गृहमंत्री डॉ. परमेश्वर यांना ईडीकडून समन्स शक्य
बेंगळूर : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी आणि गुरुवारी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या मालकीच्या सिद्धार्थ शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांवर छापे टाकून झडती घेतली होती. आता त्यांना चौकशीसाठी ईडीकडून समन्स जारी होण्याची शक्यता आहे. छाप्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सिद्धार्थ शिक्षण संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे पडताळली आहेत. त्यातील महत्त्वाची कागदपत्रे बेंगळुरातील ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीतील मुख्य कार्यालयाकडे पाठवली आहेत. आता डॉ. परमेश्वर यांना चौकशीला हजर राहण्यासंबंधील ईडीकडून लवकरच समन्स जारी होईल, असे सूत्रांकडून समजते. सिद्धार्थ शिक्षण संस्थेच्या खात्यांवरून सोने तस्करी प्रकरणातील आरोपी अभिनेत्री रान्या रावचे क्रेडिट कार्ड बिल 40 लाख रुपये भरल्याचा आरोप आहे. त्यामुळे ईडीने बुधवारी सकाळी सिद्धार्थ शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालये, कार्यालयांवर छापे टाकल्याचे समजते. त्यामुळे ईडीने या व्यवहाराची कागदपत्रे पडताळली असून चौकशीसाठी परमेश्वर यांना लवकरच समन्स बजावले जाईल, असे म्हटले जात आहे.