गृहमंत्री-उपमुख्यमंत्री भेटीने राजकीय वर्तुळात कुतूहल
राजकीय मुद्द्यांवर चर्चेची शक्यता
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बदल आणि प्रदेशाध्यक्ष बदलासंबंधी काही नेत्यांकडून उघडपणे वक्तव्ये केली जात आहे. सप्टेंबर महिन्यात राज्य राजकारणात मोठे बदल होतील, असे भाकित सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी केल्यानंतर उलटसुलट चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या गटाकडून अधिकार हस्तांतरणाबाबत चर्चा होत असताना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी शुक्रवारी रात्री शिवकुमार यांची भेट घेतल्याने कुतूहल निर्माण झाले आहे.
चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काही मंत्र्यांनी नवी दिल्लीत काँग्रेसश्रेष्ठींची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी विविध प्रकारची वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. याच दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे समजते. मात्र, शिवकुमार यांनी राजकीय विषयांवर चर्चा झाली नसल्याचे सांगितले आहे. आम्ही सर्वजण एकत्र आहे. एकत्रितपणे विकासकामे करण्यास आमचे प्राधान्य आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
मलाही मंत्रिपदाची इच्छा : आमदार काशप्पनवर
सप्टेंबरमध्ये राज्य राजकारणात मोठे बदल होतील, असे भाकित सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी केले होते. याचे पडसाद उमटत असून काँग्रेसचे आमदार विजयानंद काशप्पनवर यांनी देखील मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखविली आहे. “माझ्यातही मंत्रिपदाची पात्रता आहे, इच्छाही आहे”, असे विधान त्यांनी केले आहे. राजण्णा यांच्याविषयी मी बोलणार नाही. अशा अटकळांना कोणी सुरुवात केली हे ठाऊक नाही. याला आळा घालणे शक्य नाही. याबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतात. मलाही मंत्री बनण्याची इच्छा आहे. संधी मिळेल की नाही, हे मला माहीत नाही, असे आमदार काशप्पनवर यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्रिपदाची खुर्ची रिकामी नाही : एम. बी. पाटील
मुख्यमंत्रिपदाची खुर्ची रिकामी नाही. मुख्यमंत्री बदल, मंत्रिमंडळ पुनर्रचना आणि प्रदेशाध्यक्ष बदल याबाबत हायकमांडच निर्णय घेते. हे रामनगरचे आमदार इक्बाल हुसेन, एम. बी. पाटील किंवा इतर कोणाच्याही हातात नाही, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी दिली आहे. डिसेंबरमध्ये डी. के. शिवकुमार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असे विधान आमदार इक्बाल यांनी केले आहे. त्यावर पत्रकारांशी बोलताना मंत्री एम. बी. पाटील यांनी, सर्व निर्णय हायकमांड घेईल, असे स्पष्ट केले.
पक्षांतर्गत वाद नाहीत!
पक्षांतर्गत वाद नाहीत. सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी केलेल्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य. राज्य राजकीय वर्तुळात बदल होऊ शकतील, असे राजण्णा यांनी म्हटले आहे. मात्र, अमुक बदल होईल असे त्यांनी म्हटलेले नाही. अशा विधानांचा कसाही अर्थ लावला जाऊ शकतो.
- सिद्धरामय्या, मुख्यमंत्री