1,466 पोलिसांना गृहमंत्री दक्षता पदक
गृह मंत्रालयाकडून विजेत्यांच्या नावांची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने 2025 या वर्षासाठी देशभरातील 1,466 पोलीस कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता (कार्यक्षमता) पदक प्रदान करण्याची घोषणा केली आहे. गृह मंत्रालयाने शुक्रवारी या पदक विजेत्यांची नावे जाहीर केली. देशातील विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संघटनांमधील कर्मचाऱ्यांना ही पदके दिली जातील. हा सन्मान देताना उत्कृष्ट कार्य, उच्च व्यावसायिक मानके आणि पोलीस कर्मचाऱ्यांमधील मनोबल वाढवण्यातील योगदानाची दखल घेतली जाते. विशेष मोहिमा, तपास, गुप्तचर कार्य आणि न्यायवैद्यक विज्ञान या चार श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे पदके प्रदान केली जातात. दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी ही पदके जाहीर केली जातात.
देशभरातील पोलीस दल, सुरक्षा संघटना, गुप्तचर युनिट्स, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विशेष दलांच्या तुकड्या, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, केंद्रीय पोलीस संघटना आणि न्यायवैद्यक विज्ञान विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. या वर्षीच्या पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.