For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हसत खेळत शिक्षणातून सर्वांगीण विकास

10:58 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
हसत खेळत शिक्षणातून सर्वांगीण विकास
Advertisement

कुलगुरु डॉ. सी. एम. त्यागराज यांचा ठाम विश्वास : सहजतेने दिलेले शिक्षणच विद्यार्थ्यांकडून आत्मसात

Advertisement

मनीषा सुभेदार/बेळगाव

शिक्षकदिनाच्या निमित्ताने शिक्षण पद्धत, तंत्रज्ञानाचा प्रभाव, जागतिक पातळीवर बदललेल्या शिक्षणाच्या संकल्पना अशा विविध मुद्द्यांवर आरसीयूचे कुलगुरु डॉ. सी. एम. त्यागराज यांची घेतलेली मुलाखत...

Advertisement

शैक्षणिक क्षेत्राकडे कसे वळलात? आजपर्यंतचा आपला प्रवास कसा आहे?

मी चिक्कमंगळूरचा आहे. माझे आई-वडील, भाऊ शिक्षकच होते. शिक्षणासह साहित्य, संगीत यांचा विचार घरात होत असे. त्या वातावरणाचा माझ्यावर निश्चितच प्रभाव होता. कदाचित माझ्या रक्तातच शिक्षणाबद्दल आवड असू शकेल. मला स्वत:ला या पेशाबद्दल नितांत आदर आहे. त्यामुळे मी या पेशात आलो.

आपल्या प्रबंधाचा विषय (पीएचडी) कोणता होता?

मी एक वेगळाच विषय निवडला होता. मला निरीक्षणाची सवय आहे. त्यामुळे वाहतुकीसंदर्भात मी सतत विचार करायचो, आणि प्रबंधासाठी ‘माल वाहतूकदारांच्या समस्या आणि भविष्य’ असा विषय मी निवडला होता. यासाठी साडेपाचशेहून अधिक ट्रकचालकांच्या मी मुलाखती घेतल्या आणि माझा प्रबंध सादर केला.

तुमच्या संशोधनातून काही शिफारशी किंवा प्रस्ताव तुम्ही मांडले का?

निश्चितच, एकूण 18 हून अधिक मार्गदर्शक प्रणाली मी सुचविल्या होत्या. नॅशनल फ्राईट पॉलिसीने त्याचा विचार केला. अखिल भारतीय मालवाहतूक संघटनेने त्या अंमलातही आणल्या. परंतु, दुर्दैवाने हा पेशा प्रतिष्ठेचा मानला जात नाही. आज आपल्याकडे अगदी बेळगावमध्येसुद्धा तरुणाईची संख्या अधिक आहे. त्यांना शास्त्राrय पद्धतीने वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले तर ते स्वावलंबी होऊ शकतात. परदेशात या पेशाला प्रतिष्ठा आहे. आपल्याकडेसुद्धा प्रशिक्षण संस्था सुरू करून प्रशिक्षण देण्याची गरज आहे. मुख्य म्हणजे श्रमप्रतिष्ठेचे मोल जाणले पाहिजे.

आता मुख्य मुद्द्यावर आपण येऊ या. शिक्षण मातृभाषेतून असावे, असे तुम्हाला वाटते का?

नक्कीच. शिक्षण मातृभाषेत घ्यायला हवे. परंतु, ते एका टप्प्यापर्यंत असावे. त्यापुढे अन्य भाषांचा स्वीकारही आपण करायला हवा. मातृभाषा म्हणजे एखाद्या बीजाप्रमाणे आहे. ते बीज रोवले तर रोपटे आणि पुढे वृक्ष अशी प्रक्रिया सुरू होते. इंग्रजी भाषा म्हणजे स्वीटकॉर्नप्रमाणे आहे. त्याचा वृक्ष होत नाही. त्यामुळे व्यवहारात ती चालू शकते. परंतु, आकलनासाठी मातृभाषा सरस ठरते. तथापि, आजच्या स्पर्धात्मक जगात जितक्या भाषा आपल्याला शिकण्याची संधी आहे, त्या शिकून घ्याव्यात. त्याचा निश्चित उपयोग होईल.

आपल्या शिक्षणपद्धतीत पूर्वप्राथमिक शाळांपासून मुलांना वेठीस धरले जाते, असे मला वाटते. मुलांच्या प्रवेशासाठी रात्रभर रांगा लावणे, मुलांच्या मुलाखती घेणे, डोनेशन विचारणे हे सगळे कितपत योग्य आहे?

