चव्हाट गल्लीत पारंपरिक पद्धतीने होलिकोत्सव
बेळगाव : चव्हाट गल्ली येथे आजही परंपरेनुसारच होलिकोत्सव साजरा केला जातो. बैलगाड्यांना सजवून होळीचे झाड आणण्यात आले. तसेच मंगळवारी चव्हाटा मंदिरसमोर नारळ उडवून या कार्यक्रमाची सांगता झाली. दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी दिसून आली. सोमवारी किल्ला परिसरातून 15 बैलगाड्यांमधून 30 फूट उंच झाड आणण्यात आले. कोर्ट कंपाऊंडपासून चव्हाट गल्ली चव्हाटा मंदिरापर्यंत गल्लीतील नागरिकांनी झाड ओढून नेले. चव्हाट गल्ली येथील होलिका दहन झाल्यानंतर कामत गल्ली व इतर भागांमधील होलिका दहन झाले. यावेळी काही भाविकांनी लोटांगण घालून आपल्या मागण्या चव्हाटासमोर मांडल्या. सायंकाळी ग्रहणानंतर चव्हाट्याला बाशिंग बांधण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी नारळ उडवून आपल्या मागण्या देवासमोर मांडल्या. दर्शनासाठी केवळ चव्हाट गल्लीच नाही तर आसपासच्या परिसरातील शेकडो भाविक उपस्थित होते.