जुने ठेवणे मीपणे आकळेना..
म्हणे दास सायास त्याचे करावे।
जनीं जाणता पाय त्याचे धरावे?
गुरू अंजनेवीण तें आकळेना।
जुने ठेवणे मीपणे आकळेना?
व.पु. काळे म्हणतात त्याप्रमाणे समर्थ रामदासांनी दासबोध मुंबईच्या शेअरबाजारात मध्यवर्ती ठिकाणी बसून लिहिलेला असावा असं तो वाचताना वाटत राहतं. समर्थ रामदास हे अतिउत्तम कवी होते, हे वेगळं सांगण्याची गरजच नाही. परंतु त्यांच्या ज्या रचना आहेत त्याचं वैशिष्ट्या त्यांच्या वृत्तीप्रमाणेच आहे. म्हणजेच त्या आटीव, बांधीव आणि पीळदार रचना आहेत. कितीही अवखळ असलं तरी सज्जना म्हणून हाक मारल्यावर स्तुती प्रिय असल्यामुळे मागे वळणारच आणि ऐकून घेणारच अशा मनाला त्यांनी मनाच्या श्लोकांमध्ये उपदेश केले आहेत तेही भुजंगप्रयातामध्ये! मनाच्या श्लोकांचे पाठ, पारायण, स्पर्धा जागोजागी होत असतात.
समर्थांच्या विचारांचा जागर होणे हे अतिशय छान आहे. आनंददायी आहे. परंतु समर्थांचे विचार आणि त्या विचारांची खोली जन्मभर अभ्यासावी अशी आहे. प्रत्येक कलेला जे अभिप्रेत असतं, की सतत अभ्यास करणे आणि आपल्याला जो केंद्रबिंदू वाटत असतो तो दुसऱ्या एका वर्तुळाचा परीघ असू शकतो या जाणिवेपर्यंत पोहोचणे हा एक निरंतर प्रवास असतो. आणि हा निरंतर प्रवास कोणत्याही गोष्टीच्या अभ्यासामध्ये चालूच असतो. याचा शेवट नक्की कुठे होतो? तिथे गेल्यावर आपल्याला काय मिळतं? हे सगळं जर अनुभवायचं असेल तर तो प्रवास स्वत: करावा लागतो. परंतु जाणाऱ्या व्यक्तींसाठी वाटाड्या म्हणून काम करणारी आपली संतमंडळी असतात. तिथे जावं कसं हे ते सांगतात म्हणून ते गुरु असतात. समर्थ रामदास हे याच संत कवींपैकी एक. एक तर पंढरपूरच्या विठोबाला जाऊन ‘येथे का रे उभा श्रीरामा?’ असा ठणकावून सरळ सवाल आपल्या उपास्य दैवतालाच करण्याइतकं श्रेष्ठ धारिष्ट्या असलेला कवी तो! त्यामुळे त्यांना नि:संशय आणि निर्विवाद अधिकार होता जुन्या परंपरा आणि पुरातन काळातलं अमोघ ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान मनुष्याने आत्मसात केलं पाहिजे हे सांगण्याचा! उपमा आणि दृष्टांत या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे कठीण गोष्टी सोप्या होऊन जातात. समर्थांनी नाना दृष्टांत देऊन हेच पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जुने ठेवणे हा शब्दसमूह वाचता वाचता विचार करायला लावतो की समर्थांना यातून नक्की काय सांगायचं असेल? जुने ठेवणे म्हणजे नक्की काय? मग विचार करता करता आपण आपल्या प्रापंचिक गोष्टींशी येतो. समर्थ मोठे ग्रेट! त्यांनी घरातल्या, व्यवहारातल्या गोष्टीतूनच हे सांगण्याचा प्रयत्न केला. कारण ज्या जगात आपण वावरतो त्या जगातल्या गोष्टी आपल्याला लवकर कळतात. हे जुनं ठेवणं म्हणजे काय, तर घरात अमूल्य असणाऱ्या गोष्टी पिढ्यानपिढ्या साठवून ठेवण्याची पद्धत होती. म्हणजेच पूर्वी शुद्ध रेशमाचे कपडे, पैठण्या वगैरे भाषणात बांधून मोठ्या निगुतीने आतमध्ये केवड्याची पानं घालून ठेवून दिल्या जात असत. त्यांना कसर लागू नये, त्यांचे रंग जाऊ नयेत, त्यांचे जर उकलू नयेत यासाठी विशेष काळजी घेण्यात येत असे. अधूनमधून त्यांना उन्हं दाखवली जात असत. तोच प्रकार होता सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा. घरातल्या खाशा वस्तू, उत्तम उत्तम भांडी ही पिढ्यांपेक्षा ठेवून वापरली जायची. आणि घरात येणाऱ्या प्रत्येक सुनेसोबत या सर्व वस्तू घरात नव्याने समाविष्ट होत जायच्या. एकूण घरं समृद्ध आणि भरलेली असायची ती या ठेवण्यामुळे.
