घर एकीकडे तर मतदान दुसरीकडेच!
प्रभाग रचनेच्या सावळा गोंधळामुळे विकासकामे राहिली बाजूलाच : ग्रामस्थांना नाहक त्रास : नव्याने रचनेची गरज
वार्ताहर/येळ्ळूर
गावच्या विकासाचा आराखडा नजरेसमोर ठेवून गावची प्रभाग रचना निश्चित केलेली असते. विकासाला गती मिळून लोकोपयोगी कामे करता येतील. सरकारी विविध योजना ग्राम पंचायत सदस्यांमार्फत प्राभाग सदस्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत लवकर पोहचतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार निर्विघ्नपणे बजावता येईल, यासाठी प्रभाग रचना सलग आणि सुलभ ठेवलेल्या असतात. पण येळ्ळूर गावातील प्रभाग रचनेचे चित्र वेगळे असून प्रभाग एकसंध न ठेवता विस्कळीत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
आज गावची लोकसंख्या 30 ते 35 हजारच्या दरम्यान असून विकासकामांसाठी आणि कारभार सुलभ व्हावा म्हणून गावचे 13 प्रभाग केले आहेत. 13 प्रभागांतून 30 प्रतिनिधी ग्राम पंचायतीमध्ये गावाचे प्रतिनिधित्व करतात. पण प्रभाग 13 असले तरी ते संलग्न नाहीत. एका प्रभागातील मते दुसऱ्या प्रभागात, एका गल्लीचे दोन भाग करून ते वेगवेगळ्या प्रभागात तर काही गल्लीत चार घरे एका प्रभागात तर चार घरे दुसऱ्या प्रभागात तर काही ठिकाणी एकाच घरातील मते वेगवेगळ्या तीन ते चार प्रभागात नोंदवल्यामुळे प्रभागांचा गोंधळ झाला आहे. प्रभाग एकमधील मतेही एकाच प्रभागात असतीलच असे नाही. स्थान मात्र प्रभाग एक यामुळे मतदान करताना गोंधळ होवून ग्रामस्थांना नाहक गावात हेलपाटे मारावे लागतात. यात महिला, वृद्ध आणि रुग्णांचे फार हाल होतानाचे चित्र आहे.
प्रभागच विस्कळीत असल्याने दाद कोणाकडे मागायची
अशा सावळ्या गोंधळामुळे एकेका प्रभागात पाच ते सात सदस्य प्रतिनिधित्व करतात असे प्रत्येक प्रभागाचे चित्र असल्याने सदस्य विकास कामांसाठी लक्ष कुठे पुरवणार आणि विकास निधी कुठे आणि कसा खर्च करणार? त्यामुळे विकास कासवाच्या गतीने सुरू आहे. ग्रामस्थांच्या समोर हा प्रश्न उभा आहे की समस्या कोणाजवळ मांडावी. प्रभागच गावभर विस्कळीत असल्याने दाद कोणाकडे मागायची आणि समस्यांचे निवारण कसे होणार? असे असले तरी प्रशासन मात्र काम करते आहे. गल्ली दोन चार प्रभागात विभागल्यामुळे गल्लीतील एकीचे खच्चीकरण होवून गल्ल्या गटातटात विभागल्या आहेत. समस्यांबाबत कुणाचा पायपोस कुणाला नाही. मतदान विभागल्यामुळे दबावतंत्राचा वापर सुरू होवून निवडणुकीच्या काळात वाद सुरू झाले. भाऊबंदकी विभागली, घरामध्ये विचारांचे वेगवेगळे प्रवाह यामुळे समस्या अन् विकासकामे बाजूला पडली.
पूर्वीप्रमाणेच मतदार संघ संलग्न ठेवावेत
याआधी प्रभाग संलग्न असल्याने सदस्यांवर ग्रामस्थांचा दबाव होता. त्यामुळे विकास कामांना गती होती. वेळेत समस्या सोडवल्या जात होत्या. एकीमुळे वाद कमी होते. पण प्रशासनाने संलग्न असणारे प्रभाग एकमेकांत मिसळून गुंता करण्याचे कारण मात्र प्रशासनालाच माहिती. त्यामुळे या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून पूर्वीप्रमाणेच मतदार संघ संलग्न ठेवावेत. यासाठी आजी, माजी ग्राम पंचायत सदस्यांनी व इतर जाणकार नेतेमंडळांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
संलग्न प्रभागासाठी पाठपुरावा करा
प्रभागांच्या या सावळ्या गोंधळामुळे सर्वसामान्य माणूस गोंधळला असून मतदानाच्यावेळी मतदान शोधण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रभागात हेलपाटे मारावे लागतात. यात रुग्ण व महिलांना अधिक त्रास सहन करावा लागतो. ग्रामपंचायतीने हा सावळा गोंधळ मिटविण्यासाठी संलग्न प्रभागासाठी ठराव करून पाठपुरावा करावा. नव्याने प्रभाग रचना करून विकास कामाला गती द्यावी.
- अर्जुन गोरल, जि. पं. चे माजी सदस्य