बेतोडा येथे गव्याच्या हल्ल्यात गृहरक्षक ठार
फोंडा : कण्णेव्हाळ-बेतोडा येथे भररस्त्याच्या बाजूला गव्या रेड्याने केलेल्या हल्ल्यात गृहरक्षकाचा मृत्यू होण्याची घटना काल बुधवारी सायंकाळी घडली. दिनेश तुळशीदास गावडे (48, रा. उडीवाडा, उसगाव) असे त्याचे नाव असून 7.45 वा. सुमारास ही घटना घडली. बेतोडा परिसरात गव्या रेड्याच्या हल्ल्यात मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. प्राप्त माहितीनुसार दिनेश हा रात्री आपल्या ड्युटीवर जाण्यापूर्वी बेतोडा येथील एका मित्राकडे गेला होता. रस्त्याच्या बाजूला आपली दुचाकी उभी कऊन तेथेच थांबलेला असताना अचानकपणे आलेल्या गव्यारेड्याने त्याच्यावर हल्ला केला. दोन्ही पायांच्यामध्ये मान घुसवून त्याला उचलून खाली पाडल्याने अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल केले असता काही वेळाने त्याचा मृत्यू झाला.
मयत दिनेश हा फोंडा येथील न्यायालयाजवळ वाहतूक व्यवस्था पाहण्याचे काम करीत होता. गेल्या काही वर्षांपासून गृहरक्षक म्हणून तो सेवेत होता. त्यापूर्वी काहीकाळ फोंडा पोलिसस्थानकावर तो ड्युटी बजावत होता. या घटनेची माहिती मिळताच फोंड्याचे निरीक्षक मोहन गावडे तसेच अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी आयडी इस्पितळात धाव घेतली.मृतदेहाचा पंचनामा केला असता त्याच्या अंगावर फारशा जखमा आढळल्या नाहीत. मात्र गव्यारेड्याने केलेला हल्ला नेमका वर्मी लागल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. मयत दिनेश गावडे याच्या पश्चात पत्नी तसेच इयत्ता सातवीत शिकणारी मुलगी व पाचवीत शिकणारा मुलगा असा परिवार आहे.
वर्षभरातील दुसरी घटना
दरम्यान गेल्या वर्षभरापूर्वी मंगला गावडे या बोंडबाग बेतोडा येथील महिलेचा अशाच प्रकारे गव्यारेड्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. वर्षभरातील ही दुसरी घटना असून लोकवस्तीमध्ये मोकाट फिरणाऱ्या या वन्यप्राण्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ज्या कण्णेव्हाळ भागात ही घटना घडली तेथे सात ते आठ गव्यारेड्यांचा तांडा फिरत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. बाजूच्या सपनापार्क परिसरात तसेच फोंडा शहरातही संचार करताना काही गवेरेडे अधूनमधून दृष्टीस पडतात. बेतोडा व कुर्टी पंचायतक्षेत्रातून जाणाऱ्या बगल रस्त्याचे बांधकाम करताना उंच अशा संरक्षक भिंती उभारण्यात आल्याने या गव्यारेड्यांच्या संचार क्षेत्रात अडथळे आल्याने ते एकाच बाजूने अडकून पडले आहेत. सपाट झालेले आसपासचे डोंगर परिसर यामुळेहा पाणी व खाद्याच्या शोधात हे वन्यप्राणी आसपाच्या लोकवस्तीमध्ये फिरकू लागले असल्याचे प्राणीमित्रांचे म्हणणे आहे.