`when play becomes learning,learning becomes a play' या सूत्रावर माझा ठाम विश्वास आहे. मुलांना नैसर्गिक पद्धतीने हसतखेळत शिक्षण मिळायला हवे. परंतु, आपण ते विसरलो असून कृत्रिम पद्धतीने आपण शिकवत आहोत. तेथे लष्कराप्रमाणे सतत शिस्तीचा बडगा चालत नाही. मुलांना गणवेशाची, टाय व बुटांची सक्तीसुद्धा मला पटत नाही. समानता यावी म्हणून हे केले जाते, हे खरे असले तरी त्याच्यावर शिक्षण अवलंबून नसते. घरात जितक्या सहजतेने मुले वावरतील, हसतखेळत बागडतील तसेच त्यांनी शाळेतसुद्धा वावरायला हवे. आपण शिक्षण कृत्रिम करून टाकले, ते बाजारकेंद्री केले. त्यामुळे मुलांना शिक्षणामध्ये फारसा रस उरत नाही.

डिजिटल युगामध्ये शिक्षणपद्धतीत बदल होत आहेत, हे पालक आणि शिक्षण संस्थांच्या लक्षात येत नाही. मुलांचे शिक्षण आणि यश हा पालकांसाठी जीवन-मरणाचा प्रश्न आहे. संस्थांसाठी तो व्यावसायिक झालेला आहे. महाविद्यालयांसाठी तो प्रतिष्ठेचा बनलेला आहे. त्यामुळे एक आदर्श शिक्षणपद्धत अंमलात आणण्यास आपण कमी पडत आहोत. याशिवाय सुविधांचा अभाव, गरिबी अशी अनेक कारणे त्यामागे आहेत.

आठवीपर्यंत सर्वांना पास करणे कितपत योग्य आहे?

याला दोन बाजू आहेत. पास केल्यामुळे मुले अभ्यासाला गंभीरपणे घेणार नाहीत. परंतु, सरकार आणि शिक्षण खात्याचे असे म्हणणे आहे, की नापास हा शिक्का मारून मुलांना नकारात्मकतेकडे नेऊ नका. 34 गुणांना नापास व 35 गुणांना पास असे मानले जाते. उदाहरण घ्या, आंब्याच्या एका झाडाने 3 हजार आंबे दिले तर ते पास होणार. परंतु, जर 2,999 आंबे दिले तर आपण ते झाड कापणार का? असाच विचार इथे केला गेला आहे. अत्यंत कष्टप्रद परिस्थितीतून मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्यावर भाषेचे, सांस्कृतिकतेचे संस्कार व्हायला हवेत. त्यांच्या अंतरंगात असलेली क्षमता शिक्षकांनी विकसित करायला हवी. दुर्दैवाने आज चित्रपट, क्रिकेट आणि मोबाईल यातच त्यांची गुंतवणूक झालेली आहे.

त्यापुढे जाऊन मी असे म्हणेन, की वाढत्या तंत्रज्ञानाने शिक्षणपद्धतीवर पराकोटीचे आक्रमण केले आहे. माणूस घडविण्याच्या प्रक्रियेपासून दूर जात त्याला मशीन केले आहे. शिक्षण क्षेत्रासमोर आज हे मोठे आव्हान आहे. आपणसुद्धा मशीनसारखेच वागू लागलो आहोत, बोलू लागलो आहोत. स्वयंविकासाकडे आपल्या शिक्षणपद्धतीचे आणि आपलेसुद्धा दुर्लक्ष होत आहे. 1940-50 च्या कालखंडामध्ये शिक्षक हे आदर्श होते. त्यांना गुरु मानून आशीर्वाद घेतला जात असे. आज आपण शिक्षकांबरोबर हाय-बाय करत आहोत. म्हणजे जसे सेल्समन, कंडक्टर, आपले काम करतात आणि घरी जातात, तसे शिक्षक वर्ग घेऊन निघून जातात. परंतु, मुलांमधील सर्व क्षमता विकसित करण्यात ते कमी पडत आहेत. त्यामुळे शिक्षणाप्रती, शिक्षकांप्रती आपुलकी, आदर कमी होऊन तुटलेपण अधिक येत आहे.

नवपदवीधर नोकरी देण्यासाठी लायक नाही, असा कॉर्पोरेट कंपन्यांचा सूर आहे. याचे कारण काय असावे?

कोणत्याही कंपनीला त्याच्या उत्पादनाचा दर्जा राखणे महत्त्वाचे असते. परंतु, आपण साचेबद्ध पद्धतीने शिकू लागलो तर ते उपयोगाचे नाही. साठ मुलांसाठी एक शिक्षक पुरेसा ठरणार नाही. शिक्षकांनी मुलांची शिक्षणामधील गुंतवणूक, उत्सुकता वाढवून त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आज शिक्षकांनाच प्रश्न पडत नाही. त्यामुळे मुलांना प्रश्न पडतील कसे? प्रश्नांची परंपरा गेली आहे. पोपटपंची, घोकंपट्टी हे शिक्षणाचे उद्दिष्ट नाही, तर ‘विकास, विस्तार व समाधान’ हे त्याचे उद्दिष्ट आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण किंवा आपले शिक्षण कोठे आहे?

भारत आणि चीन यांची लोकसंख्या अधिक आहे. गरिबी आणि लोकसंख्येचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. परंतु, इन्टेन्सिव्ह कोचिंग, टास्कींग व रिस्पॉन्सिबिलिटी या तीन मुद्द्यांवर काम करून चीनने बदल घडवून आणला आहे. आपल्याला अजूनही तेथे पोचायचे आहे. दुर्दैव किंवा वास्तव असे आहे, की पूर्वी शिक्षकीपेशा स्वीकारून मी नोकरी मिळविणार, असा आग्रह असे. आता नोकरी मिळवावी लागत नाही, तर ती मॅनेज करावी लागते. दबाव, शिफारस यावर नोकरी मॅनेज होऊ लागली. तेथे शिक्षकाच्या क्षमतेचा विचार पार मागे पडला. वास्तविक किमान शिक्षण क्षेत्र तरी मॅनेज करण्यापासून मुक्त असायला हवे होते. त्याबाबत आपण गंभीरपणे विचार करून पावले उचलली तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण मागे राहणार नाही.

काही शैक्षणिक प्रवाह महत्त्वाचे मानले गेल्याने त्याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला?

हो, आपल्याकडे इंजिनिअरिंग, मेडिकल यांना अवास्तव महत्त्व दिले गेले. आता थोडेफार बदल दिसत आहेत. परंतु, आपण संशोधन क्षेत्राकडे वळत नाही. वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षांचा दबाव जितका आहे, तितका त्याचा धसका मुले घेतात. त्यांना अपयश पचविणे कठीण जाते. मी पुन्हा प्रयत्न करेन, असे म्हणण्याऐवजी ते अपयशाने खचून जातात. एका अपयशाने ‘जिंदगी खतम नहीं होती।’ हे विद्यार्थी कधी लक्षात घेणार आहेत? तसेच शिक्षक किंवा पालकसुद्धा काहीही असो, आम्ही तुझ्यासोबत आहोत, हा विश्वास मुलांना कधी देणार आहेत?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उपयुक्त ठरेल का?

वर्षानुवर्षे चालत आलेल्या अभ्यासक्रमात काहीसे बदल करण्यात आले आहेत. एका अर्थाने याचे आधुनिकीकरण झाले आहे. कला शाखेच्या अभ्यासक्रमाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळे हे धोरण उपयुक्त ठरणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य शैक्षणिक धोरण हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापासून फारसे दूर नाही. त्यामुळे त्याचा बाऊ करण्याची गरज नाही.

या पार्श्वभूमीवर आपण शिक्षक आणि प्राध्यापकांना काय सांगाल?

आज शिक्षक वेगवेगळ्या दबावाखाली काम करत आहेत. याचा परिणाम आरोग्यावर होईल. त्यामुळे प्रथम त्यांनी आपले आरोग्य सांभाळावे. आहाराचे गणित सांभाळावे. प्रचंड वाचन करायला हवे. विद्यार्थ्यांना ज्ञानभाषा, संस्कृतीची शक्ती देऊन त्यांना सक्षम करायला हवे. शालेय स्तरावरचे शिक्षण आणि संस्कार महाविद्यालयीन स्तरावर विकसित व्हायला हवेत. ते तुटता कामा नये, याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

विद्यार्थ्यांसाठी आरसीयूच्या काय योजना आहेत?

अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थीकेंद्रित सकारात्मक बदल करणे, प्राध्यापकांची क्षमता वाढविणे, विविध चर्चासत्रे घेणे हे तर आम्ही करूच. याशिवाय आरसीयूमध्ये 79 टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातून येत आहेत, त्यांचा विचार करून एज्युकेशन अॅप विकसित करत आहोत. म्हणजे स्पर्धात्मक परीक्षांसाठी त्यांना उपयोग होईल. स्कील डेव्हलपमेंट स्कूल सुरू करण्यावर भर दिला आहे. डिजिटल पब्लिशिंग डेस्क हा प्रकल्प स्मार्टसिटीच्या सहकार्याने भारतात प्रथमच आरसीयू सुरू करत आहे. या माध्यमातून पुस्तके प्रकाशित होतील. समकालीन शिक्षण देण्यावर आरसीयूचा भर असेल.

शिक्षण अत्यंत नैसर्गिक पद्धतीने शिकता आले पाहिजे. दुर्दैवाने हसतखेळत शिक्षणाचा आपल्याला पार विसर पडला आहे. अत्यंत कृत्रिम पद्धतीने आपण शिक्षण देत आहोत. वास्तविक खेळाइतक्या सहजतेने शिक्षण दिले जाईल, तेव्हा तितक्याच सहजतेने शिक्षण आत्मसात केले जाईल. ही जबाबदारी शिक्षक आणि प्राध्यापकांची आहे. हे मत आहे, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सी. एम. त्यागराज यांचे.

-कुलगुरु डॉ. सी. एम. त्यागराज.

Advertisement
Tags :

.