत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना बेळगाव मतदारसंघातून भाजपचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. शिवाय त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचेही आश्वासन देण्यात आल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून राज्य भाजप नेते शेट्टर यांच्या संपर्कात होते. त्यांना लोकसभा निवडणुकीवेळी तिकीट देण्याचे आश्वासन देऊन भाजपात आणून लिंगायत मतदार पुन्हा भाजपकडे वळविण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. अखेर शेट्टर यांना भाजपमध्ये आणण्यात राज्य भाजप नेते यशस्वी ठरले आहेत. दिल्लीत माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर जगदीश शेट्टर यांनी भाजपमध्ये परतण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील भाजप कार्यालयात पक्षप्रवेश केला. याप्रसंगी भाजपाध्यक्ष जे. पी. न•ा यांनी त्यांना पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा देऊन स्वागत केले. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, राजीव चंद्रशेखर, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्रिपदाचे आश्वासन

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना पक्षात आणण्यासाठी सकाळपासूनच दिल्लीत भाजप गोटात जोरदार हालचाली सुरू होत्या. शेट्टर यांनी अमित शहा यांच्यासह माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि विजयेंद्र यांची भेट घेऊन त्यांच्याशी राजकीय घडामोडींवर चर्चा केली. या भेटीदरम्यान अमित शहा यांनी भूतकाळातील सर्व काही विसरून पक्षात या. तुम्हाला योग्य स्थान दिले जाईल. लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले जाईल, तसेच भविष्यात केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल, असे शेट्टर यांना आश्वासन दिल्याचे समजते. त्यानंतर शेट्टर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे म्हणणे मान्य करत  भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. भाजपप्रवेशानंतर जगदीश शेट्टर यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपले राजीनामापत्र विधानपरिषद सभापतींना ई-मेलद्वारे पाठवून दिले. तसेच काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामाही दिला असून यासंबंधीचे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना पाठवून दिले आहे.

कोणत्याही पदाची अपेक्षा नाही : जगदीश शेट्टर

आपण भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करावा, अशी अनेक नेत्यांची अपेक्षा होती. त्यामुळे भाजपमध्ये पुन्हा दाखल झालो आहे. विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. विधानपरिषदेच्या सभापतींना ई-मेलद्वारे राजीनामापत्र पाठविले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना पाठविला आहे, असे जगदीश शेट्टर यांनी सांगितले. नवी दिल्ली येथे भाजपप्रवेशानंतर बोलताना ते म्हणाले, पुन्हा मातृपक्षात परतल्याने आनंद झाला आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा किंवा लोकसभा निवडणुकीसाठी तिकिटाची मागणी केलेली नाही. वरिष्ठ जो निर्णय घेतील, त्याला कटिबद्ध राहीन. पक्षासोबत निष्ठेने काम करेन. काँग्रेसमध्ये देखील सन्मानाची वागणूक मिळाली. त्याबद्दल सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांना धन्यवाद देत असल्याचे शेट्टर यांनी सांगितले.

लक्ष्मण सवदी यांच्या भूमिकेविषयी कुतूहल

विधानसभा निवडणुकीवेळी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी देखील भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनाही भाजपात आणण्यासाठी भाजप नेत्यांनी गळ घातली आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. गुरुवारी सवदी यांनी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, माझी भूमिका स्पष्ट आहे. मी भाजपात जाणार नाही, असे स्पष्ट केले. शेट्टर आणि मी काँग्रेसप्रवेशाचा एकत्र निर्णय घेतला नव्हता. आधी मी काँग्रेसमध्ये आलो. तिकीट न मिळाल्याने ते नंतर आले. ते पुन्हा भाजपमध्ये का गेले, हे ठाऊक नाही. भाजपने माझ्याशी संपर्क साधलेला नाही. भाजपला लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे, त्यामुळे ते सर्वांशी संपर्क साधत आहेत. मी मात्र, माझ्या निर्णयावर ठाम आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार शेट्टर भाजपात!

आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार जगदीश शेट्टर यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. शेट्टर यांनी पक्षात अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या भाजपप्रवेशामुळे पक्षाला बळकटी मिळाली असून लोकसभा निवडणुकीत 25 पेक्षा जास्त जागा जिंकू.

- येडियुराप्पा, माजी मुख्यमंत्री

काँग्रेसमध्ये शेट्टर यांच्यावर अन्याय नाही!

काँग्रेस पक्षात जगदीश शेट्टर यांच्यावर कोणताही अन्याय झालेला नाही. अवमानही झालेला नाही. आपल्याला तिकीट न देता भाजपने अवमान केला, असे सांगून शेट्टर यांनी काँग्रेसप्रवेश केला होता. त्यांना आम्ही विधानसभा निवडणुकीत तिकीट दिले. पराभूत झाल्यानंतर विधानपरिषदेचे सदस्य बनविले.

- सिद्धरामय्या मुख्यमंत्री

त्यांच्यावर कोणता दबाव होता, ठाऊक नाही!

भाजप प्रवेशासाठी त्या पक्षाकडून निमंत्रण देण्यात येत असल्याचे जगदीश शेट्टर यांनी बुधवारी आपल्याला माहिती दिली होती. तसेच त्यांनी काँग्रेसने राजकीय जीवन दिले आहे. त्यामुळे भाजपात जाणार नसल्याचे सांगितले होते. पण अचानक त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यावर कोणता दबाव होता, हे ठाऊक नाही.

- डी. के. शिवकुमार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री

ही तर केवळ सुरुवात!

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य राजकारणात मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडतील. शेट्टर यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. ही तर केवळ सुरुवात आहे. आगामी दिवसांत काँग्रेसमधील प्रमुख नेतेही पक्षात येतील. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे.

- बसवराज बोम्माई, माजी मुख्यमंत्री

‘ऑपरेशन कमळ’ नव्हे!

जगदीश शेट्टर यांचा भाजपप्रवेश म्हणजे ‘ऑपरेशन कमळ’ नव्हे. काँग्रेस पक्षातील कोंडमारा सहन न झाल्याने ते पुन्हा आपल्या घरट्यात आले आहेत. शेट्टर संघ परिवाराची पार्श्वभूमी असणारे नेते आहे. काँग्रेसमध्ये मुस्लीमांना झुकते माप आणि हिंदूची उपेक्षा पाहून शेट्टर यांनी मातृपक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला.

- आर. अशोक, विधानसभा विरोधी पक्षनेते

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article