शहरात आज होळी, उद्या रंगोत्सव
बाजारपेठेत विविध साहित्य विक्रीसाठी दाखल : बालचमूंना रंगोत्सवाचे वेध
बेळगाव : बेळगावकरांना होळी आणि रंगोत्सवाचे वेध लागले आहेत. त्यामुळे रंग, मुखवटे, टिमक्या, ढोलकी व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. शुक्रवार दि. 14 रोजी रंगोत्सव असला तरी शहर व उपनगरात बालचमू सोमवारपासूनच रंग खेळताना दिसत होते. गल्लोगल्लीत रंगोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहर आणि उपनगरात गुरुवार दि. 13 रोजी होळी सण साजरा होणार असून दुसरे दिवशी शुक्रवारी धूलिवंदन आहे. होळीदिवशी होळी कामाण्णा मूर्तीला नैवेद्य दाखवून होळी पेटविण्यात येते. त्यासाठी पूजेच्या साहित्याची जुळवाजुळव केली जात आहे. पौर्णिमेच्या मुहूर्तावर होळीनंतर रंगोत्सव साजरा केला जाणार आहे. होळीच्या पूर्वसंध्येला मंडप घालणे व लाकूड आणण्याची लगबग सुरू झाली आहे.
त्याचबरोबर ठिकठिकाणी लहान मुले टिमक्या, ढोलकी आणि ढोल वाजविताना दिसत आहेत. रसायनमिश्रीत रंगांचा वापर न करता कोरड्या रंगांचा वापर करावा, पाण्याची नासाडी करण्यात येऊ नये, असे आवाहन केले जात आहे. होळी हा सण आनंदाचा, उत्साहाचा आणि रंगांचा सण म्हणून साजरा केला जातो. होळीला पूरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्यामुळे विविध साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. बेळगावचे आकर्षण असलेल्या पांगुळ गल्लीत सामूहिक लोटांगण कार्यक्रम शुक्रवारी होणार आहे. अश्वत्थामा मंदिरासमोर हा लोटांगणाचा कार्यक्रम होणार असून शहरात देखील विविध ठिकाणी रंगोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रंगोत्सव दोन दिवसांवर असला तरी बुधवारपासूनच शहर परिसरात बालचमू रंग खेळताना दिसत होते.