अन्न सुविधा योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना घरपोच रेशन
प्रत्येक तालुक्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची यादी
बेळगाव : ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या अन्न सुविधा योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना घरपोच रेशन पोहोचविले जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार प्रत्येक तालुक्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची यादी तयार करण्यात आली आहे. 19,186 ज्येष्ठ नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत. या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना रेशन आणण्यासाठी दुकानांकडे जावे लागणार नाही. घरबसल्या रेशन मिळणार आहे. यासाठी राज्य सरकार रेशन दुकान मालकांना प्रति कुटुंबासाठी 50 रुपये सेवाशुल्क देणार आहे. 75 वर्षांवरील ई-केवायसी असलेल्या एक सदस्य कार्डासाठी अन्न सुविधा योजना लागू करण्यात आली आहे. रेशन दुकानात पीओएस लॉगीनमध्ये अन्न सुविधेसाठी नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रेशन दुकानांच्या लॉगीनमध्ये पात्र रेशनकार्डधारकांचा समावेश
रेशन दुकानांच्या लॉगीनमध्ये पात्र रेशनकार्डधारकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना रेशन वाटप करण्याची तारीखही निश्चित केली आहे. रेशन दुकानदार वयोवृद्धांच्या घराकडे येऊन ओटीपी किवा बायोमेट्रिक घेऊन रेशन वितरीत करीत आहेत. राज्यात 2 लाख 58 हजार 154 लाभार्थी आहेत. तर बेळगाव जिल्ह्यात 28 हजारहून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. तथापि या योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र सदस्यांच्या घरात युवा सदस्य नसावेत. आधारकार्ड आणि मोबाईल नंबर रेशनकार्डला लिंक असणे गरजेचे आहे असा नियम आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या 19 हजारवर आली आहे. अन्न सुविधा योजनेंतर्गत येणाऱ्या 75 वर्षांवरील एकल ज्येष्ठ नागरिकांच्या रेशनकार्डची माहिती संबंधित रेशन दुकानदारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध आहे. रेशन कार्डधारकांच्या घरासमोर रेशन वितरणाचा जीपीएस फोटो घेऊन तो संबंधित निरीक्षकांना पाठविला जाणार आहे.