घरात अशा बऱ्याच गोष्टी ठेवणीतल्या म्हणून ठेवलेल्या असत. हे व्यावहारिक जगातलं जुनं ठेवणं असं म्हणावं लागेल जे पिढ्यान पिढ्यांना उपयोगी पडतं. परंतु जर पुढच्या पिढीने ठरवलं की यापैकी काहीही वापरायचं नाही किंवा ते वापरायला सोपं पडत नाही म्हणून सोडून द्यायचं, किंवा विकून टाकायचं. तर काय होईल? तर आज त्या वस्तूंची किंमत प्रचंड वाढलेली असेल. आज त्या दर्जाच्या वस्तू मिळणार नाहीत. आणि घराच्या जुन्या परंपरागत वस्तू नष्ट होतील. आणि हे होणारं नुकसान कधी भरून येत नाही. हाच मुद्दा अध्यात्माच्या ज्ञानाबाबतीत येतो. घरातल्या वस्तूंचं उदाहरण दिल्यानंतर तो चटकन कळतो. साडेचारशे ते पाचशे वर्षांपूर्वी या जुन्या ठेवण्याचं महत्त्व काय होतं हे त्यावेळच्या माणसांना निश्चित कळत असेल. आणि कथा, कीर्तनं, प्रवचनं, रामदासी मंडळींच्या होणाऱ्या फेऱ्या हे समाजाला ज्ञानार्जन करण्याचं महत्त्वाचं आणि त्या मानाने सुलभ असणारं साधन होतं. याच अध्यात्माच्या जुन्या ठेवण्याविषयी लोकांना जागरूक करायला अवघं आयुष्य केशरी करून घेतलेले रामदासी सर्वत्र हिंडत असत.
मग घरातल्या जुन्या ठेवण्याच्या निमित्ताने अध्यात्माचं जुनं ठेवणं काय आहे हे लोकांना कळावं म्हणून समर्थ रामदासांनी पुरेपूर प्रयत्न केले. हेच बीज रामदासी मठातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खूप ठिकाणी रुजवलं. भारतभराच्या यात्रा केल्या. कारण अध्यात्माचा हा प्रवास हा गूढ असतो. प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या असतात. प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात. प्रत्येकाच्या समस्याही वेगळ्याच असतात.
या सगळ्या गोष्टींचा लसावी काढून जास्तीत जास्त सुकर होणारा मार्ग प्रत्येक मुमुक्षूला उपलब्ध करून देणे हे संतांनी आपलं जीवितकर्तव्य मानलं होतं. आणि त्यासाठी ही त्यांची भ्रमंती असे. हजारो वर्षं आपले पूर्वज मानवाने स्वत:चा उद्धार कसा करून घ्यावा याविषयी पुढच्या पिढीला सांगत आले. अध्यात्माचे हे मार्ग खरोखरच इतका गुण देणारे होते. परंतु जशा पिढ्या पुढे जात गेल्या तशी श्रद्धा कमी होत गेली. चिकित्सक वृत्ती, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन या सर्वच गोष्टी कमी होत गेल्या. त्यातच परकीय आक्रमणामुळे स्वत:चा धर्म वाचवणे आणि जीव जगवणे हेच जिथे जिकिरीचं होऊन बसलं होतं. तिथे धार्मिक परंपरा आणि अध्यात्मशास्त्राचा अभ्यास ही सर्व सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचीच गोष्ट होती.
अशावेळी त्या धार्मिक परंपरा कुणीतरी जिवंत ठेवणे आवश्यक होतं व रामदास स्वामींनी हे जुनं ठेवणं आपल्याकडच्या मनोबलाच्या आणि शौर्याच्या गाठोड्यात पक्की बांधबंदिस्ती करून ठेवलं. आणि गरजेप्रमाणेच हे जुनं ठेवणं आपल्याकडे आहे याची पुन्हा पुन्हा आठवण ते संसारीजनांना करून देत गेले. ज्याप्रमाणे डोळ्यांना चांगले दिसण्यासाठी अंजन म्हणजेच काजळ आवश्यक असते, त्याचप्रमाणे अहंकाराच्या अडथळ्यामुळे मीपणामुळे जुने शाश्वत ज्ञान समजत नाही. त्यासाठी गुरूच्या ज्ञानाची मदत घेणे आवश्यक आहे. आज सुरू झालेल्या नव्या वर्षात या जुन्या ठेवण्याचं महत्त्व आपण विसरता कामा नये हे नक्की लक्षात ठेवूया.
-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु